आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'कुर्यात सदा मंगलम्'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सकाळचे आठ वाजत आलेले. आज राजेशच्या चुलतभावाचं लग्न होतं. एवढ्या कडक उन्हाळ्यात लग्न होतं म्हणून स्वातीची चिडचिड होत होती. उन्हाळ्यात लग्न काढण्याची काय गरज होती? पाण्याचा पत्ता नाही, ऊन मी म्हणतंय, आणि यांना लग्नकार्य सुचतायत. नाही जावं तर सासूबाई कच्चं खाऊन टाकतील. ती किरकिर करत असताना राजेशने ऐकलं आणि तो म्हणाला, ‘वा, तुझ्या माहेरच्या माणसांना तर फारच कळतं नाही का?’
‘उगीच माझ्या माहेरच्या माणसांना काही म्हणायचं नाही हं राजेश.’
‘का? का नाही म्हणायचं? माणूसघाणे लेकाचे, तुम्हा लोकांना माणसंच नकोत.’
‘हो हो, तुम्ही तर फारच प्रेमळ नाही का?’ स्वाती.
‘हो आहोतच आम्ही प्रेमळ मुळी.’
‘हं म्हणे प्रेमळ, केवढ्या खेकसून गेल्या काल माझ्यावर सासूबाई. म्हणाल्या चांगली भारी साडी नेस, गरम होतंय म्हणून उगीच साधी साडी नको, शालू नेस. हे तुझं माहेरचं लग्न नाही, मोहित्यांचं लग्न आहे म्हटलं. अन् ते केस आवर जरा, काय बाई ते केस. चिमण्यांनी जणू घरटं केलंय डोक्यावर. ते तेल लावून आवर, जरा नीट वेणीबिणी घाल अन् मग ये लग्नाला.’
‘मग बरोबरच आहे आईचं. चिमणीनं घरट बांधावं असेच दिसतात तुझे केस.’
‘हो का? तुला अन् तुझ्या घरच्यांना काय कळत रे स्टाइलमधलं? पार्लरमध्ये जाऊन एवढे छान कर्ल करून आले, अन् तुम्हाला चिमणीचं घरट दिसतं. असं वाटलं फाडफाड बोलावं तुझ्या आईला, पण काय करू, बसले गुपचूप. सून आहे ना मी. पूर्वजन्मीचं पाप, दुसरं काय? काय बाई यांची नाटकं, दुसºयांच्या समोर आपण सुनांचे किती लाड करतो असं दाखवायचं अन् घरी हे असं.’
खरं तर स्वाती आणखी बोलणार होती. पण मनात म्हणाली, जाऊ दे, लग्नाला उशीर झाला तर आणखीन बोलणी खावी लागतील. ती पटकन तयार झाली नि एकदाची स्वाती, राजेश आणि तिचा मुलगा सोनू यांची स्वारी कार्यालयात पोहोचली. नाष्टा संपत आला होता. कसाबसा या दोघांनी नाष्टा केला. सोनूला काही तो आवडला नाही. राजेश आपल्या भावांबरोबर वरात निघाली म्हणून निघून गेला. भर ऊन, कार्यालयात चार-पाच कूलर लावलेले होते. त्याच्यासमोर बसण्याची गडबड चालली होती. स्वातीलाही तिथे जावंसं वाटत होतं. घामाच्या धारांनी ती निथळत होती. अजून किती वेळ वरात चालणार होती कोण जाणे? दारात वरात आल्यावरही बराच वेळ नाचणं चालू होतं. त्या डीजेच्या आवाजानं सगळं कार्यालय हादरत होतं आणि वरातीतले सगळे बेधुंद होऊन नाचत होते. त्यात राजेशही होता. त्याचं ते नाचणं स्वातीला असह्य होत होतं. ती खाणाखुणा करून त्याला नाचू नको असं सांगत होती, पण त्याचं तिच्याकडे मुळी लक्षच नव्हतं. सगळे घामाघूम झाले होते, नाचून नाचून दमले होते. कशी तरी नवरदेवाची स्वारी आत आली आणि नवरदेव तिथंच उभा राहिला. आता काय झालं? जो तो एकमेकांना विचारू लागला. तर विहीणबार्इंना जोवर मोत्याच्या अक्षता मिळत नाहीत तोवर नवरदेव हलणार नाही असं कळलं. आता इतक्या ऐन वेळी मोत्याच्या अक्षता कुठून आणणार? इकडे स्वाती हैराण झाली होती. इतका जड शालू, त्यावर दागिने, घाम, अन् त्यात भर म्हणजे सोनूने मोठ्यांदा भोकाड पसरलं, ‘मम्मी मला भूक लागली. जेवायला दे.’ ‘आता त्याला जेवायला कुठून देऊ. अजून तर लग्न लागायचा पत्ता नाही.’ त्याला रडताना पाहून तिची सासू तरातरा आली. म्हणाली, ‘तुला ऐकू येईना का? केवढा रडतोय तो.’
‘मग काय करू’? स्वाती वैतागाने म्हणाली.
‘अगं त्याला काय पाहिजे ते दे नं.’
‘त्याला जेवायला पाहिजे. अजून इथं लग्न लागायचा पत्ता नाही आणि त्याला जेवायला कशी देऊ?’
