आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकाम करणारी ऐश्वर्या राय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लग्न करण्यापूर्वी आपल्याकडे पत्रिका बघण्याची प्रथा आहे. पत्रिकेतील 36 पैकी बहुतांश गुण जुळत असतील, तर लग्नाला हिरवा सिग्नल मिळतो. पण अशा प्रकारे पत्रिका पाहून भटजीबुवांनी भविष्यातील सुफळ संसाराची हमी दिल्यानंतरही बर्‍याच संसाराच्या गाड्या भांडण आणि विसंवादांच्या खाचखळग्यांमध्ये गचके खातात. त्यामुळे लग्नापूर्वी पाहण्याच्या कार्यक्रमाला जाताना पत्रिकेच्या कागदी दिलाशावर विसंबून राहण्यापेक्षा स्वभाव, आवडीनिवडी, वैचारिक क्षमता जाणून घेणे महत्त्वाचे! प्रत्यक्ष आयुष्य जगताना याच गोष्टी उपयोगी पडणार्‍या असतात. त्यामुळे लग्नासाठी उत्सुक असलेल्या मुलांनी पत्रिका, भावी सासर्‍याचे घर आणि त्याच्या बँकेच्या पासबुकाकडे पाहण्यापेक्षा त्याची मुलगी आणि तिच्या स्वभावाकडे अधिक लक्ष द्यावे.
बहुतांश मुले आपल्या भावी पत्नीत गोरेगोमटे सौंदर्य, करिअरिस्ट, संसाराचा सर्व भार एकटीच्या खांद्यावर पेलणारी, सासू-सासर्‍यांची मनोभावे सेवा करणारी वगैरे वगैरे अशा बहुविध गुणांचा समुच्चय असलेल्या अनेक बायका बघत असतात. अर्थात अशी स्वप्ने पाहायला हरकत काहीच नाही. पण अशा प्रकारे ‘घरकाम करणारी ऐश्वर्या राय’ हवी, अशी इच्छा बाळगणारा मनुष्य दुसरा शेख चिल्लीच म्हणायला हवा. संसार ही दोघांनी मिळून करायची गोष्ट आहे. त्यामुळे एकालाच अपेक्षांच्या ओझ्याखाली गुदमरवून कसे टाकता येईल?

मुलगी पाहायला गेल्यानंतर तिचे रंगरूप, आर्थिक स्थिती, नोकरी अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या आणि बाह्य गोष्टींमध्ये मुलांनी प्रमाणापेक्षा जास्त गुंतून पडू नये. तिचा स्वभाव, आवडनिवड, तिला महत्त्वाच्या वाटणार्‍या गोष्टी, सुखी सहजीवनाच्या तिच्या कल्पना यांवर चर्चा झाली तर पाहण्याच्या कार्यक्रमाचा हेतू साध्य होईल. संसार करताना आपल्याला महत्त्वाच्या वाटणार्‍या गोष्टी आणि त्यांच्या परिपूर्तीसाठी आपल्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा मुलांनी स्पष्टपणे बोलून दाखवल्यास मुलींनासुद्धा त्याबद्दल स्पष्ट कल्पना येऊन समजूतदार संसार करण्याचा मार्ग मोकळा होईल. वधूसंशोधनासाठी निघालेल्या मुलांची मानसिकता त्यांच्या वैयक्तिक जडणघडणीवर अवलंबून असते. बर्‍याच जणांना पुरुषी चष्म्यातूनच लग्नसंस्थेकडे पाहायची सवय जडलेली असली, तरी अनेकांची विचारसरणी काळाप्रमाणे नक्कीच बदलली आहे. शिक्षण, आर्थिक प्रगती आणि बदललेल्या सामाजिक परिस्थितीमुळे मुलींच्या मानसिकतेमध्ये घडलेल्या बदलांचीही जाणीव त्यांनी ठेवणे गरजेचे आहे. वरपक्षाचा वरचष्मा आता कमी झाला आहे. अर्थार्जन करणार्‍या मुलींमध्ये आपल्या हक्कांची जाणीवही प्रबळ असते. त्यामुळे एकीकडे त्यांच्याकडून लग्नानंतरच्या कर्तव्यांची अपेक्षा करताना दुसरीकडे त्यांचे हक्कही स्वत:च्या हक्कांच्या बरोबरीचे आहेत, हे लक्षात ठेवलेच पाहिजे. तसेच, कर्तव्ये आणि जबाबदार्‍यांना लोढणे समजून त्या केवळ पत्नीच्याच गळ्यात अडकवण्याचा काळ आता गेला आहे. या गोष्टींची जबाबदारी दोघांच्याही शिरावर आली आहे. लग्नापूर्वी मुले आत्मकेंद्रित असतात. वयाच्या पंचविशी-तिशीपर्यंत त्यांचा आरामदायी कोष तयार झालेला असतो. लग्न केल्यानंतर या कोषापासून बेडरूमपर्यंतच्या सर्वच गोष्टी जोडीदाराशी शेअर कराव्या लागतात. त्यातून चिडचिडीपासून अगदी आपल्या बारीकसारीक खाजगी गोष्टींवर आक्रमण झाल्याची भावनाही निर्माण होते. पण ती मुलगीसुद्धा अशाच प्रकारचा आपला कोष मागे टाकून सर्वस्वी अपरिचित घरी आयुष्यभरासाठी राहायला आलेली आहे. सामंजस्याने एकमेकांचा सहवास सुसह्य करणे आपल्याच हातात आहे. संवादाच्या पातळीवर समजूतदारपणा निर्माण झाला, तर नात्यातला रोमान्स बहरतोच बहरतो. स्वत:ला आधुनिक विचारांची मानणारी काही मुले जाम गोंधळलेली असतात. आधुनिकतेची व्याप्ती आणि व्याख्येविषयी त्यांच्या मनात संभ्रम असतो. आपल्या कुटुंबात भावी पत्नीच्या मतांना आदर असावा, असे त्यांना वाटते. पण कुटुंबातील पारंपरिक वातावरण, वडीलधार्‍या मंडळींचा दबाव आणि खुद्द मुलांच्याच स्वभावात दडून बसलेला पुरुषी अहंभाव यातून त्यांची आधुनिकतेची व्याख्या वेळ-काळ पाहून सोयीस्कर आणि लवचीक बनत असते. मग नुसतीच विचारांनी पुरोगामी असलेली ही मुले वेळप्रसंगी मुलींच्या स्वातंत्र्याचा संकोच करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. पण अशा कच्च्या आधुनिकतेचा काहीही उपयोग नाही. आधुनिकतेमध्ये स्त्री-समतेचे तत्त्व अनुस्यूत आहे. त्यामुळे भावी आयुष्यातील जोडीदाराला अगोदरपासूनच आवश्यक तो सन्मान आणि आदर दिला, तर वैवाहिक आयुष्य नक्कीच दीर्घायू राहील.
(ajitswaykar@gmail.com)