आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहाणपणाचे पाऊल

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही महिन्यांत, होऊ घातलेल्या आणि अगोदरच असलेल्या वैवाहिक संबंधांतील गुंतागुंत सोडवण्याचे काही प्रसंग आले.
कौस्तुभ आणि श्वेता. कॉलेजमध्ये असतानाच एकमेकांच्या प्रेमात पडलेले लव्हबडर््स. दोघेही सॉफ्टवेअर इंजिनिअर्स. घरून विरोध नाही. साखरपुडा दिवाळीत, जुलैमध्ये लग्नाची तारीख. सगळं कसं छान चाललेलं. मात्र फेब्रुवारीपासून म्हणजे श्वेताच्या वाढदिवसापासून दोघांमध्ये धुसफूस सुरू झालेली. कारण काय, तर फेसबुकवरील श्वेताच्या फ्रेंडलिस्टमध्ये मित्रांचा वाढता सहभाग, श्वेताच्या फोटोला येत असलेल्या मित्रांच्या, विशेषत: तिच्या बॉसच्या लाइक्स, कॉमेंट्स आणि उत्तरादाखल तिने केलेल्या कॉमेंट्स. त्यावरून कौस्तुभने श्वेतावर नाराजी व्यक्त करत संशय घेतला. श्वेताने एक-दोनदा त्याचा आक्षेप हसण्यावारी नेऊन मग सरळ तिच्या स्वातंत्र्याला होणार्‍या आव्हानाला प्रतिआव्हान दिले. परिणाम?

सारंग आणि देवकी. घरच्यांनी ठरवलेले लग्न अन् त्यानंतर त्यातूनच सहवासाने फुललेले प्रेम. साखरपुडा आणि लग्नादरम्यान सारंगला एका अपरिचित व्यक्तीकडून देवकीच्या चारित्र्याबद्दल खोडसाळ फोन, ई-मेल येऊ लागले. सारंगने त्याकडे कानाडोळा केला आणि ही गोष्ट देवकीपासून लपवली. मात्र सारंग 8 आठवड्यांसाठी आॅफिस ड्यूटीवर लंडनला गेला आणि त्या खोडसाळ व्यक्तीने सरळ सारंगच्या घरच्यांना फोन करून आपले व देवकीचे जुने प्रेम व शरीरसंबंध असून सारंगचे तिच्याशी ठरलेले लग्न मोडावे असा आग्रह धरला. त्याने यापुढे जाऊन त्याचे व देवकीचे काही खाजगी फोटो त्याच्याकडे असल्याचा दावा केला. सारंगच्या घरच्यांपुढे सारंगला ही गोष्ट कळवण्यापलीकडे मार्ग नव्हता. सारंग ताबडतोब परत आला. देवकीला जाऊन थेट विचारण्यापेक्षा सारंग एका मित्रामार्फत माझ्याकडे सल्ल्यासाठी आला.

अशी प्रकरणे चुटकीसरशी सोडवता येत नाहीत आणि सोडवलीदेखील जात नाहीत. मी ही प्रकरणे मार्गी लावली ती काउन्सेलिंग म्हणजे समुपदेशनाच्या मार्गाने. देवकीच्या केसमध्ये थोडे आडमार्गाने जाऊन त्या खोडसाळ व्यक्तीचाही ‘आमच्या पद्धतीने’ बंदोबस्त करावा लागला. कौस्तुभ-श्वेता आणि सारंग-देवकी या प्रकरणात ‘प्री-मॅरेज’ काउन्सेलिंग कामाला आले.

बदलती समाजव्यवस्था म्हणजे सोशल स्ट्रक्चर, अधिकाधिक मिळत चाललेले आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य आणि त्या आनुषंगिक बदलत्या जीवनशैलीमुळे वैवाहिक नात्याकडे बघण्याचा समाजाचा, विशेषत: खुद्द विवाह करणार्‍या मुलामुलींचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. शैक्षणिक स्वातंत्र्यामुळे सामाजिक स्वातंत्र्याची व्याख्या बदलली आणि आर्थिक स्वातंत्र्याची जोड मिळाल्याने एक वेगळाच प्रकारचा आत्मविश्वास मुला-मुलींत निर्माण झाला. श्वेताच्या प्रकरणात उच्च शिक्षणामुळे मिळालेल्या नोकरीतून झालेले आर्थिक पाठबळ वैचारिक स्वातंत्र्याला चुकीच्या पातळीवर घेऊन गेले. कौस्तुभने निश्चितच संशय घेण्यात गडबड करायला नको होती. पण त्याचबरोबर, होणार्‍या विवाहाचे आणि त्यामुळे बदलणार्‍या आपल्या चरित्राचे भान श्वेतानेही ठेवायला हवे. वैवाहिक संबंध हे कोणत्याही देशात-धर्मात खाजगीच असतात. पण भारतीय मानसिकतेत हे संबंध आपल्या जोडीदाराचे भिन्नलिंगी व्यक्तीशी होणार्‍या व्यवहाराबद्दल जास्त संवेदनशील आहेत. जसा कौस्तुभने श्वेतावर संशय घेतला तसा काही प्रकरणांत इतर एका ‘श्वेता’ने तिच्या ‘कौस्तुभ’वर याच कारणाने संशय घेतला. कामाच्या ओघात वा काही प्रसंगी निव्वळ मैत्रीपोटी-ओळखीपोटी- वा प्रसंगानुरूप भिन्नलिंगी व्यक्तीशी संपर्क येणे साहजिक आहे. मात्र तो येत असताना आपला जोडीदार सोडून इतर भिन्नलिंगी व्यक्तीसोबत व व्यक्तीबाबत जबाबदारपूर्ण वर्तणूक करून आपल्या जोडीदाराच्या संवेदनशीलतेचा आदर करणे अत्यावश्यक आहे.

