आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ती ‘कर्ती’ होते तेव्हा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘सोसायटीमधल्या फ्लॅटमध्ये माझ्या मुलीसह मी एकटीच राहते हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. माझ्या दारासमोर सातत्याने कचरा टाकणं, माझ्याच फ्लॅटमध्ये पाणी, विजेच्या अडचणी निर्माण करणं, हे सर्व हेतुपुरस्सर आहे. माझ्या मुलीला एकटं गाठून, मी घरी नसताना तिला कोण काय प्रश्न विचारतं हेसुद्धा मला कळलंय. मला एवढंच सांगायचंय की, आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या. इथल्या प्रत्येकाबद्दलची सर्व वैयक्तिक माहिती माझ्याकडेही आहे. या माहितीचा मीही वेडावाकडा उपयोग करू शकते; पण मला इतरांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकवायला आवडत नाही. तुम्ही सर्वांनीही ही गोष्ट पाळावी. अन्यथा या सगळ्यांचा बंदोबस्त कसा करायचा हे मला चांगलं ठाऊक आहे’, अनेक दिवसांपासून होत असलेल्या त्रासाबद्दल शुभदाने सोसायटीमधल्यांना चांगलंच धारेवर धरले.


संगोपनातल्या आनंदासाठी दत्तक मुलींचा एकटीने सांभाळ करणारी सुश्मिता सेन किंवा चौकटीबाहेरचं प्रेम निभावताना मुलीला एकटीनं मोठं करणारी नीना गुप्ता ही नावं सर्वांच्याच परिचयाची. त्यांच्याभोवतीचं ग्लॅमर आणि त्यातून त्यांच्या वाट्याला आलेलं कौतुक हेच त्यांचं सुरक्षिततेचं कवच. आपल्या आसपासही अनेक सुश्मिता, नीना असतात. घटस्फोटित, विधवा, परित्यक्ता किंवा तडजोडीमुळे संसार एकटीने रेटावा लागणा-या. कौतुक आणि औत्सुक्यापेक्षा अनेक प्रश्नांचा तिढा डोक्यात निर्माण करणा-या. लौकिकार्थाने अशा स्त्रियांना कुठलाच आधार नसतो. पण याच वेलीच्या आधाराने तिचं मूल आकाशाला गवसणी घालतं. सामाजिक, आर्थिक, मानसिक, शारीरिक पातळ्यांवर रोज नव्या आव्हानांवर मात करत संसाराच्या आघाडीवर खंबीरपणे टिकून राहणा-या या धाडसी महिलांनी ‘कर्ता पुरुष’ या संकल्पनेलाच आज आव्हान दिलंय.


औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातली बारावी शिकलेली सीमा. नगर जिल्ह्यातलं सोनई हे तिचं सासर. सीमाचं लग्न लवकर झालं. जुळी मुलंही झाली. मुलांच्या जन्मानंतर व्यसनी, बाहेरख्याली नवरा बदलेल या आशेवर असणारी सीमा नव-याच्या बेपत्ता होण्यानं कोलमडली. गेली कित्येक वर्षे तिचा नवरा बेपत्ता आहे. सध्या ती मुलांसह औरंगाबादला तिच्या आई-वडिलांकडे राहते. मुलांचं शिक्षण सुरू असताना तिनेही नर्सिंगला अ‍ॅडमिशन घेऊन कोर्स पूर्ण केला. ती आता एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करते. घरची आर्थिक घडी तिने व्यवस्थित बसवली. मुलांचा खर्च, भविष्याची तरतूद करते आहे. कमी शिकलेली असूनही सीमा मुलांची जबाबदारी समर्थपणे पेलतेय. मुलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतेय.


नाशिकची कल्पना. सर्वांचा विरोध झुगारून प्रेम विवाह करणारी. नव्याचे नऊ दिवस सरल्यावर नव-याकडून होणारा त्रास तिने काही दिवस सोसला. नवरा बदलत नाही हे लक्षात आल्यावर कल्पनाने घटस्फोटासाठी अर्ज केला. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेला खटला ती जिंकली. सध्या पोटगीच्या रकमेसाठीचा सर्वोच्च न्यायालयातला खटला सुरू आहे. गेल्या बारा-तेरा वर्षांपासून न्यायालयीन लढाई लढत असूनही कल्पनाने मुलीच्या संगोपनात कसर ठेवली नाही. तिची मुलगी शाळेत हुशार विद्यार्थिनी, उत्कृष्ट व्हॉलीबॉलपटू म्हणून ओळखली जाते. स्वत:च्या आणि मुलीच्या हक्कासाठी कल्पना ठामपणे उभी आहे. कोणत्याही आधाराशिवाय.


