आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदाचा कोपरा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न ठरणं हे या वाक्यांइतकं ड्राय किंवा रुक्ष नाही, हे मला पटलंय. या शब्दांहून मला शब्दांमधल्या जागा मोठ्या वाटतात. नर्मदा भेटून आज दोन वर्षं होत आहेत आणि आता आम्हाला लग्नाचा उंबरठा म्हणतात तो दिसू लागला आहे. प्रेम कसं झालं हे कळलंच नाही, असं लोक म्हणतात. पण ही अफवा मला लागू होत नाही. प्रेम हे रुजत जातं हे खरं, पण त्याची अनुभूती काही क्षण देतात; माझ्या नात्यातील ते क्षण मी अजूनही जगतो. प्रेमात असताना कोणतीही फिकीर नसायची, जगाची तमा नसायची आणि स्वत:ची सोडून दुसरी कशाची जबाबदारी नसायची. एकमेकांना ओळखण्याचा, समजून घेण्याचा आणि आपलंसं करण्याचा काळ होता तो. भविष्यात याचं रूपांतर कशात होईल याची जाणीव नसण्याचा काळ. पहिल्यांदा लग्नाचा विचार केला तेव्हा आमच्या नात्याला घरून आसरा आणि जगाकडून मान्यता मिळणार याचा आनंदच झाला. भीती तर मला कधी वाटलीच नाही. उलट नर्मदा कायमची सोबत असणार या कल्पनेने कोणतीही भीती उरली नाही. यातून जेव्हा लग्नाच्या दरबारात स्वत:ला उभं केलं तेव्हा दोघांच्या परिघाबाहेरच्या व्यक्ती आणि गोष्टी आमच्या नात्यात आपापल्या गाठी बांधू लागल्या. तिचा आवाज, तिची भेट आणि तिचा स्पर्श, यांतूनच उभं राहिलेलं तिचं अस्तित्व, नजरेतून दिसणारं प्रेम आणि डोळ्यांतून दिसणारा विश्वास आणि अगदी सहजपणे मनात दृढ असलेली जबाबदारीची जाणीव मला आमच्या लग्नापर्यंत नेऊ पाहत आहे. नर्मदा मैत्रीण, प्रेयसी आणि बायको या तीन पायºया चढून माझ्या आयुष्यात येत आहे अन् लग्नानंतर ती या तिन्ही भूमिका साकारेल याने माझ्या आत्मविश्वासाला चौकट उरत नाही.
मुलीसाठी लग्न हा बदल मोठा असतो. कारण ती आपल्या दुसºया घरात राहायला येते, ती तिचे ‘नवीन’ आईबाबा ठरवून त्यांच्या घरी येण्याचा निर्धार करते. या बदलाची खोली ती जाणून असते. मला तर असं वाटतं की हा बदल झाल्यावर होणाºया परिणामांचा अंदाज तिने फार अगोदर बांधून ठेवलेला असतो. मुलगी लग्नाचा निश्चय करते तेव्हा तिची हीच तयारी महत्त्वाची वाटते, तर मुलाची तिच्या याच तयारीची जाणीव. नर्मदेच्या तयारीची जाणीव झाल्यावर मी ओशाळून गेलो, अन् माझी लग्नाची ओढ अजूनच तीव्र झाली. मग आता लग्न करायचं म्हणजे नक्की करायचं तरी काय... हा प्रॅक्टिकल प्रश्न पडला. काही करण्याची गरज आहे का? हा मनातून आलेला पहिला प्रश्न. इथे आईबाबा प्रकाशात आले. घर डोळ्यांसमोर आलं. आईबाबांना आमच्या नात्याची ओळख करून द्यावी लागली. त्यांनी आमच्या नात्याला आपलंसं केल्याच्या सुखाने, अश्रू विसरून दशकं उलटलीत तरी आनंदाश्रू काय असतात हे मला कळलं. मग माझ्यासमोर दोघांच्या आईवडिलांची भेट घडवून आणण्याची निकड मला दिसली. ही भेट घडताना लग्नाचं वारं मोसमी वाºयांच्या वेगाने वाहू लागलं आहे. प्रेमात पडण्यापूर्वी लग्नाचा विचारही नको वाटायचा अन् आता लग्नासाठी अजून 6 महिने वाट पाहायची कसोटी समोर उभी आहे. लग्न माझी अशी मजेशीर परिस्थिती करेल असं जन्मात वाटलं नव्हतं.
आता लग्नातून येणाºया जबाबदारीची जाणीव होऊ लागली आहे. त्याची खोली अजून कळत नाहीये, पण अनेकानेक पैलू उलगडत चाललेत. ओढ वाढते आहेच. आता घराच्या भिंती त्याच राहतील, पण घर मोठं होईल... आमच्या नात्याची पूर्तता आता लौकिकार्थाने
होईल. सुखदु:खांचा पट विणण्यासाठी हातांची तयारी असल्याची फीलिंग येते आहे.
दोन वर्षांपूर्वीच्या पहिल्या पावसात एकत्र भिजत ओळख झाली, अन् आत्ताच्या पहिल्या पावसात आमचं नातं साजरं करण्याची रंगीत तालीम अर्थात साखरपुडा होताना मला दिसत आहे. आनंद साठवायला मनात कोपराच सापडत नाही मला.

(abhs9211@gmail.com)