आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mrinmayee Ranade Article On How Women Perceive Themselves

जब तुम मुझे अपना कहते हो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोजच्याप्रमाणे सकाळी ‘ब्लॅक अँड व्हाइट’ गाणी ऐकत ऐकत तिची कामं अलगद सुरू होती. बहुतेक गाणी शब्दप्रधान असल्याने ती ऐकताना अधिक आनंद मिळे तिला. आज पहिलंच गाणं लागलं, ‘चेहरे पे खुशी छा जाती है, आँखों में सुरूर आ जाता है, जब तुम मुझे अपना कहते हो, अपने पे गुरूर आ जाता है.’


या शब्दांनी ती थोडी गोंधळून गेली. आपल्या प्रेमाला प्रतिसाद मिळाला म्हणून नायिका खुश होती आणि तो आनंद वर्णन करत होती. चेहरा आनंदाने उजळून जातो आणि डोळ्यांतही वेगळीच चमक दिसते, वगैरे वगैरे. पुढच्या वाक्याला ती थोडी ठेचकाळली. ‘तू मला आपलं म्हटलंस की मला माझाच अभिमान वाटू लागतो.’ का बरं असं वाटावं या नायिकेला? म्हणजे आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे तिने त्याचा स्वीकार करणं व प्रेमाने प्रतिसाद देणं यासारखी सुंदर गोष्ट जगात दुसरी नसावी. पण दुस-याला काय वाटतं, यावर आपण कोण आहोत, किती लहान वा मोठे आहोत याची चाचणी करणं तिला काही पटलं नाही.


मग तिला वाटलं की, कदाचित ‘त्याला मी आवडलेय म्हणजे मीसुद्धा चांगली, छान, प्रेम करण्याजोगी आहे,’ असं नायिकेला वाटलं असेल. तिच्यातला आत्मविश्वास जागृत झाला असेल या भावनेमुळे. दोन व्यक्तींचं एकमेकांवर प्रेम असतं तेव्हा आपण दुस-याच्या पे्रमाला लायक आहोत का अशी भीती दोघांनाही वाटत असते. त्यातूनच मग सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे ‘गुरूर’ येत असावा. हम भी कुछ कम नहीं असं वाटायला लावणारा.


स्वत:वर विश्वास आणि प्रेम असणं, आपण आहोत तसे स्वीकारणं, कमतरतांवर मात करणं आणि असलेले गुण जोपासणं आपल्या जगण्यासाठी आवश्यक आहे, यावर तिचा विश्वास होता. ‘आलात तर तुमच्यासोबत, नाही तर माझ्याच सोबत’ या तत्त्वानुसार जगण्याचा ती प्रयत्न करत असे. ते सोपं नव्हतं; पण अशक्यही नव्हतं. त्यामुळेच हा गुरूर तिला खटकला बहुधा. तुम्हाला काय वाटतं?


दसरा म्हणजे सीमोल्लंघन. पण सीमा हा शब्द आपण काही गावाची/शहराची/देशाची सीमा एवढ्या मर्यादित अर्थाने वापरत नाही. कधी आपल्या सहनशीलतेची सीमा ओलांडते, कधी रागाची. कधी आपण आपल्याच मर्यादा सोडून (वावगं) वागतो तर कधी (कौशल्याच्या, आर्थिक, सामाजिक) सीमा पार करून एखादी गोष्ट मिळवतो. दस-याच्या निमित्ताने ‘मधुरिमा सीमोल्लंघन विशेषांक’ आम्ही काढतो आहोत. त्यासाठी आपले अनुभव लिहून पाठवणार ना आमच्याकडे? शब्दमर्यादा आहे 500 आणि कालमर्यादा आहे 30 सप्टेंबर. चला तर, आळसाचीही सीमा ओलांडून लिहायला घ्या...