आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळाचा रेटा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजस्वास्थ्य टिकून राहावं म्हणून लग्नसंस्था निर्माण केली गेली असं म्हणतात. या संस्थेमुळे समाजस्वास्थ्य कितपत टिकलं हा संशोधनाचा आणि वादाचा विषय आहे. लग्न करून मन:स्वास्थ्य बिघडवून घेणार्‍यांचे प्रमाण प्रचंड वाढते आहे. पण याचा अर्थ, ‘उद्याच्या उद्या लग्नसंस्था मोडीत काढा,’ असा अजिबात नाहीये. मात्र, गेल्या दोन दशकांत घटस्फोटांचे वाढलेले प्रमाण पाहता, कुठे आणि काय चुकलंय/चुकतंय याचा धांडोळा प्रत्येक सुजाण माणसाला घ्यावासा वाटतोच.

आपली ही चर्चा पुढे नेण्यासाठी आपल्याला थोडं मागे जावं लागेल. अगदी राम-सीता, पांडव-द्र्रौपदी किंवा जोधा-अकबरपर्यंत नको, दोनएकशे वर्षांमागे जाऊ आणि तेव्हाच्या सर्वसामान्य लोकांचा विचार करू. त्या काळात लग्न हे बाईच्या पालनपोषणाचे साधन होते. माहेरच्या खुंट्यावरून सोडवून सासरच्या खुंट्याला नेऊन बांधली, अशी तिची अवस्था होती. घरातली कामं करणं आणि सासरचा वंश वाढवणं एवढ्याच तिच्या जबाबदार्‍या होत्या. बायका सुखी होत्या, लग्नसंस्था बिनबोभाटपणे चालत होती. गडबड नंतरच झाली, जेव्हा बायका शिकायला लागल्या.