पालकत्वाचं आव्हान
इथे उल्लेखलेल्या महिला ही समाजातली काही प्रातिनिधिक उदाहरणं. संसार एकहाती चालवणा-या या महिलांचं कर्तृत्व कौतुकास्पद आहे आणि तितकंच आव्हानात्मकही. कारण एकाच वेळी अनेक पातळ्यांवर त्यांचा लढा सुरू आहे. हा लढा स्पष्टपणे जाणवतो ते त्यांच्या पालकत्वाच्या भूमिकेत. आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी करावी लागणारी नोकरी, त्यासाठी होणारी धडपड, नोकरीमुळे मुलांना योग्य व पुरेसा वेळ देता येत नाही, ही मनातली अपराधीपणाची भावना, आणि आईसोबतच प्रसंगी बाबाची भूमिका पार पाडण्याची दुहेरी कसरत या सर्व बाबी स्त्रियांची परीक्षा पाहणा-या ठरतात. शिवाय आपल्या कुटुंबात बाबा नाहीत ही मुलांच्या मनातली टोचणी, त्या संदर्भातले प्रश्न, त्या प्रश्नांना उत्तर देताना होणारी मनाची कुचंबणा, यामुळे स्त्रियांच्या भावनिक गुंतागुंतीत भर पडते. कल्पना, शुभदासारख्या स्त्रियांना अपत्याच्या, ‘माझे बाबा कुठे आहेत’? या प्रश्नाचं उत्तर देणं, त्यांचं समाधान करणं, पालकत्वाची कसोटी पाहणारं ठरतं. या सर्व प्रकारामुळे मुलांच्या मनात नात्यांविषयी अढी निर्माण होण्याची शक्यताही असतेच.


मुलं विशिष्ट वयाची झाल्यानंतर अशा स्त्रियांच्या पालकत्वाच्या आव्हानाचा दुसरा टप्पा सुरू होतो. मुलांचं स्वत:चं विश्व निर्माण झालेलं असतं. त्यातच ती रमलेली असतात. मुलांच्या प्रायोरिटीज बदललेल्या असतात. त्यातूनही पहिला संसार मोडल्यानंतर दुस-यांदा डाव मांडणा-या स्त्रियांचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे मुलं मोठी झाली, त्यांची लग्नं झाली की या स्त्रियांना एकटेपणाचा सामना करावा लागतो.


सामाजिक मानसिकता
कोणत्याही कारणामुळे एकट्याने मुलांना वाढवण्याची जबाबदारी अंगावर पडलेला पुरुष अनेकांच्या कौतुकाचा विषय असतो. मग हेच कौतुक, आदराची भावना महिलांच्या वाट्याला का येत नाही? एखाद्या स्त्रीने एकटीने संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पेलताना, मुलांना सांभाळताना तिच्याबद्दल संशयानेच प्रश्न का उपस्थित केले जावेत? आपल्याला ‘चान्स’ मिळेल या ‘दूरदृष्टी’ शिवाय येणारं नि:स्वार्थ सहकार्य अशा स्त्रियांच्या वाट्याला का येऊ नये? अशा स्त्रियांनी कौटुंबिक जबाबदारी पेलताना कधी तरी स्वत:साठीही घेतलेली स्पेस आणि कम्फर्ट झोन यांकडे खुल्या मनाने पाहण्याची ‘नजर’ आजकालचा ‘सुशिक्षित’ समाज हरवून बसला आहे. एखाद्याला मदत करता आली नाही तर त्याच्या मार्गातला निदान अडसर तरी बनू नये, इतक्या साध्या विचारांची प्रगल्भता, समाज अशा कुटुंबांच्या बाबतीत दाखवत नाही. नव-याच्या आधाराशिवाय एकटीने कुटुंबाचा डोलारा पेलणा-या महिला कायम उपहास, हेटाळणी किंवा कुत्सित नजरांच्याच धनी होतात. निकोप समाजासाठी कुटुंब संस्था महत्त्वाची आहे असं म्हणताना अशा महिलांचं कुटुंब हा कायमच चर्चेचा विषय होऊन बसतो. अशा स्त्रियांच्या प्रत्येक कृतीविषयी-वर्तनाविषयी बोलण्याचा, टीका करण्याचा आपल्याला निसर्गदत्त अधिकार आहे, असाच आवेश समाजातल्या बहुतेकांचा असतो. दुर्दैव असे की या ‘बहुतेकांमध्ये’ महिलांचाही समावेश आहे.


महिला कुटुंबप्रमुख असलेल्या घराकडे पाहण्याची समाजाची दृष्टी, त्यांना मिळणा-या वागणुकीविषयी अनेक प्रश्नांचा डोंगर समोर उभा राहतो. कारण प्रत्येक समस्येचं उत्तर शोधण्यासाठी थेट प्रश्नालाच भिडायचं नसतं, हेच आपण विसरतो आहोत. ब-याचशा समस्यांची-प्रश्नांची उत्तर संयमित सामाजिक वर्तनातच दडलेली असतात. शेवटी जखमा ब-या होण्यासाठी जरी औषधाची गरज असली तरी प्रत्येक जखमेसाठी मलमपट्टी आवश्यकच असते असे नाही. आपुलकीची हलकेच घातली गेलेली फुंकरही वेदनेची तीव्रता कमी करते. ही फुंकर घालण्याचं काम समाज नक्कीच करू शकतो, नाही का?