आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही आणि त्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परवा आमची भिशी पार्टी होतीझ्. आम्ही मनसोक्त गप्पा मारत खळखळून हसत होतो, तेव्हा माझ्या मैत्रिणीची सून म्हणाली, ‘काकू, किती मस्त एंजॉय करता तुम्ही सगळ्याजणी मिळून. आमच्या भिशीत तर आम्हाला एकमेकींशी मनमोकळं बोलायलासुद्धा वेळ नसतो. मुलांचे अभ्यास, क्लास, आमचे बिझी शेड्युल यातून आम्ही जेमतेम हजेरी लावून जातो. सुटी अशी आम्हाला नसतेच. मग तुमच्यासारखं गप्पा मारायला, हसायला आम्हाला वेळच नसतो. तुमच्या पिढीकडे बघून खरंच खूप छान वाटतं. आम्हाला असा वेळ कधी मिळेल की नाही कुणास ठाऊक? बघू तुमच्या वयाचे झाल्यावर.’
ती बिचारी असा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून गेली, पण या पिढीच्या नशिबी रिकामा वेळ असेल का? ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ आणि ‘जंगलाला आग लागली पळा पळा’ असे आजच्या पिढीचे जीवन. आम्ही आमचे जीवन खूप छान उपभोगले. मैत्रिणी, महिला मंडळ, छोट्या-मोठ्या सहली, नातेवाईक या सा-या गोतावळ्यात आमचे जीवन खूप मजेत गेले. आमच्या पिढीतील मध्यमवर्गीय बायकांना तसा मागच्या पिढीसारखा सासुरवास, जाच नव्हता. आम्ही तशा खूप स्वतंत्र विचारसरणीच्या व स्वातंत्र्य उपभोगणा-या काळातल्या. एकत्र किंवा विभक्त कुटुंबातल्या असलो तरी मोकळ्या वातावरणातल्या. आई-सासूसारख्या परस्वाधीनही नव्हतो आणि घरसंसार व मुले या विश्वात समाधानाने राहणा-याही होतो. आमच्यातील बोटावर मोजण्याइतक्या बायका नोकरी करणा-या होत्या, बाकी सगळ्या पदवीधर होऊन गृहिणीच होत्या. त्यामुळे वेळही भरपूर होता.
मुलांचे बालपण, तरुणपण, मित्र-मैत्रिणी, अभ्यास खेळ, स्पर्धा या सा-यांचा आम्ही आनंद घेतला. पती-पत्नीमधील सहवासही आम्ही भरभरून घेतला. आमच्याजवळ खूप पैसा कधीच नव्हता, पण दैनंदिन जीवनातील छोट्या-मोठ्या गरजा, हौसेमौजेला पुरेसा होता. त्यामुळे संसारातील प्रत्येक खरेदी, घर, गाडी, मुलांचे शिक्षण यांच्यावर केलेल्या खर्चाची किंमत होती व पैशाची किंमत असल्यामुळे त्यात आनंदही भरपूर होता.
आजच्या मुलांकडे अमाप पैसा आहे, कमी आहे ती वेळेची. आजच्या मुलींनी स्वत:च्या बुद्धिमत्तेवर अनेक क्षेत्रं पादाक्रांत केली, पण घर, संसार, मुले यांची जबाबदारी काही त्यांची कमी झाली नाही. उलट करिअर व घर ही तारेवरची कसरत त्यांना सतत पार पाडावी लागते. ‘सुपरमॉम’ बनण्याच्या नादात त्या त्यांचे आयुष्यच जगायचे विसरत चालल्यात असे वाटायला लागते. करिअर, पैसा यांचे समाधान त्यांना मिळत असेल, पण कौटुंबिक जीवन, मुलांचा सहवास, पती-पत्नीचे सहजीवन या गोष्टी मात्र त्यांना फारच अवघड होत चालल्यात.
त्यांची घरं एकदम पॉश असतात. इंटिरिअरही लाजवाब असते, पण त्या घरात दिवसभर वावर मात्र फक्त मजुरांसाठीचाच असतो. घरात उंची वस्तू खचाखच भरलेल्या असतात, पण त्याचा उपभोग घ्यायला मात्र कुणाला वेळ नसतो.
