आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशांताने कोणतेही काम सुरू केले की कोजागिरीची लुडबूड तिथे होणारच. शांता आणि तिच्या मैत्रिणी मिळून त्यांच्या संघटनेसाठी बोधचिन्ह बनवत होत्या. विविध प्रकारचे चेहरे काढून स्वातंत्र्याचे चिन्ह म्हणून पंख काढणे चालू होते. कोजागिरी त्या वेळी साधारण सात-आठ वर्षांची होती. तिनेही आपली कारागिरी दाखवायला सुरुवात केली. रेघोट्यांतून आकार उमटत होते. शेवटी तिनेही एक चिन्ह तयार केले होते. एका छोट्या मुलीचा चेहरा आणि अंग मात्र चिमणीसारखे होते. चिवचिव करत उडणारी मुलगी होती ती. शांताच्या मैत्रिणीने त्या चित्राचे कौतुक केल्यावर आपल्याच नादात अनेक उडणा-या मुली विविध आकारात कोजागिरी गुंफत गेली होती. तिच्या भावविश्वात कदाचित सर्वच छोट्या मुलींना पंख होते. इकडे शांताला आणि तिच्या मैत्रिणीला मिळून पंखाची जुळणी करायला खूप खटाटोप करायला लागला होता.
Sisterhood is powerful हे पुस्तक समोर पडले होते. ते पुस्तक वाचण्याचे तिचे वय नव्हते. तरी शीर्षक वाचल्यावर कोजागिरीने शांताला विचारले, ‘याचा अर्थ काय होतो?’ शांताला समजेना आता ही संकल्पना कोजागिरीला कशी समजावून सांगावी. ‘स्त्रियांचा देश, त्यांची भाषा कोणतीही असली तरी त्यांचे अनेक अनुभव सारखे असतात. त्या एकमेकींना समजून घेऊ शकतात. फरक असले तरी त्यांची मैत्री होऊ शकते आणि त्यामुळे त्यांची ताकद वाढते.’ कोजागिरीचा चेहरा गोंधळल्यासारखा दिसू लागला. शांताने थांबून म्हटले, ‘म्हणजे तुझी आणि अनघाची कशी बहिणीप्रमाणे मैत्री आहे ना तशी किंवा माझी आणि मावशीची कशी मैत्री आहे तशी सर्व स्त्रियांची मैत्री होऊ शकते.’ आता थोडेसे तिला उमजले, असे शांताच्या लक्षात आले. काही दिवसांनी जलरंगात एक चित्र तयार झाले. आकाशात उगवत्या सूर्याचे रंग उधळले होते. मोठा बुंधा असलेले झाड आपल्या फांद्यांनी आकाश झाकत होते. त्या पानांतून उगवतीचे रंग झिरपत होते. दूरवर क्षितिजापर्यत जाणारी एक वाट होती. त्या वाटेवर पाठमो-या, हातात हात घेतलेल्या दोन मैत्रिणी होत्या. त्यांचे केस वा-यावर उडत होते. एकीचा थोडासा वाकलेला चेहरा प्रसन्न होता. Sisterhood is powerful या शीर्षकाची आठवण होईल अशी सगळी जुळणी होती.
एकदा शांताला कोजागिरीने विचारले होते, ‘आई, फेमिनिझमचा रंग कोणता?’ शांताला क्षणभर कळेना, आता या रंगाची कोजागिरीला का उत्सुकता लागली आहे ते! ‘म्हणजे असे गं, कामगार क्रांतीचा रंग लाल, दलितांच्या क्रांतीचा रंग निळा तसा फेमिनिझमचा कोणता?’ जास्त स्पष्ट करत कोजागिरी म्हणाली. शांताला समजले. ‘तशा अर्थाने म्हणालीस तर फेमिनिझमचा रंग जांभळा - पर्पल.’ पुढे कोजागिरीने पुस्तकात नाक खुपसून आपले वाचन चालू ठेवले. शांताने पाहिले, तिच्या हातात एलिस वॉकरची ‘दी कलर पर्पल’ ही कादंबरी होती. जेन वेबस्टरच्या ‘डॅडी लाँग लेग’च्या जगामधून चौदा वर्षांची कोजागिरी बाहेर पडत होती. पर्पल हा शब्द ऐकल्यावर तिचे शंका-समाधान झाले होते. एक दिवस कोजागिरी म्हणाली, ‘हे बघ माझे कलर पर्पल’! शांता चित्राकडे पाहत राहिली. जांभळ्या रंगाच्या विविध छटा वापरून भूमितीच्या आकृतिबंधातून एक आनंदाने विभोर झालेली छोटी मुलगी नृत्य करताना आनंदाशी एकरूप झाली होती.
राजस्थानमधील रूपकंवरला ‘सती’ घालवल्यावर घरात उलटसुलट चर्चा होत होती. शांताच्या संघटनेने सह्यांची मोहीम सुरू केली होती. हे सर्व कोजागिरीच्या कानावरून जात होते. त्याच दरम्यान अपर्णा सेनचा सती हा सिनेमाही दाखवला होता. शांताच्या घरी येणा-या मैत्रिणी त्यावर चर्चा करत होत्या. आजूबाजूला घुटमळत कोजागिरीने कागदावर एक रेखाचित्र तयार केले होते. त्यामध्ये अनेक माणसं चितेवर जिवाच्या आकांताने धडपडणा-या बाईकडे दगडासारखी बघत उभी होती. ती बाई आगीने लपेटण्यापूर्वी आकाशातून काही बायका त्या चितेवरील बाईला अलगद उचलून घेत होत्या. त्या चित्राचे नाव होते, when living are looking on, the dead are helping the dying.
चिमणीसारखी पंख फुटलेली विविध आकारांतील छोटी मुलगी; लांबवर उगवतीच्या रंगात पाठमो-या हातात हात घालून चालत जाणा-या दोन मैत्रिणी; पर्पल रंगातील नृत्यात मग्न मुलगी; काळ्या शाईने रेखाटलेला चितेवरील बाईला अलगद उचलून नेणारा आकाशातील बायकांचा समूह. शांताच्या डोळ्यासमोर कोजागिरीच्या वाढीचे अनेक टप्पे उभे होते. दर टप्प्यावर कोजागिरीला भेटलेला फेमिनिझमचा रंग वेगळा होता. कोजागिरीने काढलेली चित्रे सांगत होती, फेमिनिझमचा जांभळा रंग आयुष्यातील सर्व रंग कवेत घेणे अवघड आहे!
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.