आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुघाची तहान ताकावर!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘‘मला जावई हवा तो ऋग्वेदसारखा! सालस, सुंदर आणि हो, नम्र!’’ सौम्याच्या आईने ठणकावून सांगितलं. ‘‘अगं आई, तो टीव्हीतला कलाकार आहे. कशावरून तो सालस, सुंदर आणि नम्र आहे? लहान मुलांसारखं बोलू नकोस. तो त्याचा रोल आहे!’’ सौम्या वैतागून बोलली. ‘‘पण कशावरून तो तसा नसेलच? तो असा असेलही.’’ ‘‘जाऊ दे, मला यावर काही बोलायचं नाहीये!’’ एवढं बोलून सौम्या आॅफिसला निघाली.
‘तू तुळस माझ्या अंगणातली’ सौम्याच्या आईची आवडती मालिका होती. तशी मालिका काही वाईट नव्हती, म्हणजे इतर मालिकांसारखी ही मालिकादेखील बरेच दिवस चालू होती. त्या मालिकेत सुंदर सुंदर घरं होती, सुंदर सुंदर साड्या होत्या, सुंदर सुंदर मुली होत्या आणि सुंदर सुंदर मुलगे होते. त्यातला तिचा आवडता हीरो होता ऋग्वेद, खूप सालस आणि नम्र. सौम्याच्या आईला तो फार आवडायचा. इतका की तिने अगदी ठरवलेलं आपल्याला जावई हवा तर ऋग्वेदसारखा!
अतिरेक तर तेव्हा झाला जेव्हा मालिकेतली ऋग्वेदच्या परिस्थितीची तिने सौम्याच्या परिस्थितीशी तुलना केली. मालिकेत ऋग्वेदचं लग्न होत नव्हतं, किती मुली पाहिल्या, किती ठिकाणी विवाह नोंदणी केली, नातेवाइकांना स्थळं शोधायला सांगितली. पण काही उपयोग झाला नाही. सौम्याच्या आईला ऋग्वेदची ही अवस्था पाहावली नाही, इतक्या गोंडस आणि नम्र मुलाचं लग्न होत नाहीये. का? पटकन तिच्या तोंडून उद्गार निघाले, ‘‘या ऋग्वेदचं बाई आमच्या सौम्यासारखं झालंय, नाकीडोळी व्यवस्थित, गुणांनी सुसंस्कृत पण दोघांचंही लग्न काही जमत नाहीये!’’
‘‘आई, बरीयेस ना!’’ सौम्या चवताळली, ‘‘सीरियल आहे ती. कुठेही! काहीही!’’
‘‘पण काही चुकीचं बोलले का मी? तसंच तर आहे तुझंही! तूच बोल, किती मुलगे पाहिले तुझ्यासाठी? एकतरी जमलं का? अगं टीव्हीवर काही खोटं दाखवत नाही, आपल्याच कथा आहेत या!’’
‘‘हो? आता पुरे झालं! इथे बोललीस ते ठीक आहे, चारचौघात प्लीज असे डायलॉग मारू नकोस!’’
सौम्याच्या आईची ऋग्वेदबद्दलची सहानुभूती दिवसेंदिवस वाढतच चालली होती. त्यातच भर म्हणून की काय, ‘तू तुळस माझ्या अंगणातली’वाल्यांनी एक स्पर्धा आयोजित केली, आणि ही स्पर्धा इतकी आगळीवेगळी होती की विचारू नका-
‘‘ऋग्वेदचं लग्न जुळवण्यासाठी दांडेकर परिवार निघालाय मुलीच्या शोधात. दांडेकरांना हवीये एक सुशील आणि संस्कारी मुलगी सून म्हणून! आणि ती सून तुम्हीही होऊ शकता. तुम्हाला फक्त इतकंच करायचंय की आम्हाला फक्त दीडशे शब्दांत लिहून पाठवा की तुम्ही दांडेकरांची उत्तम सून का होऊ शकता. आम्हाला जर तुमचं उत्तर आवडलं तर आम्ही तुम्हाला बोलावू आॅडिशनसाठी, जिथे तुमची अ‍ॅक्टिंग स्किल तपासली जाईल. जर जिंकलात तर तुम्हाला चान्स मिळेल ‘तू तुळस माझ्या अंगणातली’ या मालिकेत दांडेकरांची सून होण्याचा! ही संधी सोडू नका. एक चांगलं उत्तर आणि तुमचा अभिनय तुम्हाला बनवू शकतो रुपेरी पडद्याची तारका!’’