पैसा आणि करिअरच्या चक्रव्यूहात आजची पिढी अडकत चाललीय, त्यातून बाहेर पडणे त्यांना मुश्किल होत चाललेय. या चक्रव्यूहात अडकलेल्या सगळ्याच व्यक्ती समाधानी असे नाही, काहींना त्यातून बाहेरही पडायचे आहे. पण त्यांना आजच्या स्पर्धेच्या युगामुळे मनात असूनही बाहेर पडता येत नाही. ‘शो मस्ट गो आॅन’ असे म्हणत प्रवाहाबरोबर ही पिढी धावत चाललीय.
मुलींची या सगळ्यात जास्त दयनीय अवस्था आहे. प्रत्येक ठिकाणी ‘मैं हूँ ना’ म्हणत त्या तारेवरची कसरत करत राहतात व त्यातून स्वत:ला हरवून बसतात. स्वत:च्या शारीरिक, मानसिक, भावनिक गरजांकडे दुर्लक्ष करून घाण्याला जुंपलेल्या बैलाप्रमाणे जगत आहेत.
घरून पाठिंबा नसेल तर त्याचा परिणाम तिच्या आरोग्यावर होतो. मूल न होण्याच्या वाढत्या समस्येला काही अंशी ही परिस्थिती कारणीभूत ठरत आहे.
सारे काही करण्याच्या नादात स्वत:कडे दुर्लक्ष न करण्यातच मुलींचे शहाणपण आहे. आयुष्यातला प्रत्येक टप्पा जिवंतपणे जगण्यातच पती-पत्नी व मुलांचे कौटुंबिक जीवन अवलंबून आहे व हेच खरे जीवन आहे. आजच्या पिढीचा बुद्ध्यांक खूप आहे, पण भावनांक कमी झालेला आढळत आहे. त्यामुळेच काळजी वाटते की, हळूहळू परस्परांमधील प्रेम, माया, आपुलकी कमी होईल की काय?
शिक्षणाने मुलगी कर्तृत्ववान झाली, यशाची अनेक शिखरे तिने सर केली, याचे खूप कौतुक आहे, पण यात तिची ससेहोलपट होताना दिसते, व्यक्तिपरत्वे ती कमी-जास्त होताना दिसते. यातून थोडासा मार्ग काढायचा ठरवल्यास घरात स्त्रीच्या बरोबरीने पुरुषानेही मदत केली पाहिजे, मुलांची, संसाराची जबाबदारी बरोबरीने उचलली पाहिजे. तरच स्त्रियांचा विकास होईल व घरही सुव्यवस्थित चालू राहील.
एक मैत्रीण म्हणाली, आज आयटी क्षेत्रातल्या मुलींकडे पाहिले की वाटते, किती त्यांची धावपळ. सकाळी नऊला घराबाहेर पडायचे ते रात्री नऊलाच घरी परत. थकलेल्या चेह-याने, मळलेल्या कपड्याने गलितगात्र झालेल्या या मुलींकडे बघून वाटते की यांना शिकवलेच नसते तर बरे झाले असते.
मुलींनाही त्यांच्या बुद्धिमत्तेप्रमाणे करिअरचा हक्क आहे, पण जीवनाचा आनंद घेणे, जीवन जगणे हाही मूलभूत हक्क आहे आणि तो सर्वात महत्त्वाचा आहे. प्रत्येक पिढीत प्रत्येक व्यक्तीजवळ कशा प्रकारे जीवन जगायचे याचे अनेक पर्याय असतात. कोणते पर्याय निवडायचे व कोणत्या गोष्टीला केव्हा व किती महत्त्व द्यायचे याची निवड प्रत्येकाने आपली आपली करायची असते. आनंद घेणे व आनंद देणे, सुख-समाधान हे ज्याचे त्याचे वेगवेगळे असते. तेव्हा एकाच ध्येयाच्या, गोष्टीच्या मागे न लागता तारतम्य भावाने आपले स्वत:चे व कुटुंबाचे सुख कशात आहे, याचा विचार मात्र जरूर व्हायला हवा.