आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडेजाव कशासाठी?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॉलनीतील नीलिमाकाकू आज आनंदात दिसत होत्या. त्यांच्या मुलीचं, मयूराचं, लग्न जमलं होतं. जावई सॉफ्टवेअर इंजिनिअर. सासरची माणसं खूप हौशी आहेत, मयूराच्या मनासारखं झालं बघ, वगैरे.
‘काकू, देणं-घेणं कसं ठरवलं?’, तर त्या थोड्या गप्पच झाल्या. त्यांचा शांतपणा सगळं सांगून गेला. ‘लग्नसोहळा मात्र थाटात आणि हौशीने करून द्या, असं वरमंडळीने बजावून सांगितलं होतं. आमच्या तोलाचा सोहळा तुम्ही करावा, अशी त्यांनी गळच घातली आहे.’
मी मात्र हे वाक्य ऐकल्यावर विचार करू लागले. लग्न म्हणजे दोन घरांचे विचार, पद्धती एकत्रित येणार असतात. दोन घरांतील माणसे आयुष्यभरासाठी एकमेकांच्या मदतीसाठी बांधली जाणार असतात. मयूरा उच्चशिक्षित होती, लग्नानंतर घरातील आर्थिक परिस्थितीला तिचा चांगलाच हातभार लागणार होता. तरीसुद्धा नवर्‍याकडच्या मुलांनी अशा मागण्या केल्या होत्या. ‘काकू, तुमची मुलगी उच्चशिक्षित आहे, तरी तुम्ही हो म्हणालात?’ ’काय करणार, सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. गलेलठ्ठ पॅकेज, शिवाय अमेरिकेत असतो. शोधूनदेखील असं ठिकाण सापडणार नाही म्हणून तयार झाले.’ अशा कितीतरी मयूरा रोज दावणीला बांधल्या जात असतील.
हल्लीच्या सोहळ्यात स्पर्धा निर्माण झालीय, कार्यालयापासून लक्ष्मीपूजनापर्यंत आपला लग्न सोहळा इतरांपेक्षा किती वेगळा होईल, मग त्यासाठी कितीही पैसा मोजावा लागला तरी चालेल, असंच सर्वांना वाटत असतं. यामुळे मूळ संकल्पना, संस्कार विसरत चाललो आहोत.
आजकालच्या सोहळ्यात पदार्थांची रेलचेल असते. बुफे पद्धत असो किंवा पंक्तिप्रपंच, पानात अन्न वाढून घ्यायचे आणि पानात वाया घालवायचे प्रमाण कमालीचे वाढते आहे.
माझ्या कामवाल्या मावशीच्या मुलीचा लग्नसोहळा अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभा राहतो. सगळ्यांकडून दोन दोन हजार रुपये जमा करून त्यांनी लग्न केले. तेथील आदरातिथ्य अजूनही मनाला भुरळ घालते. अतिशय साध्या पद्धतीने पण रीतिरिवाजाला धरून त्यांनी लग्न केले. तेव्हा माणुसकीचं दर्शन या लग्नात मी अनुभवलं, ते शाही लग्नात कधीच अनुभवता येणार नाही.
नुकतंच नगरला लग्नाला जाण्याचा योग आला. दोन्ही पक्ष उच्चशिक्षित व सुसंस्कारित घराण्यातील होते. त्यांनी या सगळ्या चालीरीतींना फाटा देऊन रजिस्टर मॅरेज केले. लग्नासाठी येणारा खर्च सामाजिक संस्थेला दान केला. आपल्या कमाईतील काही भाग इतरांच्या कामासाठी उपयोगी आल्याचं समाधान त्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होतं.