भारतीय समाज अत्यंत दांभिक आहे. म्हणूनच आपण घरातली सून आणि घरातली केरसुणी, या दोघींना ‘लक्ष्मी’ म्हणू शकतो! दोघींची जागा अडगळीच्या कोपर्‍यात, दोघी लक्ष्मी! तर, मुलगी ग म भ न गिरवायला लागली, आणि तिच्या दु:खाचा पाया खणला गेला! बाई शिकायला लागल्यावर तिच्या स्वत:च्या आयुष्यापासून असलेल्या अपेक्षा उंचावणार, हे सुरुवातीच्या काळात लक्षातच घेतलं गेलं नाही. तिने कुटुंबासाठी जसे घरात राबायचे, तिने सासरची वंशवेल जशी वाढवायची, तसेच तिने घरातल्या पुरुषाला ‘सुधारणावादी’ हे बिरूद मिळावे म्हणून शिकायचे, असा मामला होता. पुन्हा एकदा नमूद करावे वाटते की इथे आपण कुठल्याही असामान्य कुटुंबांची चर्चा करत नसून सामान्य माणसांबद्दल बोलत आहोत. त्या काळात शाळेत जाणे हा सुना-मुलींसाठी नवर्‍याने किंवा बापाने केलेला जाच होता. ही परिस्थिती हळूहळू बदलली आणि शिक्षणाची महत्ता बाईला समजली. जोपर्यंत घरातल्या बाईला शिकवणारा पुरुष ‘सुधारणावादी’ मानला जात होता, त्याचा ‘उदोउदो’ होत होता, तोपर्यंत सारे ‘आलबेल’ होते. पण नंतर हे कौतुक संपले आणि मुली सर्रास शिकू लागल्या. नेमकी इथेच माशी शिंकली! शिक्षणाने येणारी निर्भीड वृत्ती, विचार करण्याची क्षमता आणि स्वत:चे निर्णय घेण्याचा आग्रह हे शिक्षणाला पर्यायी असलेले गुण बाईत दिसायला लागले आणि आपला पारंपरिक समाज बिथरला, तो आजतागायत! आज म्हणजे गेल्या 10-15 वर्षांत लग्न झालेल्या जोडप्यात हा बेबनाव फारसा नसला तरी त्याआधीच्या शिक्षित बायकांनी तारेवरची कसरत केलेली आहे. शिक्षण, उच्च शिक्षण, नोकरी, लग्न, मुलं हे सारे तिने एकहाती केलेले आहे. त्याच दरम्यान हळूहळू पैशाला अवास्तव महत्त्व आले, जगण्याचा दर्जा, स्टँडर्ड आॅफ लिव्हिंग, वाढवण्याचा सोस आला आणि त्याच सुमारास शिक्षित मध्यमवर्गीय समाजात घटस्फोटांचे प्रमाण हळूहळू वाढायला लागले.
बाई शिकेल, संसारासाठी नोकरी करेल आणि तरी आपल्या पायाच्या अंगठ्याखाली दबून राहील ही पुरुषी अपेक्षा मोडीत निघायला लागली होती. ‘बाबांना घरी यायला उशीर झाला तरी आई न जेवता त्यांच्यासाठी थांबायची,’ अशी उदाहरणे देणारे नवरे हे विसरू लागले की आई सकाळी उठून, घरातले स्वयंपाकासह सगळे आवरून नोकरीवर जात नव्हती. ‘बाबांना एक शब्द उलटून बोलायची नाही आई,’ असं वाटून घेणारा पुरुष हा विचारच करत नसे की आपली बायको घरात पगाराची मोठी रक्कम आणते, त्यातून ‘वॉशिंग मशीन’पासून ‘सेकंड होम’पर्यंतचे सगळे हप्ते चुकते केले जातात, त्यामुळे आता तिच्या शब्दांना वजन येणार! ती बोलणार! तिचं म्हणणं ऐकलं जावं असा आग्रहही असणार तिचा! हा उद्दामपणा नाही, आत्मविश्वास आहे, हे ज्यांनी समजून घेतलं नाही, त्यांच्यात बेबनाव सुरू झाले आणि ते विकोपाला गेले.
ही पुरुषांबद्दल असलेली तक्रार नाहीये. गेली अनेक शतके त्यांचे जे ‘प्रोग्रामिंग’ झाले आहे, ते बदलायला वेळ लागेल. बाईसाठी शिक्षणाची दारं उघडली गेली आणि तिच्या डोक्यातले प्रोग्रामिंग बदलले. पुरुषासाठी तशी कुठलीही सोय नव्हती. ‘तू पायातली वहाण नाही, जोडीदार आहेस,’ हे बाई शिकत गेली. पण ‘तू कुटुंबाचा एकछत्र मालक नाहीस, पार्टनर आहेस,’ हे कुणीही पुरुषांना शिकवले नाही. जी कुटुंबं सुज्ञ होती, सुजाण होती, त्यातल्या पुरुषांनी हा बदल आत्मसात केला, जी तशी नव्हती, त्या कुटुंबात धुसफूस सुरू झाली. दोघं शिकलेली, दोघं नोकर्‍या करणारी, त्यामुळे लग्नसंस्थेचा जो पाया, संसार, तो पगारी नोकरांच्या हातात गेला आणि पाया डळमळीत झाल्यावर संस्था मोडीत निघायला कितीसा वेळ लागणार? दुर्दैवी असला तरी निष्कर्ष हाच निघतो की बाई शिकायला लागली म्हणून दु:खी झाली. पण तिचं शिक्षण थांबवणं हा यातला मार्ग नसून पुरुषाने या घटनेकडे अधिक डोळसपणे पाहण्याची गरज आहे. नाहीतर त्यांच्यातला बेबनाव वाढत राहणार, घटस्फोट होत राहणार आणि लग्नसंस्थेचा समतोल बिघडत राहणार!
मुळात दोन माणसांनी वर्षानुवर्षं एकमेकांशी जुळवून घेणं, हेच कठीण आहे! पूर्वी ते सहजशक्य होतं कारण घरात इतकी माणसं असायची की एकमेकांसोबत घालवायला फार कमी वेळ हाताशी असायचा. शिवाय घरातली मोठी माणसं या दोघांत ‘बफर’चं काम करायची. गेल्या काही वर्षात हे ‘बफर्स’ गावाला राहिले. सारखं एकमेकांसोबत राहणं वाढलं. त्यात एकमेकांचे दुर्गुण दिसायला लागले. पूर्वी कौटुंबिक दबाव एवढा असायचा की बाईत दुर्गुण असले तरी ते पुरुषांपर्यंत पोचायचे नाहीत. आणि पुरुष तर आपल्याकडे दुर्गुणी नसतातच ना कधी! पण बाई शिकली, आपल्या पायावर उभी राहिली आणि तिला आपल्या नवर्‍यात असलेले दुर्गुण कळायला लागले.

कालानुरूप माणूस बदलतो, त्याची विचार करण्याची पद्धत बदलते. इतर अनेक प्रथा-परंपरा आपण मोडीत काढलेल्या आहेतच. ते पाहता, लग्नसंस्था आता यापुढे सतत डळमळीतच होत राहणार, हा अंदाज काढायला कुणा अभ्यासू समाजशास्त्रीची गरज नाही. जेव्हा नातेसंबंधांना महत्त्व होते तेव्हा लग्न ही जन्मोजन्मी चालणारी घटना होती. आज पैशाला महत्त्व आलंय. इतर सगळे विषय गौण झाले. त्यात नातेसंबंधही आलेच. फक्त नवरा-बायको हेच नाही तर इतरही मानवी नात्यांत तो पीळ राहिलेला नाही. हा काळाचा रेटा आहे. तुम्हाला आवडो, न आवडो, तो पाठीवर घेऊनच चालायला हवे.
(mithila.jadhav@gmail.com)