आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाजूक नात्यांची रेशीमगाठ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनिता माझ्याकडे आली होती. तिच्या आईवडिलांनी तिच्या लग्नासाठी स्थळे पाहण्यास सुरुवात केली होती. ती अजूनही दोलायमान होती. पहिल्याच नजरेत अजून कोणीही मनात भरत नव्हता! आत्तापर्यंत तिने आठ मुलांना नकार दिला होता.
प्रियाचे लग्न जवळजवळ ठरल्यासारखे होते. तिच्याशी बोलताना असे लक्षात आले, जर पटले नाही तर एक वर्षाने घटस्फोट घेता यावा यासाठी ती एक वर्षे मूल न होण्याची काळजी घेणार होती. आरोही खूपच स्वप्नाळू. फक्त राजाराणीच्या संसाराची स्वप्ने. अब्जाधीश झाल्यावरच लग्न करेन असे ठरवलेला अमर. राजन पटकन खूपशा मुलींशी मैत्री करीत होता. सर्व मुलींकडे ही लाइफ पार्टनर होऊ शकेल का, अशा नजरेनेच पाहत होता. अक्षयच्या फेसबुकवर असंख्य मैत्रिणी! पण ज्या वेळी समोरासमोर बोलायची वेळ आली तेव्हा मनातल्या मनात लग्न किती दिवस टिकेल असा विचार करू लागला.
या उदाहरणांवरून लक्षात येते की आताची मुले काल्पनिक जगातच जास्त वावरतात. त्यांना फेसबुकवर चॅटिंग करता येते. सत्यस्थितीचा सामना मात्र त्यांना करताच येत नाही. या मुलांना चर्चा करता येत नाही. नकार ऐकता येत नाही. मतभेद होऊ शकतो हेच मान्य नाही. ही मुले लग्न करतात तेच मुळी पत्त्याच्या बंगल्यासारखे कोलमडणारे, त्या नात्याला मजबूत पायाच नसलेले.
अनिता मनात एका काल्पनिक जोडीदाराची चित्रे उभी करून मुले नाकारते आहे. खूपशा मुलींचे असेच होते. सुरुवातीला त्यांच्या अटी खूपच अवघड असतात. पुढे पुढे लोक त्यांना स्थळ सुचवेनासे होतात. जसे वय वाढते तसे या मुलींच्या अटी वरवर खूपच शिथिल होतात. पण खरे पाहता त्यांना दुसºयांशी जुळवून घेणे वाढत्या वयाबरोबर अवघड जाते. शेवटी एक वेळ अशी येते की जसा असेल तसा मुलगा चालेल असे म्हणावे लागेल.
प्रिया घटस्फोटाची स्वप्ने पाहतच मुंडावळ्या बांधणार आहे. आरोही राजाराणीच्या संसाराची स्वप्ने पाहते आहे. अमर करिअर आणि लग्न यांची गल्लत करीत होता. राजन प्रत्येक मुलीकडे त्याच शोधक नजरेने पाहतो.
‘बोहल्यावर चढण्यापूर्वी’ कार्यशाळा घेत असताना मला विचारला गेलेला महत्त्वाचा प्रश्न - लग्न का करायचे? लग्न म्हणजे काय?
लग्न हा एक नाजूक नात्यांचा रेशीमगाठीचा बंध असतो. रेशीमगाठ जितकी सोडवायला जाल तेवढी पक्की होते. त्याची उकल होत नाही. अगदी सोडवायचीच ठरवले तर कापावी लागते. कापून ती विद्रूप होते. लग्न असेच असते. लव्ह अ‍ॅट फर्स्ट साइट वगैरे क्वचितच होते. जसजसा सहवास वाढेल तसे प्रेम वाढते असे हे नाते असते.

लग्न म्हणजे बौद्धिक, भावनिक व मानसिक साहचर्य. तुझे आईवडील माझे आणि माझे आईवडील तुझे. तुझे सुख ते माझे आणि माझे सुख ते तुझे. लग्न हा संस्कार आहे. हे वचन आहे. हे फक्त राजाराणीपुरते मर्यादित नाही. या नात्यात वासनेची आग नसून मायेचा ओलावा आहे. या नात्यात एक सन्मान असतो. एक अभिमान असतो. दोन कुटुंबे एकमेकांत विरघळलेली असतात.