आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडार वेदना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याकडे गंभीर गुन्हा केलेल्या कैद्यांना तुरुंगात खडी फोडण्याची शिक्षा केली जाते. अनेक चित्रपटांत आपण असे प्रसंग पाहिले आहेत. मात्र कोणताही गुन्हा केलेला नसतानाही पिढ्यान‌्पिढ्यांपासून खडी फोडण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्रातील वडार समाजाच्या पोटावर इथल्या सामाजिक आणि शासकीय व्यवस्थेने चांगलीच लाथ मारली आहे. लोकसंख्येच्याच भाषेत सांगायचे झाले, तर विमुक्त जातींमधला दुसऱ्या क्रमांकाचा हा पन्नास लाखांच्या आसपासचा वडार समाज. अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करण्यासंबंधीची या समाजाची कित्येक वर्षांपासूनची मागणी लालफितीच्या कारभारात धूळ खात पडली असतानाच आता आचारसंहिता जाहीर होण्याच्या काही तास अगोदर महाराष्ट्र शासनाने या समाजाला दगडावर रॉयल्टी आकारणीपासून सूट देण्याचा घाईघाईचा निर्णय घेतला. वास्तविक वडार समाजाची ही मुख्य मागणी नव्हतीच. राज्यात दगड खाणींची संख्या शंभराच्या वर नाही, की एकाही वडार व्यक्तीच्या नावावर दगडाची खाण नाही. त्यामुळे शासनाने अशी सूट देऊन काय साधले आहे, असा सवाल हा समाज करत आहे. रॉयल्टी माफ करण्याचे जाहीर करून आमच्या पोरांनी आयुष्यभर दगड फोडायचेच काम करत राहायचे का, असा रास्त सवाल वडार समाजाने उपस्थित केला आहे.

जागतिकीकरणाच्या रेट्यात भटक्यांना सरळ उचलून व्यवस्थेच्या बाहेर फेकलं गेलं. पारंपरिक उदरनिर्वाहाची साधनं हिरावली. शिवाय जातिनिहाय परंपरागत व्यवसाय समाजाला गुलामीत डांबतात व ते पुन:पुन्हा नरकातच खितपत पडतात, हा मुद्दा आहेच.

वास्तविक वडार समाजाचा इतिहास तसा गौरवशाली. एकेकाळी याच समाजाने देशाचा पाया भक्कम केला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. वडार समाजाचा इतिहास तर पुरातन काळापासूनचा. मानवी संस्कृतीच्या प्रवासात अनेक युगे अवतरली. लोहयुग, ताम्रयुग, सुवर्णयुग... या सर्व काही लक्ष किंवा कोटी वर्षांचे चालतेबोलते अवशेष- इतिहास-वर्तमानकाळातही भारतात आढळतात. त्यातील एक म्हणजे, पाषाणयुग किंवा अश्मयुग… आदिमानवाने पाषाणांपासून विविध हत्यारे तयार करायला सुरुवात केली, तिथेच या युगाचा उदय झाला. दगडांपासून कुऱ्हाड, तासण्या, पाटे-वरंवटे बनू लागले; तर गारगोट्यांपासून बाणांची टोके, टोचे ते अगदी सुयासुद्धा बनू लागल्या. पुरातन काळातच दगडांपासून उपयुक्त वस्तू बनवू शकणारा वर्ग उदयास आला होता.
पुढे शेतीचा शोध लागला. माणूस स्थिर झाला, घरं बांधू लागला. उत्तरेकडे घरबांधणीसाठी दगडांऐवजी कच्च्या व नंतर पक्क्या विटांचा तर काही ठिकाणी लाकडांचा वापर होऊ लागला. दक्षिणेकडे मात्र तशी परिस्थिती नव्हती. दख्खनचे पठार व सह्याद्री हे बेसॉल्ट जातीच्या दगडांसाठी प्रसिद्ध होते. पाषाणकार्यात तरबेज माणसं दक्षिणेकडे अधिक प्रमाणात विकसित होणे त्यामुळेच स्वाभाविक होते. वडार समाजाच्या अधिकाधिक वस्त्या म्हणूनच दक्षिणेत आढळतात. वडार समाज हा आंध्र, तामिळनाडू, कर्नाटक इथून फिरत फिरत महाराष्ट्रात आला. आपल्याकडे वडार म्हटले जात असले तरी आंध्रमध्ये वड्डोल्लू, कनार्टकात वड्डर, तर तामिळनाडूत या समाजाला ओट्टन नायकन वा ओड्डर म्हणून संबोधले जाते.

