Home | Magazine | Rasik | weekly-market-ghoti-bazaar

प्याज से लेके ब्याज तक!

मोहन माळकर, मुक्त पत्रकार | Update - Jun 02, 2011, 11:35 AM IST

आठवडी बाजार आणि जत्रांमधले बाजार. शेअर बाजार आणि चोर बाजार. वॉलमार्ट आणि आंतरराष्ट्रीय बाजार. तिथे फक्त पैसाच खेळतो असे नाही. फक्त वस्तूंचेच हस्तांतरण होते असे नाही. प्रत्येक बाजाराला आपले व्यक्तिमत्त्व असते, व्यापताप असतात, आनंद आणि वैताग असतो. त्याची ही नाना रूपे .....

 • weekly-market-ghoti-bazaar

  घोटी गाव तसं टीचभरच असल्यानं एरवी त्याची फारशी दखलही कुणी घेतली नसती. पण गावातल्या वैशिष्ट्यपूर्ण आठवडी बाजारामुळे त्याची ओळख दूरवर पसरली आहे. त्यातही तांदूळ, धान्य, मुरमुरे आणि बियाणे यांसाठी हा बाजार प्रसिद्ध आहे.

  'घेनार माझ्यावाला मुरमुरा तर बाजार व्हनार पुरा...!' अस्सल ग्रामीण ढंगातली अन् खणखणीत आवाजातली ही साद आपसूकच ग्राहकांची पावलं आपल्याकडे वळवून घेते. धान्यासाठी पूर्वापार प्रसिद्ध असलेल्या घोटीच्या आठवडी बाजारातला नुसता फेरफटका पावलोपावली जणू विक्री व्यवस्थेचं तंत्र उलगडून दाखवतो. उन्हापावसाची तमा न बाळगता दिवसभर रस्त्यावर उभे राहणारे विक्रेते हा बाजाराचा मुख्य घटक. 'स्ट्रीट मार्केट'मधले हे हरतर्हेचे विक्रेते आपला माल हातोहात खपवण्यात 'नेकटाय'वाल्या एमबीए बॉईजपेक्षा काकणभर सरसच असल्याची प्रचिती घोटीच्या बाजारात आल्याशिवाय राहात नाही.
  मुंबई-आग्रा महामार्गावर वसलेलं घोटी गाव तसं टीचभरच असल्यानं एरवी त्याची फारशी दाखलही कुणी घेतली नसती. पण गावातल्या वैशिष्ट्यपूर्ण आठवडे बाजारामुळे त्याची ओळख दूरवर पसरली आहे. त्यातही तांदूळ, धान्य, मुरमुरे आणि बी-बियाणे यांसाठी हा बाजार प्रसिद्ध आहे. दर शनिवारी घोटीत भरणाऱ्या या बाजारासाठी चहुबाजूने असणाऱ्या जवळपास दीडशे खेड्यांमध्ये आदल्या दिवशीपासूनच लगबग सुरू असते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. खुद्द घोटीतसुद्धा दर शनिवारी भल्या पहाटे सुरू होणारी धांदल सायंकाळी उशिरापर्यंत सुरू असते. दुपारी चारनंतर तर तेथे चालायलाही रस्ता राहात नाही, अशी स्थिती निर्माण होते. नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी या आदिवासीबहुल तालुक्यातल्या घोटी गावात पूर्वीपासून बाजारपेठ निर्माण होण्यामागे भौगोलिकता हे एक महत्त्वाचे कारण ठरते. त्यातच पुढे ब्रिटिश आमदनीत या गावाच्या एका बाजूला मुंबईकडे घेऊन जाणारा महामार्ग आणि दुसरीकडे रेल्वे मार्ग आल्यामुळे या बाजारपेठेची भरभराट सुरू झाली. नाशिकसह अहमदनगर आणि ठाणे या लगतच्या तिन्ही जिल्ह्यांतील ग्रामीण भागातून शेतकरी तसेच व्यापारी मोठ्या संख्येने येथे येऊ लागले. अनेक प्रकारच्या वस्तू तसेच तांदूळ व इतर धान्य मुबलक आणि किफायतशीर