आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तो बघायला येतो तेव्हा...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करिअर ओरिएंटेड असलेली मी चोविशी-पंचविशीत कधी आले माझे मला कळलेच नाही पण आईच्या मात्र नेहमीप्रमाणे लक्षात आले. तसे एकविशीतच माझी प्रोफाइल फेसबुक व्यतिरिक्त शादी डॉट कॉम, भारतमॅट्रिमोनी डॉट कॉम आदी साइट्सवर झळकायला लागली होती आणि मग तिथून पुढे सुरू झालेला सुरुवातीला गमतीशीर वाटणारा खेळ नंतर मात्र कितीतरी अंगांनी मला अंतर्मुख करायला लागला.
स्वत:चे चांगले चांगले निवडक फोटो अशा प्रोफाइलवर टाकणं, फेसबुकवरही अनेकजण चेक करतात म्हणून प्रेक्षणीय दिसण्याची काळजी घेणं या सगळ्यामध्ये स्वत:ची उंची, शिक्षण, वय, जन्मतारीख, वेळ, ठिकाण, रास, गोत्र सगळं आलंच. ही व्हर्च्युअल वरसंशोधनाची प्रक्रिया व्हर्च्युअल असते तोवर एक तात्पुरता कम्फर्ट झोन असतो पण सगळं प्रत्यक्षात सुरू होतं तेव्हा...
‘अ‍ॅक्सेप्टेड’ असा माझ्याकडून वा त्याच्याकडून रिप्लाय या साइट्सवर आला की पुढचा संवाद सुरू होतो. प्रोफाइलवर सगळं टाकलेलं फोनाफोनी करून पुन्हा विचारून घेतलं जातं. बाय चान्स एक पाऊल पुढे जायला मिळालं की मग येतो तो ‘बघण्याचा कार्यक्रम’.
स्वत:चं मत आहे, स्वत:च निर्णय घेऊ शकतो, आईवडिलांना आपले मत मान्य असणार आहे अशा समजुतीतला एकजण भेटायचे ठरवतो. सहा-सात तासांचे अंतर बसमधून काढत स्टेशनवर येतो. वडिलांसह मी त्याला रिसिव्ह करायला आलेली असते. स्मितहास्याची देवाणघेवाण होते आणि हळूहळू आईने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न सुरू होतो.
थोडेच बोलायचे, चेहºयावर सोज्वळ भाव ठेवायचे, मनावर नियंत्रण ठेवायचं, पटकन रिअ‍ॅक्ट व्हायचं नाही, भावनिक गोंधळ दिसू द्यायचा नाही. ड्रेस वगैरे कधी नव्हे तो जास्तच नीट घातलेला असतो. आपल्या दिसण्यातील वीक पॉइंट्स थोडे लपविण्याचा प्रयत्न केलेला असतो. पहिलीच वेळ आहे ना... फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन...
घरी थोडे औपचारिक बोलणे होते. तो आपण स्वतंत्र विचारांचे आहोत असं दाखवतो. अपेक्षाही निरपेक्ष दाखवतो. मीही अधिकाधिक विनम्र होण्याचा प्रयत्न करीत असते. उलट प्रश्न विचारायचे टाळत असते. मग वडील आम्हा दोघांना सीसीडीमध्ये सोडून येतात. कॅपुचिनो हॉट कॉफी आणि ट्रॉपिकल आयलंड कोल्ड कॉफीचे घोट घोळवत आम्ही उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू करतो. थोडा संकोच आणि लाजाळूपणाचा भाव उगाचच चेहºयावर स्थिरावण्याची धडपड करीत असतो. पत्रिका जुळत असते, नाडी एक नाही म्हणून तोही धोका नाही, दोघांची आर्थिक स्थिती समाधानकारक, दिसण्यात काही फारसा दोष नाही. अपेक्षा तर निरपेक्ष! थोडेफार एक-दुसºयाविषयी बोलणे होते. होकार-नकार ठरायची वेळ येते तेव्हा तो अचानक म्हणतो, सगळं चांगलंय फक्त आता आई-बाबांना विचारतो! तिथेच त्याचं स्वतंत्र असणं त्याच्या नकळत गळून पडतं आणि पुढे होकार-नकाराचंही कम्युनिकेशन होत नाही, महिन्या-दोन महिन्यांनी फेसबुकवर त्याचे नववधूसोबत फोटो दिसतात आणि मग त्याचा खरा ‘चॉइस’ कळतो, त्याच्या निरपेक्ष ‘अपेक्षा’ कळतात!
माझ्यासाठी हा अनुभव पहिला असला तरी असं होणार हे गृहीतच धरलेलं त्यामुळे दुकानातील एक वस्तू दुसºयाने घेतली म्हणून मी पुढे गेले. मग नातेवाईकांमधून कुणीतरी एक स्थळ सुचवतं. नातेवाईकांमधून प्रपोझल सुचवले गेल्याने एक प्रकारे थोडा विश्वास वाढतो. पण या वेळी मी थोडे सराईत झाल्यासारख्या माझ्या अपेक्षा क्लिअर केलेल्या असतात.
तो भेटतो. मूळचा कुठला, सध्या कुठे असतो सगळ्या गोष्टी होतात. फॉर्मल-इनफॉर्मल गप्पा होतात. सगळं पुन्हा जुळतं मग पत्रिकेची मागणी केली जाते. त्याचे वडील म्हणतात, तसा पत्रिकेवर फारसा विश्वास नाही आमचा पण बघायला काय हरकत आहे? पत्रिका बघितली जाते. मुलाकडच्यांनी सांगण्याआधीच माझ्या वडिलांना नकार कळालेला असतो. तेराच गुण जुळत असतात! आणि मग बोलताना सगळं जुळत असल्याचा दोघांना होणारा आशादायी आनंद पत्रिकेबरोबर मिटवला जातो.