वडार समाजामध्ये काही पुराणकथा सांगितल्या जातात. आपापल्या व्यवसायाचा-सामाजिक स्थितीचा आणि कष्टकरी आयुष्याचा शोध घेण्याच्या प्रयत्नांत कधीतरी या पुराणकथा जन्माला आल्या असाव्यात.

शिव-पार्वती एकदा भूलोकी संचार करायला निघाले. नेमका तेव्हा कडक उन्हाळा होता. प्रचंड उन्हामुळे दोघांना तहान लागली. शिवाने आपल्या घामाच्या थेंबातून कुदळ-फावड्यासह एक माणूस निर्माण केला. पार्वतीच्या घामातून एक स्त्री घमेल्यासह निर्माण झाली. या जोडप्याला शिव-पार्वतीने विहीर खोदायला सांगितले. विहीर खोदून झाल्यावर विहिरीतील पाणी पिऊन देव प्रसन्न झाले आणि त्यांनी जोडप्याला अमूल्य उपहार दिले. मात्र या उपहारानंतरही ते जोडपे खुश झाले नाही. त्यामुळे शिव-पार्वती क्रोधित झाले आणि त्यांनी जोडप्याला शाप दिला की, तुम्हाला पोट भरण्यासाठी आयुष्यभर घामच गाळावा लागेल…
दुसरी पौराणिक कथा ही वडार समाजाच्या स्त्रियांच्या बाबतीतली आहे. ‘रासमाल’ या ग्रंथातल्या या कथेनुसार गुजरात नरेश सिद्धपाल जयसिंहाने पाटण येथे सहस्रलिंग तलावाच्या निर्मितीचे काम वडारांना दिले. वडार स्त्रियांपैकी जस्मा या देखण्या स्त्रीवर सिद्धराजाचे मन आले. पण ती काही केल्या त्याला वश होईना. एकदा कामातुर सिद्धराजा जस्माला महालात नेण्याचा हट्ट धरू लागल्यावर ती पळत सुटली. राजाने तिचा पाठलाग केला आणि वाटेत आडवे येणाऱ्या वडारांना ठार मारले. शेवटी जस्माने आत्महत्या केली. मरताना तिने सिद्धराजाला शाप दिला की, तुझ्या तलावात कधीही पाणी साठणार नाही आणि वडारांना ती म्हणाली की, यापुढे वडारांमध्ये सुंदर स्त्रिया जन्माला येणार नाहीत.

वडार स्त्रिया या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उन्हातान्हात कष्टाची कामं करतात. त्यामुळे स्त्रियांच्या अंगी असलेला नाजूकपणा या समाजातील स्त्रियांमध्ये असणे शक्यच नव्हते. त्यामुळे स्वत:च्या मनाची समजूत काढण्यासाठी अशा प्रकारच्या पुराणकथा तयार केल्या गेल्या असण्याची शक्यता आहे.
दगडाला देव बनविणाऱ्या वडार समाजामध्ये म्हणूनच अंधश्रद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, की ग्रामीण भागातील महिला हल्लीहल्लीपर्यंत चोळी घालणे वर्ज्य समजत होत्या. पुरातन काळापासूनची दंतकथा हेच त्यामागचे कारण. एकदा म्हणे, वनवासात असताना सीता दगडाच्या आडोशाला स्नान करत होती. वनामध्ये दगड फोडण्यासाठी एक वडार जात असताना त्याच्या नजरेला सीता दिसली. संतप्त होऊन सीतेने वडाराला शाप दिला, की तुझ्या समाजाच्या बायकांना चोळीच घालायला मिळणार नाही. त्यामुळे हा शाप मानून समाजातील वयोवृद्ध महिला आजही चोळ्या घालत नाहीत. याबद्दल वडार समाजाच्या युवा पिढीने सातत्याने मोहीम राबवून समाजाची ही अंधश्रद्धा दूर केली आहे.

