आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान शिक्षण: आकाश निळे का?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या प्रयोगात आपण आकाश निळे का दिसते, याचा उलगडा करून घेणार आहोत. तेसुद्धा सप्रयोग. प्रयोगासाठी लागणारे साहित्य अगदीच मामुली. एक टॉर्च, घरी चौकोनी काचेचा ग्लास असल्यास उत्तम. एक कप दूध.

आता ग्लास टेबलावर ठेवा. ग्लास चारही बाजूंनी तुम्हाला पाहता यायला पाहिजे. ग्लासमध्ये दोन तृतियांश पाणी भरा. आता ग्लास एक चतुर्थांश रिकामा आहे. काचेचा नेहमीचा ग्लास 150 मिली आकारमानाचा असतो. त्यात 100 मिली पाणी आपण घातले आहे. आता ग्लासमध्ये अर्धा कप दूध ओता. ते चमच्याने ढवळा. थोड्या वेळाने पाणीआणि दुधाचे मिश्रण स्थिर झाल्यानंतर टॉर्चचा उजेड ग्लासच्या बाजूने सोडा. ग्लासच्या बाजूने टॉर्चचा प्रकाश झोत कसा दिसतो ते पाहा. प्रकाशझोत निळा दिसतो. आता प्रकाशझोताच्या विरुद्ध दिशेने पाहा. प्रकाश पिवळसर दिसेल.आता आणखी थोडे दूध ग्लासमध्ये ओता. आणखी एकदा टॉर्चचा प्रकाशझोत बाजूने पाहा, तो अधिक निळा दिसेल. प्रकाशझोताच्या विरुद्ध बाजूने तो भगव्या तांबड्या रंगाचा दिसेल. ग्लासमधून शिरताना प्रकाशझोत विस्तारल्याचे दिसेल. प्रकाशझोत बाजूने निळा आणि समोरून तांबडा का दिसतो? याचे उत्तर सोपे आहे. कोणताही अडथळा नसेल तर प्रकाश सरळ रेषेत जातो. फक्त पाणी भरलेल्या ग्लासमधून बाहेर येणारे प्रकाशकिरण फारसे विस्फारत नाहीत, पण त्यांना कोणत्याही पदार्थाचा अडथळा आल्यास ते विस्फारतात. दुधामध्ये असलेल्या अनेक कणांमुळे तुम्हाला प्रकाशकिरण विस्फारलेले दिसतील. पांढरा प्रकाश सात विविध रंगांच्या किरणांमुळे बनला आहे. त्यातील सर्वात लहान तरंग लांबीचा रंग निळा आणि सर्वाधिक तरंग लांबी तांबड्या रंगाची आहे. दुधातील कणांमुळे प्रकाशाच्या विस्फारण्यास प्रकाश प्रकीर्णन (स्कॅटरिंग) असे म्हणतात. आकाश निळे दिसणे म्हणजे सूर्याचा प्रकाश बाजूने पाहण्यासारखे आहे. सूर्योदयाच्या किंवा सूर्यास्ताच्या वेळी तुम्हाला सूर्य तांबडा दिसतो, तेव्हा तुम्ही सूर्य सरळ समोरून पाहता. सूर्यास्ताच्या वेळी सूर्यकिरण लांबच्या मार्गाने पृथ्वीपर्यंत पोहोचतात. त्यामुळे सूर्य तांबडा दिसतो. दुपारच्या वेळी सूर्यकिरण पृथ्वीवर लंब मार्गाने पोहोचत असल्याने आकाश प्रकीर्णनांमुळे निळे दिसते. जर कधी तुम्ही पृथ्वीबाहेर अवकाशात गेलाच, तर मात्र आकाश निळ्याऐवजी चक्क काळे दिसते.
madwanna@hotmail.com