(1) लग्नाची माळ गळ्यात पडेपर्यंत आपल्या होऊ घातलेल्या जोडीदाराचा स्वभाव दुसर्‍याचा विचार करणारा आहे वा नाही, वा तो/ती आत्मकेंद्रित आहे का, हे पाहणे तसेच (2) जोडीदाराचा स्वभाव आपल्याला अनुकूल आहे वा नाही हे तपासणे आणि (3) जर या दोन्ही बाबींची उत्तरे नकारात्मक असतील, तर योग्य तो निर्णय घेणे ही अशा प्रकरणातील त्रिसूत्री आहे. अशा प्रकरणातील विवाहोत्तर समुपदेशन हे कठीण काम असते.

आता देवकी-सारंगच्या केसकडे बघू. एखाद्या मुलीला किंवा तिच्या होणार्‍या पतीला/त्याच्या नातेवाइकांना त्या मुलीच्या चारित्र्याबद्दल/ पूर्वायुष्याबद्दल माहिती देऊन तिच्या विवाहात खोडा घालण्याचा प्रकार आजकाल खूप दिसून येतोय. अशा प्रकरणाचे दोन भाग असू शकतात. एकतर देवकीबद्दलची अशी माहिती एकदम चुकीची व खोटी असते ज्याच्याकडे अजिबात दुर्लक्ष करावे लागते. दुसर्‍या प्रकारात नकळत देवकीच्या हातून पूर्वायुष्यात एक चूक घडलेली असते, जिचा विकृत गैरफायदा घेण्याचा हा प्रयत्न असतो. सारंग आणि त्याचे घरचे समजूतदार होते. चुका कोणाच्या हातून होत नाहीत? केवळ एका घटनेवर/चुकीवर आयुष्य संपत नाही, उलट ते एका नवीन चांगल्या आयुष्याला संधी देतं. देवकीचं बाकी वागणं, चारित्र्य, तिला आलेली समज हे खरंच निर्विवाद होतं. पौगंडावस्थेतील एका क्षुल्लक चुकीसाठी तिच्या आयुष्याचा बळी देणं सर्वस्वी चुकीचं होतं. मी सारंगला देवकीच्या जागी त्याच्या बहिणीबद्दल असा किस्सा घडला असता तर काय केलं असतं असं विचारलं. सारंग ओशाळला. त्याच्या मनातील मळभ दूर झाले होते आणि काही निर्णय पक्के झाल्याचे त्याच्या तोंडावरून दिसून येत होते. नंतर मी खास देवकीला बोलावून पूर्वायुष्याची सावली भावी आयुष्यावर न पडू देण्याची समज दिली, आणि तिचा होणारा नवरा कोणत्याही परिस्थितीत तिला सांभाळून घेण्यास समर्थ असल्याची ग्वाही दिली. त्याकरिता तिला सारंगशी मनमोकळे बोलण्यास सांगितले.

काळजीपूर्वक पाहिल्यास हे चौघे आणि त्यांचे आई-वडील आपल्याच आसपास कुठेतरी आपल्याला दिसतील, कदाचित आरशांतसुद्धा दिसतील. त्यामुळेच प्री-मॅरेज काउन्सेलिंगचे महत्त्व आता सगळ्यांना पटू लागले आहे. विशेष म्हणजे अशा समुपदेशनाकरिता मुला-मुलींपेक्षा त्यांच्या आईवडिलांचा जास्त आग्रह दिसून येत आहे. हे काउन्सेलिंग मुला-मुलीचे जवळचे नातेवाईक, कॉमन मित्र-नातेवाईक वा त्रयस्थ प्रोफेशनल व्यक्तीकडून घेणे उचित असते. अशा परिस्थितीत समुपदेशकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्याला केवळ लेक्चर देऊन पक्षकाराची बोळवण करायची नसते, तर अनेकदा आपली खुर्ची सोडून काही जास्तीच्या कारवाया करण्याची क्षमता व तयारी ठेवावी लागते.


(advocateabk@gmail.com)