आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जलव्यवस्थापनाचा गौरवशाली इतिहास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाष्पीभवनापासून पाणी वाचवण्याच्या तंत्राची माहिती करून घेण्यासाठी काही ऐतिहासिक जलव्यवस्थांचा अभ्यास उपयुक्त ठरावा. उंचीवरले पाणी भुयारांद्वारे नगरांना पुरवण्याच्या तंत्राचा वापर भारतात सतराव्या शतकापासून होत आला आहे. आदिलशाह आणि निजामशाह यांनी हे तंत्र पाण्याची कमतरता असलेल्या विजापूर आणि अहमदनगर शहरांसाठी अमलात आणले. शहरांपासून काही मैल दूर असलेल्या विहिरींचा जलस्रोत म्हणून उपयोग करण्यात आला. भूमिगत मार्गाने शहरांपर्यंत पाणी आणण्यात आले. खापरी नळ आणि बंदिस्त पाटांचे नियोजन करण्यात आले. या पाटांसाठी बोगदे खणण्यात आले. त्या काळी एखादा माणूस ये-जा करू शकेल, एवढे मोठे बोगदे बांधले जात. बोगद्यांत खळगे ठेवण्यात येत. पाण्याबरोबर वाहात आलेला गाळ खळग्यात अडकावा यासाठी हे नियोजन. ठरावीक काळाने हा गाळ काढला जाई. भूमिगत असल्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होणे टळत असे. पेशव्यांनी याच तंत्राचा उपयोग पुण्यातील पाणीपुरवठ्यासाठी केला. थोड्या उंचीवरील कात्रज येथे दोन तलाव. त्यांचे पाणी (कात्रज तलावाची आजची अवस्था हा वेगळा चिंतेचा विषय) भुयाराद्वारे पुण्यनगरीत आणण्यात आले. नंतर शहरात सदाशिव, फडके, बाहुल्याचा आदी हौदांत ते साठवले जाई.
औरंगाबादची ‘नहर-ए-अंबरी’ ही अशीच ऐतिहासिक जलव्यवस्था. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीचा मलिक अंबरच्या जमान्यातला ‘नहर-ए-अंबरी’ म्हणून ओळखला जाणारा साधारणपणे 6 कि.मी. लांबीचा कालवा आणि त्या काठचा ‘बीबी का मकबरा’ हा इतिहास. त्या वेळी नदीवर बांध घालून भुयारी खापरी कालवे बांधले गेले. थोड्या उंचीवर पाणी अडवून वाटेवर विटांचा मनोरा बांधण्यात आला. त्यातून सायफन म्हणजेच वासुदेव प्याला (पाणी समपातळीत राहते या गुणधर्मानुसार ते शून्य ऊर्जा तत्त्वाने वर चढवता येते) तत्त्वाने शहराला पाणी पुरवले गेले. तलावाकाठी काही मनोरे बांधले गेले. साडेचारशे वर्षांपूर्वीचा पुरातन मनोरा शहरातील सलीम अली तलावाकाठी आजही या इतिहासाची साक्ष देतो. याच पाण्यावर बीबी का मकब-यातील पाणचक्की चालते. बारा फूट उंचीवरून चक्कीवर पाणी पडत असते आणि दळणाचे जाते फिरत असते. याच पाण्याने महालातले कारंजे नाचवले गेले. औरंगाबाद हे गरम हवेचे ठिकाण. महालाच्या चारी बाजूला पाण्याची टाकी, कारंज्यातून उडणारे तुषार यामुळे गारवा निर्माण होई. ही थंड हवा महालाच्या उष्णता नियोजनासाठी उपयुक्त ठरे. वाळा वा चिकाच्या पडद्याद्वारे हे नियोजन केले जाई.
भूजल पातळी वाढवण्याच्या तंत्राचा अवलंब आजही प्रायोगिक तत्त्वावर ब-याच ठिकाणी, विशेषत: पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या प्रदेशांत चालू आहेत. भूजल पातळी वाढवण्याचे तंत्र अभ्यासण्यासाठी कच्छचा दौरा उपयुक्त ठरू शकतो. कच्छमधील मुंद्रा-मांडवी भागात डोंगर उंचवट्यावरून वाहणारे नाले, नद्या अडवून जमिनीत पाणी जिरवून भूजल पातळी वाढवण्याचे तंत्र ‘विवेकानंद ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट’ने विकसित केले. मुहूर्तमेढ भूज येथे करण्यात आली. कच्छमध्ये एकूण 97 लहानमोठ्या नदी- नाल्यांचे प्रवाह वाहतात. त्यांचे पुनरुज्जीवन करून भूजल पातळी वाढवण्याच्या प्रयत्नात संस्था व्यग्र आहे. ‘साथी हाथ बढाना, साथी रे’ची त्याला साथ आहे. काहीशा अशाच तंत्राचा वापर करून नानाजी देशमुखांनी चित्रकूट परिसरातील अनेक खेड्यांना संजीवनी दिली.
जगातले आश्चर्य ठरलेली अशी जलव्यवस्था गोबीच्या वाळवटांत साकारण्यात आली. या वाळवंटातील पश्चिम चीन भागातील तुर्फा हे समुद्रसपाटीखाली 154 मीटरवरील गाव. वर बर्फाळ रांगा. उन्हाळ्यात वितळणारे बर्फ भुयारी मार्गाद्वारे तुर्फाकडे वळवण्यात आले. निगराणीसाठी बोगद्यात ठरावीक अंतरावर मुखे खोलण्यात आली. गावात ते साठवण्यात आले. एके काळी वैराण असलेला तुर्फा परिसर आज ‘ग्रेप व्हॅली’ म्हणून ओळखला जातो. ‘सतत वाहते उदंड पाणी, कुणी न वळवुनी नेई रानी; आळशास मग व्हावी कैसी गंगा फलदायी?’ गदिमांच्या पंक्ती येथे सार्थ होतात. टेकड्यांच्या प्रदेशांत पाण्याचे संवर्धन करण्यासाठी आजमितीस समस्तर पातळी चर (लेव्हल ट्रेंचेस) तंत्र विकसित होत आहे. रायगड जिल्ह्यात खोपोली-पाली भागात तसेच अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अशा रचना अभ्यासता येतील. यात गतिमान पाणी जमिनीत जिरवून खालच्या पातळीवर त्याचे जतन करणे महत्त्वाचे.