आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआपल्या शरीरावर आणि सभोवतालच्या वस्तूवर हवेचा दाब आहे. पण हवेच्या दाबास असलेला विरोध तेवढाच असल्याने हवेचा दाब किती आहे याची कल्पना येत नाही. आजच्या प्रयोगामुळे तुम्हाला हवेला दाब आहे याची खात्री पटेल. हवेच्या दाबाचा आजचा प्रयोग करताना थोडी काळजी घेण्याची गरज आहे. शक्यतो घरातील मोठ्या व्यक्तींच्या देखरेखीखाली हा प्रयोग केल्यास अधिक चांगले.
प्रयोगाचे साहित्य अगदी किरकोळ आहे. रिकामे सॉफ्ट ड्रिंकचे अॅल्युमिनियम किंवा मेटलचे दोन डबे. यांचे आकारमान 300 मि.लि. असते. दोन ते तीन लिटर पाणी बसेल असे मोठ्या तोंडाचे उथळ भांडे, गरम वस्तू हाताळण्यासाठीचा स्वयंपाकघरातील चिमटा.
आता प्रत्यक्ष प्रयोग. भांड्यामध्ये दोन लिटर पाणी भरा. सॉफ्ट ड्रिंक पिताना तो कॅन आपण उघडलेला असतो. जेथून सॉफ्ट ड्रिंक बाहेर येते तेथे असलेल्या छिद्रातून दोन-तीन चमचे पाणी कॅनमध्ये घाला. चिमट्याने कॅन पकडा आणि कॅन गॅस शेगडीवर तापवा. आतील पाणी उकळत असल्याचे तुम्हाला कळेल. जेथून पाणी घातले तेथून वाफ बाहेर यायला लागेल. गरम वाफा येत असता हा कॅन आता थंड पाण्यात उलटा बुडवा. जेथून तुम्ही पाणी घातले ती बाजू थंड पाण्यात बुडाली पाहिजे.
आता आश्चर्यचकित होण्याची पाळी तुमची आहे. आवाज करीत कॅन कागदाचा असल्याप्रमाणे चुरगाळलेला दिसेल. हा कॅन चुरगाळण्याचे काय कारण असेल बरे? हाताने सुद्धा रिकामा कॅन चुरगाळता येतो. कॅन चुरगाळताना कॅनच्या बाहेर दिलेला दाब आतील दाबाहून अधिक असण्याची आवश्यकता असते. कॅनमधील पाणी उकळून बाहेर पडताना त्याची वाफ झाली. ही वाफ बाहेर पडताना कॅनच्या आतील गरम हवा बाहेर पडली. आतील दाब कमी झाला. अर्थात आतील सर्व हवा कधीच बाहेर पडत नाही. जेव्हा तुम्ही कॅन उलटा करून थंड पाण्यात बुडवला तेव्हा आतील वाफेचे पाणी झाले. कॅनच्या आत अर्धवट पोकळी तयार झाल्याने दाब कमी झाला. त्यामानाने बाहेरील हवेचा दाब प्रचंड असल्याने कॅनचा चोळामोळा झाला. बाहेरील हवेच्या दाबामुळे कॅन चुरगाळला गेला. दर चौ.सेंमी पृष्ठभागावर सुमारे एक किलो एवढा हवेचा दाब समुद्र सपाटीला असतो. 100 चौ.सेंमी पृष्ठभागाच्या सॉफ्ट ड्रिंक कॅनवर हा दाब 100 किलो एवढा होतो.
madwanna@hotmail.com
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.