दरात मिळू लागल्याने दिवसेंदिवस घोटीच्या बाजाराची महती वाढू लागली. आज तर हा बाजार इतका विस्तारला आहे की तेथे भाजीपाल्यापासून मोबाईल फोनपर्यंत आणि शेती अवजारांपासून थेट डिश अँटेनापर्यंत सर्वांची सरमिसळ झाल्याचे दिसते. तरी आजसुद्धा इथल्या बाजारावर वर्चस्व आहे ते तांदळाचे. अगदी साध्या बारीक तांदळापासून तुकडा, बासमती असे नानाविध प्रकार या बाजारात उपलब्ध असतात. शिवाय बहुतेक तांदूळ आसपासच्या परिसरातला असल्याने स्थानिक उत्पादकांना चांगली बाजारपेठ मिळते. पूर्वी हातसडीचा तांदूळ मुबलक असायचा, आता मात्र तो शोधावा लागतो. अगदी किरकोळपासून ठोक विक्रीपर्यंत तांदळाची प्रचंड उलाढाल होते. त्या निमित्ताने परिसरात अनेक तांदूळ मिल उभ्या राहिल्या आहेत. तांदळापासून बनणारा मुरमुरादेखील प्रसिद्ध असून, घोटी मुरमुरा हा जणू ब्रँड बनून गेला आहे. याशिवाय इतर धान्यांनाही चांगली बाजारपेठ आहे. भाजीपालादेखील मुंबईकडे मोठ्या प्रमाणावर पाठवला जातो. आसपासचा परिसर आदिवासी आणि ग्रामीण असल्याने शेतीशी संबंधित इतर जिनसा (जसे बी-बियाणे, खते, शेती अवजारेसुद्धा) घोटीच्या बाजारातला एक प्रमुख घटक आहे.
  अर्थात, हा झाला उलाढालीचा खटाटोप. पण त्याहूनही हा 'बाजार' जिवंत वाटतो तो इतर किरकोळ वस्तू-विक्रेत्यांच्या कलकलाटाने. लहान मुलांची खेळणी, गृहोपयोगी वस्तू, स्टेशनरी, कटलरी, लाकडी पाट, दगडी पाटे-वरवंटे, भांडी, कपडलत्ते अशा साऱ्या वस्तू रस्त्यावर एकमेकांच्या शेजारी सुखेनैव नांदत असतात. त्यामुळे सारा माहोल रंगीबेरंगी असतो. त्यातच पोटपूजेसाठी मूग तसेच कांदा-बटाटा भजी, गुडी शेव, मुरमुऱ्याचा भत्ता, भेळ, पापडी, बुंदीलाडू... अशी सारी चंगळ असल्याने बाजारात दिवस कसा पार होतो ते कळतही नाही. भल्या सकाळपासून सुरू झालेली लगबग संध्याकाळी उशिरा मंदावते, तेव्हा उत्साह कमी झाला असला तरी जवळपास सगळेच खुशीत असतात. लहान-मोठ्या विक्रेत्यांचे चेहरे उजळलेले दिसतात. त्यामुळेच असेल कदाचित, घोटीत व्यापारी वर्गाची संख्या इतकी आहे की व्यापाऱ्याचे गाव म्हणूनच त्याला संबोधतात. व्यापाराशी निगडित मारवाडी समाजसुद्धा येथे लक्षणीय आहे तो त्यामुळेच. शनिवारच्या बाजारावरच या साऱ्याची मुख्य भिस्त असते. 'प्याज से लेकर ब्याज तक' सग
  या गोष्टींना सामावून घेणारा घोटीचा हा बाजार पाहिल्यावर रस्त्यावरच्या 'कमोडिटी मार्केट'ची महती आपोआपच पटून जाते. शिवाय एफ. एम. सी. जी. मार्केटसारखी 'ब्रँड'ची दादागिरी इथे नाही.
  कारण, इथे त्याहूनही महत्त्वाचे ठरतात ते नेहमीचे विक्रेते व ग्राहक यांचे ऋणानुबंध. आणि बाजारात भाव खाऊन जातात ते विशिष्ट लकबीत स्वत:च्याच पंच लाइन्स आणि जिंगल्सचा तारस्वरात पण खुबीने वापर करणारे फेरीवाले!

  हे सदर दर आठवड्याला प्रसिद्ध होईल.


Trending