‘अगं आपण मुलाकडचे नं? मोहित्यांची सून ना तू. एवढी कशी गं नेभळट तू? जा, त्या लोकांना सांग आणि त्याला जेवायला घाल.’ सासूबाई खेकसल्या.
‘हे पाहा, मी काही आधी जाणार नाही. तुम्ही फार हुशार आहात ना, तुम्हीच घाला तुमच्या नातवाला जेवायला.’
त्या मोत्याच्या अक्षतांची कुठून सोय झाली माहिती नाही, पण एकदाचं लग्न लागलं. टाळी वाजली आणि मुलाकडच्या मंडळींनी हजार फटाक्यांची माळ लावली. त्याचा आवाज एवढा मोठा होता की सोनू आणखीनच जोरात रडायला लागला. इकडे नवरदेव नवरीची कोण आधी माळ घालणार म्हणून स्पर्धा लागली होती. मुलीकडील लोक नवरीला आणि मुलाकडचे लोक नवरदेवाला उंच उचलत होते. त्या गडबडीत नवरीच्या हातून दुसºयाच्याच गळ्यात माळ पडणार, एवढ्यात कुणीतरी ओरडलं, ‘अहो अहो, इकडे इकडे नवरदेव इकडे आहे.’ आणि एकदाचं दोघांनी एकमेकांना माळा घातल्या. चला एकदाचं लग्न लागलं.
मग सुरू झाले मानपान. ‘नवºयामुलाकडील सगळ्या बायकांना जरीच्या भारीच्या साड्या नेसवायला पाहिजेत,’ असं स्वातीच्या चुलत सासूबार्इंनी सांगितलं. ‘बोलणीत असं काही ठरलं नव्हतं. तेव्हा आम्ही हे करणार नाही,’ मुलीकडच्यांनीही ठणकावून सांगितलं. त्यावर जोवर तुम्ही साड्या नेसवत नाही तोवर आम्ही जेवायला येणार नाही, असे मुलाकडच्यांनी बजावले. दोन्हीकडून वादावादी सुरू झाली. एवढा वेळ शांत बसलेली नवरी मुलगी उठली. उठताना तिने नवरदेवाला खुणावलं. दोघंही बाजूला जाऊन काय बोलली माहीत नाही. पण नवरदेव आला आणि त्यानं त्याच्या आईच्या कानात काहीतरी सांगितले. काकू आ वासून त्याच्याकडे पाहतच राहिल्या.
‘काय झालं?’ काकांनी विचारलं. जवळ जात काकूंनी त्यांच्या कानात काहीतरी सांगितलं अन् काका एकदम शांत झाले. साड्याबिड्या सगळं जागेवरच राहिलं. काय झालं जो तो विचारू लागला. पण खरं काय ते कोणालाच कळेना. शेवटी जेवणं झाली आणि वर्‍हाड जिकडे तिकडे गेले. पण ती नवरी मुलगी काय म्हणाली हे जाणून घेण्याची स्वातीला फार उत्सुकता लागली होती. पण आता विचारावं कुणाला? शेवटी तिनं घरी आल्यावर राजेशलाच विचारलं. त्यानं सांगितल, ‘ती नवरी मुलगी म्हणाली की, आता तुम्ही जास्त कुरबुर केलीत तर मी तुमच्याबरोबर नांदायला येणार नाही.’ हे ऐकून स्वाती जोरजोरात हसायला लागली. राजेश जाम वैतागला. ‘अगं इथं आमची एवढी फजिती झाली अन् तू हसतेस काय?’
‘अहो हसू नको तर काय करू? आमच्या एवढ्या प्रेमळ सासूबाई, मुलीकडची भारीची जरीची साडी येणार म्हणून किती आनंदात होत्या. त्यावर विरजण पडलं की काय. पण काकूंना हुशार सून मिळाली. जे आम्हाला दहा वर्षे झाली लग्न होऊन जमलं नाही ते तिनं लग्नाच्या दिवशीच करून दाखवलं. खरंच ग्रेट आहे हं मुलगी. नाही तर आम्ही? आपल्या लग्नातही तुझ्या आईनी सगळ्यांना साड्या नेसवायलाच लावल्या नं.’ ‘हो, पण साड्या नेसवताना एरंडेल प्याल्यासारखा चेहरा केला होता आमच्या सासूबार्इंनी.’
‘हो तर साडीबरोबर आरतीही ओवाळायला हवी होती का?’
‘आता तुझ्या आईबद्दल काय बोलावं? नाचता येईना अंगण वाकडं अशी तुझ्या आईची तर्‍हा.’
‘माझ्या आईला काही म्हणालास तर बघं हं आता. नाहीतर मीसुद्धा तुला सोडून माहेरी निघून जाईन,’ म्हणत स्वाती रडायला लागली.
‘अगं बाई, मी मस्करी केली तुझी, माफ कर मला आणि जाऊ दे आता, ते लग्न झालं. ती नवरी नांदायला गेलीच ना? मग आपण कशाला भांडायचं?’
खरंच स्वातीलाही ते पटलं. शेवटी ‘कुर्यात सदा मंगलम्’ झाले हे मात्र खरंच. लग्नातल्या सगळ्या गोष्टी आठवत ती निद्रादेवीच्या अधीन झाली.