वेठबिगारीची पद्धत जेव्हा मध्ययुगात सुरू झाली, तेव्हापासून परंपरागत कौशल्यावर आधारित जातींची पिळवणूक सुरू झाली. वडार समाज अशाच पिळवणुकीला बळी पडला. वेठबिगारीच्या त्या काळात वडार समाजाच्या अनेक उपजाती तयार झाल्या. वड्डर म्हणजे दगड फोडणारा, पाथरुट म्हणजे रस्ता तयार करणारा, गाडी वड्डर म्हणजे आपल्या बैलगाडीतून दगड घेऊन जाणारा व बांधकाम करणारा… त्यांच्या त्यांच्या कामांवरून वडार समाजाला ही वेगवेगळी ओळख मिळाली. खाणीतून दगड काढण्यापासून तो घडवण्यापर्यंत आणि बांधकाम करेपर्यंतची सगळी कामं हाच समाज करतो. याच मोठमोठ्या दगडांवर नक्षीदार शिल्प कोरून मंदिर बनविण्यापासून ते राजे-महाराजांचे किल्ले, राजवाडे आणि किल्ले बांधण्यापर्यंतची कामं शेकडो वर्षांपासून या समाजाने केली आहेत. जगप्रसिद्ध वेरूळ-अजंठा लेणी, ताजमहाल हे आपल्या संस्कृतीला वडार-पाथरुट समाजाने दिलेले देणं आहे. देशाच्या प्रगतीचा पाया याच समाजाने प्रथम घातला. खडकांच्या अखंडतेचा अंदाज बांधणे, संकल्पचित्र ठरवणे व त्यांना प्रत्यक्ष खोदून आकाराला आणणे आणि तेही कोणत्याही अत्याधुनिक तंत्रज्ञानाशिवाय, हे खरोखरच कठीण काम आहे. मात्र जवळपास प्रत्येकाने त्यांना फुकटात राबवून घेतले.

ताजमहाल शहाजहानने बांधला, हे इतिहासात शिकवले जाणारे गुळगुळीत वाक्य जरी मुलांना मार्क मिळवून देत असले तरी त्यासाठी वडार समाजाच्या हजारो हातांनी बलिदान दिले आहे, याचा उल्लेख पाठ्यपुस्तकात कधी होणार कुणास ठाऊक? ज्या वडारांनी या देशात हजारो मंदिरे बांधली, देवदेवतांच्या मूर्ती घडवल्या, त्यांनाच मंदिरात प्रवेश नाकारण्यात का येतो, याचे उत्तर कोण देणार? आपले स्वत:चे असे वास्तुरचना शास्त्र आणून ब्रिटिशांनी या देशात रेल्वे आणली, धरणे बांधली, दळणवळणाची साधने निर्माण केली. मात्र हे सगळे ज्यांच्या जिवावर करण्यात आले, तो वडार समाज मात्र फक्त मजूर बनून राहिला. एकेकाळी भव्य आणि कलात्मक लेणी-किल्ले, वास्तू, मंदिरे निर्माण करणारे वडार आता फक्त ताशीव दगड घडवणे व माती आणणे, एवढेच काम करू लागले. रेल्वे-रस्ते-घरे यासाठी दगडफोडी, विहिरी खोदणे ही सामान्य दर्जाची परंतु कष्टाची कामे करणे हेच या समाजाच्या हाती राहिले. दुसऱ्या
बाजूला ब्रिटिशांनी या भटक्या जमातींवर जन्मजात गुन्हेगार असल्याचा कायदा राबवून त्यांचे सामाजिक अध:पतन करायलाही सुरुवात केली.
हे सामाजिक अध:पतन केवळ ब्रिटिशांनीच नाही केले, तर पुढे आपल्या सोयीनुसार इतिहास लिहिणाऱ्या तोतया शािहरांनीही पुढे कायम ठेवले. रायगड किल्ल्याची वास्तुरचना पाहून जगभरातील तज्ज्ञ वास्तुकारांनी आश्चर्य व्यक्त केले आहे आणि रायगडाची ही वास्तू बांधणारा दुसरा कोणीही नसून वडार समाजाचे वास्तुस्थापत्यकार हिरोजी इटळकर आहेत, हा इतिहास फार कमी लोकांना माहीत आहे. शिवरायांच्या आज्ञेने हिरोजी इटळकर यांनी रायगडाचे बांधकाम केले. रायगडावरील जगदीश्वर मंदिराच्या पूर्वेकडील दरवाजातून बाहेर पडताना दरवाजाच्या पायरीतच ‘सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इटळकर’ असे स्पष्ट देवनागरीत वाक्य दिसते. मात्र असे असतानाही रायगडावर पुस्तके लिहिणाऱ्या इथल्या तथाकथित संशोधकांनी हे श्रेय वडार समाजाच्या या महान स्थापत्यकाराला देण्याचे नाकारले आणि इतिहासाच्या पानात हिरोजी इटळकरचे नामकरण हिरोजी इंदुलकर असे केले. ज्या राजेमहाराजांनी ही वास्तुशिल्पे बनवून घेतली, त्यांची नावे इतिहासाच्या पानांवर कायमची कोरली गेली आहेत. मात्र ज्यांच्यामुळे आपल्याला इतिहासातील वेगवेगळ्या काळांचा इतिहास समजतो, त्या वडार समाजाच्या नोंदी आपल्याकडे सांभाळून ठेवल्या नाहीत. किंबहुना तशी गरजच कुणाला वाटली नाही.