इथपर्यंत येऊस्तोवर आणखी एक स्थळ व्हर्च्युअली आलेलं असतं. भेट होते. बोलण्याआधीच माझं मन म्हणायला लागतं, हा नको. माझ्या दिसण्याच्या अपेक्षेत हा अगदीच बसत नाही. बाकी त्याचं प्रोफेशन चांगलंय, इनकम चांगलाय पण दिसायला मात्र अगदीच कसातरीय. मी आईकडे बघते आणि चेहºयावरच नापसंती उमटते. हेही स्थळ नाकारलं जातं.
एखादा बघण्याच्या कार्यक्रमात नुसता सॅँडलचे घट्टे पडलेल्या अर्धवट सावळ्या पायांकडे बघत राहतो आणि त्याच्या या बारीक निरीक्षणातूनच पुन्हा एक नकार उमटतो.
इथपर्यंत माझं वागणं अगदी मेकॅनिकल झालेलं असतं. तेच ते र्‍यारगनाइज्ड बोलणं आणि वागणं-दिसणं. हळूहळू माझ्या अपेक्षा वर-खाली व्हायला लागतात. कदाचित त्याच्याही अपेक्षा वय वाढत जातं, बघण्याचे कार्यक्रम वाढत जातात तशा खाली-वर व्हायला लागतात.
तरी कळत नाही, नेमकं मला लग्न कुणाशी करायचंय ? सेटल्ड, वेल एज्युकेटेड, शहरात राहणारा, दिसायला बरा, उंची जुळेल अशी, न्युक्लिअर फॅमिली या साधारण अपेक्षांच्या चौकटीत मुलगा बसवता बसवता माझ्या व माझ्या आई-वडिलांच्या नाकी नऊ येतात. करिअरसाठी मध्यमवर्गीय साच्यात राहून संघर्ष केलेला, तोच संघर्ष लग्नानंतर नको म्हणून सेटल्ड हवा, शून्यातून सुरुवात नको, माझ्या शिक्षणाला मॅच होईल असा हवा, शहरी संस्कृतीत वाढलेय म्हणून शहरी हवा, घरात जास्त माणसं माझ्यासारख्या आत्मकेंद्रित मुलीला नको म्हणून नकोत अशी अनेक कारणे या अपेक्षांमागे. या अपेक्षा जुळता जुळता अनेक स्थळे निघून जातात.

पण या अपेक्षांच्याही पलिकडे काही गोष्टी असतात ज्या खरेतर पहिल्या दोन-तीन भेटीत ठरवता येत नाहीत. घडवलेल्या या भेटींमध्ये नैसर्गिकता क्वचितच येते त्यामुळे विचारांमधली संवेदनशीलताही अभावानेच जाणवते. एकीकडे लिबरल म्हणवणाºया माझ्या पिढीला मागल्या पिढीचा पत्रिकांचा संदर्भ मनातून असुरक्षित करीत असतो. आपण वधूवरांचं दुकान मांडतोय का हेही कळत नाही कुणाला. साध्या अपेक्षा बोलताना जीभ जड होते मग लैंगिकता, मानसिकता या बाबी राहिल्या दूरच. एक कृत्रिम वर्तुळ आपण आपल्याभोवती उभे करतो ज्यात ग्रह-तारे, समाजाची मानसिकता यांनी ठाण मांडलेले असते.
या सगळ्या प्रवासात माझं मन पुन्हा पुन्हा मला विचारत राहतं, लग्न मला खरोखरच महत्त्वाचं वाटतंय का? लग्नानंतर सगळं चांगलं होतं, आयुष्याचं चक्र अव्याहतपणे चालू राहतं हे वास्तव आहे की भ्रम? मुळात एखाद्याशी चोवीस तासाची, 365 दिवस त्याचीच असण्याची कमिटमेंट मी का द्यायची? माझं आडनाव मी का बदलायचं वा जोडआडनाव का लावायचं? माझ्या रोमान्सच्या कल्पना त्याच्याशी जुळतील का हा प्रश्न विचारायची परवानगी मी पालकांकडून का मागावी आजच्याही काळात? प्रश्न फिरवून फिरवून का विचारावेत? थेट का विचारू नयेत? पत्रिकाच जर कम्पॅटिबिलिटी ठरवणार असेल तर संवादाची प्रक्रिया कशाला हवी? होकारा-नकाराचे प्रॅक्टिकल कम्युनिकेशन का होत नाही? नको तिथे दुखवण्याचा विचार का केला जातो? लग्न एक संस्कार आहे की एकटेपणा नको म्हणून केलेली तडजोड की शरीरसुखाला कायदेशीर संरक्षण मिळावे म्हणून केलेला करार? प्रेम व लग्न या दोन्ही गोष्टी एकच असतात पण त्या वेगळ्याही असू शकतात हा दुसºया बाजूचा विचार का केला जात नाही? लग्नाला जे पर्याय निर्माण केले गेलेयत त्यांना कायदेशीर मान्यता असताना समाजमान्यता अजूनही पूर्णत: लागू नाही, का? लग्न नामक संस्था आता नव्यानं रचायला हवी असं आपल्याला वाटत नाही का? खूप प्रश्नयत मनात... पुन्हा तुमचंच उत्तर येईल, लग्न झाल्यानंतर कळेल मला हे सगळे म्हणून.