आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजभूमीवरचा योध्‍दा शीख

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेती आणि सैन्य एवढीच ओळख शिखांची राहिली नाही. फाळणीपूर्वीचा पंजाबमधील शीख व फाळणीनंतर भारतात वेगवेगळ्या ठिकाणी स्थिरावलेला शीख आता जीवनाच्या व समाजाच्या सर्वच भागांत आपली नाममुद्रा अधिक स्पष्ट करत आहे. लष्कराव्यतिरिक्त समाजकारण, राजकारण, क्रीडा, कला, सिनेमा अशा बहुविध क्षेत्रातील कार्य आणि एकूणच स्वतंत्र भारताच्या उभारणीत आजच्या सर्वच क्षेत्रांत असलेले शिखांचे योगदान पाहता त्यांची नोंद घेणे, त्यांचे कौतुक करणे क्रमप्राप्त आहे.


महाराष्‍ट्रात असलेला शीख समाज पंजाबमधील शिखांप्रमाणे शेती हा व्यवसाय प्रामुख्याने करत नाही. मुंबई, पुणे, नांदेड, औरंगाबाद, मनमाड अशा ठिकाणी हा जास्त समुदायाने आहे. परंतु इतरही काही जिल्ह्यांत व्यवसायामुळे फार तर दहा-पाच कुटुंबं असतात. अशा परिस्थितीत महाराष्‍ट्रातील त्यांची ओळख हॉटेल, ऑटोमोबाइल, ट्रान्सपोर्ट व मेकॅनिकल लघुउद्योग, छोटे कुटीरोद्योग एवढीच आहे. खूप कष्ट करण्याची प्रवृत्ती आणि चिकाटी यांमुळे हा समाज व्यवसायात घट्ट रुजून राहतो.


ज्या-ज्या शहरात शीख समाज आहे, तिथे गुरुद्वार असतात. पुणे येथे सहा गुरुद्वार आहेत. नांदेड येथे तर मुख्य सचखंडबरोबरच इतरही तीन गुरुद्वार आहेत. अशा प्रत्येक ठिकाणी असणा-या गुरुद्वारांतून केवळ गुरुग्रंथसाहिबचे पठण होत नाही, तर काही समाजोपयोगी कामं होतात. शीख धर्म तत्त्वज्ञानाप्रमाणे आपल्या मिळकतीपैकी दहा टक्के खर्च समाजासाठी करायचा असतो. त्याला ते ‘दसवंत’ म्हणतात. गुरुद्वारात ‘दसवंती’तून जी रक्कम जमा होते, त्यातून काही गुरुद्वारांमार्फत हॉस्पिटल्स चालविली जातात; शाळा, महाविद्यालये चालविली जातात. विशेष म्हणजे लंगरसाहेब. ह्या लंगरमुळे प्रत्येकाला मोफत पोटभर जेवण मिळते. हा अन्नदानाचा खर्च शीख समाजातर्फेच होतो. सचखंड एक्स्प्रेसमध्ये व नांदेड येथीलच नव्हे तर सर्वच गुरुद्वारांतून असे अन्नदान होत असते. 1984 च्या दिल्ली येथील दंगलीत हजारो शीख मारले गेले, त्यांच्या अनाथ कुटुंबांच्या व मुलांच्या संगोपनासाठी पुण्या-मुंबईतील अनेक शीख बांधवांनी गुरुद्वारांमार्फत पैसे पाठवले. आजही सातत्याने हे पैसे पाठवले जात आहेत. अशा अनेक गरजूंसाठी मदतीचा उपक्रम चालू असतो. नांदेड येथे तर शीख कमिटीने आपली कितीतरी जमीन शैक्षणिक संस्थांसाठी दिली. नांदेड येथील गुरुगोविंदसिंग हॉस्पिटल तर प्रसिद्ध आहेच. इंजिनिअरिंग कॉलेजसाठीही जागा दिली आहे. आज कोणालाही एखादा मोठा कार्यक्रम करायचा असेल तर पाच हजार लोकांची सोय होऊ शकेल एवढी मोठी व्यवस्था नांदेड येथील गुरुद्वारात आहे.


शिखांनी महाराष्‍ट्रात स्थानिक समाजाशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे समाजानेही त्यांना स्वीकारले आहे. म्हणून तर पुण्याला मोहनसिंग राजपाल यांना महापौरपद प्राप्त झाले. औरंगाबाद येथे मनमोहनसिंग ओबेरॉय तर नाशिक येथे बग्गा यांनी महापौरपद भूषवले आहे. नांदेड येथे उपमहापौरपद काही दिवस शीख समाजातील व्यक्तीकडे होते. नागपूरमध्ये अटलबहादूर सिंग हे महापौर असून तेथील अनेक मराठी सांस्कृतिक उपक्रमांत ते सहभागी होतात. मराठी अस्खलित बोलणारे अटलबहादूर सिंग नागपुरात आपल्या मिश्कील स्वभावामुळेही लोकप्रिय आहेत.