उखळ, जाती, पाटे-वरवंटे यांची बाजारपेठ तशी मर्यादित. एक तर या वस्तू दगडांच्या असल्याकारणाने त्यांचे आयुष्य मोठे, फार तर टाके घालण्याचे काम दरवर्षी एकदाच. आणि आता तर या वस्तू आपल्या संस्कृतीचे गतवैभव दर्शवण्यासाठी अँटीक पीस म्हणूनच ठेवल्या जात आहेत. वडार समाजाची पारंपरिक कामं आज अगडबंब यंत्रे करू लागली आहेत. राज्यात ज्या काही दगड-खाणी आहेत, त्या गुजराती-मारवाड्यांच्या हाती गेलेल्या आहेत.
जागतिकीकरणामध्ये आता परंपरागत कामाला थारा नाही, ही बाब वडार समाजाच्या नव्या पिढीलाही माहीत आहे.परंतु शिक्षणाच्या अभावामुळे या पिढीचे भविष्य अधांतरी आहे. जेमतेम ५ ते १० टक्के शिक्षणाचे प्रमाण असलेला वडार समाज वाट बघतोय ती फक्त अनुसूचित जमातीमध्ये कधी समाविष्ट होतोय याची.

गेल्या कित्येक दशकांपासून हा समाज आरक्षणाची मागणी करतोय. भटक्या विमुक्तांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी शासनाने नेमलेल्या जवळपास प्रत्येक आयोगाने वडार समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याची शिफारस केली आहे. मात्र प्रत्येक आयोग गुंडाळून ठेवण्याचे प्रकार इथल्या राज्यकर्त्यांनी केले. कर्नाटक व इतर राज्यांत हा समाज अनुसूचित जमातीमध्ये मोडतो. वडार समाजाचे नैसर्गिक हक्क डावलेले गेले आहेत. समाजाच्या उन्नतीसाठी आरक्षणाची गरज असल्याची वडार समाजाची भूमिका आहे. आपल्या अस्तित्वाच्या शोधात असलेला हा समाज पर्यायी अस्तित्व उभारण्याचा अयशस्वी का होईना परंतु प्रयत्न करत आहे. मात्र त्याला आरक्षणाची जोड मिळाली तर आज वडार समाजाची मुलंदेखील आर्किटेक्ट होतील, आयटीआयमधून पदवीधर होतील, अशी अपेक्षा या समाजाची नवीन पिढी करत आहे.
काँग्रेसने फसवले...
वडार समाज हा तसा अगदी पहिल्यापासून काँग्रेसचा मतदार. जवाहरलाल नेहरूंपासून शरद पवारांपर्यंत आणि आता पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत वडार समाजाने काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची साथ सोडली नाही. आज राज्यात वडार समाजाचा एकही आमदार नसला तरी अनेक आमदार निव्वळ वडार समाजाच्या पाठिंब्यामुळे निवडून आले आहेत. मात्र तरीही इथल्या राज्यकर्त्यांनी कायम तोंडाला पानं पुसली आहेत.
- जनार्दन पोवार
(अखिल महाराष्ट्र वडार संघटनेचे अध्यक्ष)

(संदर्भ - वडार समाज - इतिहास आणि संस्कृती (भीमराव चव्हाण) आणि वडार समाजाचा इतिहास - संजय सोनवणी)