आता हे वेगळं सांगायला नको की काही सेकंदांतच सौम्याच्या आईने मनोराज्यांचे झेंडे अटकेपार लावले. संध्याकाळी सौम्या घरी आली तर तिला छान उपमा आणि गरम गरम चहा दिला, तिच्या बॅगेतला तिचा डबा काढून ठेवला, गरज नसताना! घरात टीव्ही सुरू होताच. आणि तेवढ्यात त्यावर ही जाहिरात पुन्हा एकदा झळकली. आईचा आजवरचा अनुभव आठवताच सौम्यालाही लक्षात आलं की आई तिला काय विचारेल. तिने आधीच उत्तर दिलं, ‘‘तू मला जर या स्पर्धेत भाग घ्यायला लावलास, तर मी ... तर मी... त्या सूर्यकांत हलवायाशी लग्न करेन. तू त्या शेजारच्या मेघाला दत्तक घे, तिला आवडतो ऋग्वेद.’’
काही बोलायच्या आतच आपल्या प्लॅनचा गाशा गुंडाळलेला पाहून सौम्याची आई वैतागली. आणि कामाला लागली- ‘मेघा, खरंच! ए मेघा,’ मेघाला हाका मारत, ‘तू पाहिलीस का ती अ‍ॅड, ऋग्वेदच्या लग्नाची!’
पलीकडल्या घरातून मेघा, ‘हो काकू, पाहिली. मी करेन अप्लाय. थोडी फार अ‍ॅक्टिंग येते मला.’ ‘अगं, अ‍ॅक्टिंग कोण बघतं? तू दिसायला छान आहेस, टीव्हीवर छान दिसशील.’
पण डोक्यातलं विचारचक्र थांबणं इतकं सोप्पं नव्हतं. तिला सारखं वाटत होतं की सौम्याने किमान एकदा तरी हा प्रयत्न करावा, कोणासाठी नाही तर अ‍ॅट लीस्ट स्वत:च्या आईसाठी तरी!
नंतर आईला त्या जाहिरातीची आठवण येत होती. शेवटी न राहवून तिने एक कागद घेतला, एक पेन घेतलं आणि दीडशे शब्दांत लिहून पाठवलं की सौम्या ऋग्वेदची बायको म्हणून कशी शोभेल! संध्याकाळी जाऊन टपालपेटीत टाकूनही आली. तेव्हा कुठे तिच्या मनाला उसंत मिळाली आणि शांतपणे कामाला लागली. पण मनात धाकधूक होती की ‘आपण जिंकलो तर सौम्याला अ‍ॅक्टिंगसाठी जावं लागणार आणि ती जाणार नाही! प्लॅन तर तसाही फेलच होणार आहे, पण एक मनाला शांती! जर समजा जिंकल्यावर सौम्याचं मन बदललं तर! कदाचित ती तयारही होईल!’ असं स्वत:चं सांत्वन करून ती शांत झाली.
महिनाभराने स्पर्धेचा निकाल लागला. सौम्या काही सिलेक्ट झाली नाही. खरं तर सौम्याच्या आईला हायसं वाटायला पाहिजे होतं, पण नाही, ती खूप वैतागली होती. तशी तर मेघाही सिलेक्ट झाली नव्हती, पण शेवटी आपलं दु:ख हे नेहमी इतरांपेक्षा वेगळं आणि मोठं असतं! शेवटी काय करायचं, ते तिने केलं. मेघाच्या मदतीने म्हणा आणि योगायोगाने म्हणा तिने ऋग्वेदच्या घरचा पत्ता शोधला. त्यानंतरचे बरेच दिवस आई खूप शांत होती, आणि ते पाहून सौम्याही शांत होती.