महाराष्‍ट्राच्या विधानसभेत मुलुंड मतदारसंघातून तीन वेळा निवडून जाणारे भाजपचे आमदार तारासिंग आणि विधान परिषदेत काँग्रेसचे आमदार असलेले चरणजितसिंग सप्रा लोकप्रिय लोकप्रतिनिधी आहेत.
महाराष्‍ट्रात हॉटेल आणि ऑटोमोबाइल व्यवसायातच केवळ शीख नाहीत, इतरही उद्योग क्षेत्रांत दिसतात. काही मोठ्या शीख उद्योगपतींनी आपल्या व्यवसायाचे कार्यक्षेत्र महाराष्‍ट्रातही वाढवले आहे. उदा. पद्मभूषणप्राप्त राय बहादूर मोहनसिंग ओबेरॉय यांचा ‘ओबेरॉय हॉटेल्स ग्रुप’. ही भारतातील दोन नंबरची हॉटेल व्यवसायातील कंपनी आहे. ‘हिंदुस्थान लिव्हर लि.’चे मुख्य संचालक मनविंदरसिंग बंगा आहेत. अजितसिंग यांची ‘असोसिएटेड कॅप्सूल कंपनी’ फार्मसीमध्ये जगातील तीन नंबरची आहे. पुण्याजवळही त्यांचा मोठा प्लँट आहे. अनालजित सिंघ यांनी स्थापन केलेल्या ‘मॅक्स इंडिया’ आणि ‘मॅक्स न्यूयॉर्क लाइफ’ या कंपन्या सर्वपरिचित आहेत. अशा अनेक शिखांच्या कंपन्या मुंबई-पुण्यात विस्तारित आहेत. विस्तारभयास्तव ही माहिती अधिक देता येत नाही.


आपणा सर्वांनाच भारतीय व विशेषत: हिंदी सिनेमातील शिखांची माहिती असतेच. अगोदरच्या पिढीतील बलराज साहनी व दारासिंग यांचे सिनेमातील अभिनयगुण व त्यांचे गाजलेले सिनेमे आपणास माहीत आहेत. परंतु बलराज साहनी हे एकेकाळी रवींद्रनाथ टागोरांबरोबर ‘शांतिनिकेतन’मध्ये काम करत होते, तिथे ते इंग्रजी शिकवत होते. व्यक्तिगत जीवनात कम्युनिस्ट असलेल्या साहनींच्या डाव्या विचारसरणीचा प्रभाव त्यांच्या चित्रपटातूनही दिसतो. दारासिंग कुस्तीपटू म्हणून जगप्रसिद्ध. ही लोकप्रियता त्यांना सिनेमांतूनही मिळाली. एरवी सरदारजीचे जोक हा टिंगलटवाळीचा विषय असतो; परंतु विनोदाला बौद्धिक उंची देऊन समाजातील व्यंग दाखवण्याचे अतिशय अवघड काम जसपाल भट्टी यांनी केले आहे. त्यांच्या नुकत्याच झालेल्या अपघाती निधनाचे वृत्त समजल्यावर देशभर हळहळ व्यक्त झाली. मंदिरा बेदी, मंगल धिल्लन, पूनम धिल्लन, प्रिया गिल, सोनू वालिया, नीतूसिंग अशी यादी वाढतच जाईल. गुरिंदर चढ्ढा, वारिस अहलुवालिया, कुलविंदर घिर यांचे नाव हॉलीवूड पडद्यावरही चमकले आहे. जगजितसिंगांच्या आवाजाने अनेकांचे कान, मन आणि हृदयही भरून पावले आहे.


छोटासा पंजाब आणि लोकसंख्येच्या दृष्टीने तुलनेनेही छोटा समाज. परंतु आज संपूर्ण भारताचे नेतृत्व मनमोहनसिंग करत आहेत. यापूर्वी एक अर्थतज्ज्ञ म्हणून त्यांना जगभर मान्यता प्राप्त झाली आहे. ग्यानी झैलसिंग यांनी सर्वोच्च असे राष्टÑपतिपदही भूषवले आहे. इंदिरा गांधी मंत्रिमंडळातील स्वर्णसिंग, केंद्रीय मंत्री व पंजाबचे मुख्यमंत्री असलेले प्रकाशसिंग बादल, माजी गृहमंत्री बुटासिंग, सध्याचे नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया हे राष्‍ट्रीय पातळीवर गेलेले शीख नेते आहेत. कॅनडा, न्यूझीलंड, मलेशिया, अमेरिका, इंग्लंड अशा जगभरातील अनेक देशांत अनेक शीख बांधव तेथील संसद भवनात, तर काही वरिष्ठ शासकीय पदावर कार्यरत आहेत. क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल दारासिंगचा उल्लेख आलेला आहेच. रंधवा आणि मिल्खासिंगचे नाव टाळून पुढे जाता येणार नाही. उत्तम अ‍ॅथलिट असलेले जलद धावणारे मिल्खासिंग यांची ओळख ‘द फ्लाइंग सिख’ अशीच आहे. ऑलिम्पिक पदक विजेता मिल्खासिंग यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’ देऊन गौरवले आहे. प्रसिद्ध व्हॉलीबॉल खेळाडू निर्मल कौर ही त्यांची पत्नी तर जीवसिंग हा त्यांचा मुलगा गोल्फ खेळाडू. मिल्खासिंगचे सगळे कुटुंबच क्रीडामय. बिशनसिंग बेदी, हरभजनसिंग, नवज्योत सिद्धू, युवराज असे क्रिकेटमधील आणखी काही खेळाडू क्रीडाप्रेमींच्या गळ्यातील ताईत बनले आहे. बेदीच्या फिरकीचा धसका घेतलेले जगातील नामवंत फलंदाज आजही त्या आठवणीने विचलित होतात. हॉकी म्हटलं की शीख खेळाडूच डोळ्यासमोर येतात.


शिखांची ही कर्तृत्वाची चमक जीवनातील सर्वच क्षेत्रांत अधिक स्पष्ट दिसते. म्हणून ते केवळ युद्धभूमीवरच योद्धे नाहीत तर कला, क्रीडा, उद्योग, समाज, राजकारण अशा अनेक क्षेत्रांत ते योद्धे शीख आहेत. त्यांच्या लढाऊ वृत्तीची इतर क्षेत्रांतही प्रचिती येते.