पण थोड्या दिवसांनी आईच्या या समाधानी शांततेचा उलगडा झालाच. एकदा सौम्या थोडीशी शॉपिंग करून परत येत रस्त्याने फोनवर बोलत येत होती. मागून एक गाडी आली, फोनवर असल्याने सौम्याने न बघताच रस्ता क्रॉस केला, अर्थातच गाडीने सौम्याला ठोकलं आणि मग रस्त्यावर गोंधळ माजला. लोक गाडीवाल्याला खाऊ की गिळू करतील त्याआधीच सौम्याला त्या गाडीवाल्यानेच मदत केली, आणि आश्चर्य ते काय! गाडीचा मालक चक्क दांडेकरांचा ऋग्वेद! थोडंफार खरचटल्याने आणि थोडासा मुका मार लागल्याने तिला या आश्चर्याकडे लक्ष देता आलं. पण ऋग्वेद खरंच खूप खानदानी हो! सौम्याला त्याने जवळच्या दवाखान्यात नेलं, उपचार केले. दहा वेळा माफी मागितली- ‘‘खरंच मला माफ करा, असं कधी होत नाही हो, पहिल्यांदाच झालं.’’
‘‘एक मिनिट, आधी मला अहो म्हणणं थांबवा. मला म्हातारं झाल्यासारखं वाटतं! माझं नाव सौम्या, तुझं नाव ऋग्वेद. बोल.’’ सौम्याने वातावरण फ्री केलं.
‘‘हो, मलाही सवय नाहीये! पण खूप गोंधळ झाला हो. मला वाटलं ते लोक मला आता मारतात की काय. पण तू म्हटलंस की मध्ये आलीस आणि म्हटलंस तुझी चूक होती, म्हणून वाचलो. नाहीतर मेलोच असतो.’’ ऋग्वेद थोडा काळजीने बोलला.
‘‘कसा मेला असतास? माझ्या आईने जीव नाही का घेतला असता माझा! तिच्या नजरेतला आदर्श मुलगा आहेस तू! फॅन आहे तुझी!’’ सौम्या अगदी टोलेबाजी करत होती.
‘‘ओह, छान! अ‍ॅक्च्युअली, त्यामुळेच हा अ‍ॅक्सिडेंट झाला. काही काही फॅन्स इतके विचित्र असतात ना काय सांगू यार! डोकं फिरतं! आज सकाळीच कोणीतरी मला एक पत्र पाठवलं. आमच्या सीरियलने एक जाहिरात केलेली...’’ त्याचं बोलणं तोडत सौम्या म्हणाली- ‘‘हो हो सगळं माहितीये. माझी आई पण होती माझ्यामागे जा ना तू जा ना तू.’’
‘‘हो तर अशीच एका बाईची मुलगी हरली, त्या आईने रागात पत्र लिहिलं.’’ ऋग्वेदने ते पत्र सौम्याला दाखवलं. सौम्या पत्र पाहून गार पडली. ते तिच्या आईनेच लिहिलं होतं अगदी स्वत:चं नाव टाकून. फक्त सौम्याचं नाव नव्हतं तीच काय ती तसल्ली! आईने फार रागाने आणि फार दु:खाने ते पत्र लिहिलं होतं.
‘‘काय ना, आया अगदी अ‍ॅडिक्ट होतात ना मग ते असं होतं!’’ इति सौम्या.
नंतर थोडी विश्रांती घेऊन सौम्या तिथून निघाली आणि त्याला थँक्स म्हटलं. मग तो त्याच्या रस्त्याला आणि ही तिच्या रस्त्याला. घरी पोहोचल्यावर तिने आईला सगळा प्रकार सांगितला. आई अगदी थक्क झाली. तिला काय बोलावं तेच कळत नव्हतं. सगळ्या इमोशन्स मिक्स झालेल्या! संध्याकाळी आईच्या मैत्रिणी सौम्याला बघायला आल्या, सौम्याची चौकशी केली आणि अर्थातच त्या चौकशीची उत्तर आईने दिली - भावपूर्ण उत्साहात. ‘‘अगं तो ऋग्वेद काय घाबरला विचारूच नकोस. पण मग हिने सांभाळून घेतलं!’’ आईच्या कथा सुरू झाल्या.
चलो, हेही ठीक आहे, आईने दुधाची तहान ताकावर भागवली!

(shwetambara89@gmail.com)