आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण होता तो ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेली दहा मिनिटे शांता कोजागिरीच्या फोनची वाट पाहत होती. ऑफिसमधील फोनशेजारी बसणा-या सहका-याने शांताच्या नावाचा पुकारा केला. त्या क्षणी शांताचा जीव भांड्यात पडला, ‘हॅलो, कोजा... पेपर छान झाला नं?’ पलीकडून नेहमीचा हलो ऐकू येईना. ‘आई....स स.... तू ताबडतोब घरी ये.’ पुन्हा हुंदक्यांचा आवाज. ‘कोजा, मी येते. काय झालं ते सांगशील का?’ एवढे शब्द पुरे होईपर्यंत पलीकडून कोजागिरीचे रडणे ऐकू येऊ लागले. शांताला क्षणभर काही सुचेनासे झाले. तरी आवाजात घाबरल्याचे भाव उमटणार नाहीत याची खबरदारी घेत तिने सांगितले, ‘फोन ठेवून दे. पाणी पी. मी दहा-पंधरा मिनिटांत येतेच आहे. अजिबात घाबरू नकोस. मी आलेच.’ एवढे शब्द बोलली खरे; पण शांताचे पाय लटपटायला लागले होते. काही तरी वाईट झालं असणार. त्याशिवाय कोजागिरी अशी रडणार नाही.


जागेवर येऊन सावरण्यासाठी शांता बसली. बॅग घेऊन जवळच्या मैत्रिणीला सांगून ती निघाली. ‘काही काळजी करू नका. पेपर अवघड गेला असणार. इकडे घेऊन या,’ असा धीर सहकारी देत होते. मैत्रीण म्हणाली, ‘अगं, तिची पाळी वगैरे सुरू झाली असेल. तू कल्पना देऊन ठेवली असणारच. पण काही मुली गडबडून जातात.’ हे सर्व तर्क शांताच्या मनाची घालमेल कमी करण्यास फारसे उपयोगी पडले नाहीत. कारण कोजागिरी अशा कारणांनी रडेल, असे तिला वाटत नव्हते.
रिक्षा घरी पोहोचेपर्यंत शांताला युगे युगे गेल्यासारखे वाटले. धावत जिना चढून तिने दारावरची बेल दाबली. काय समोर वाढून ठेवले असणार कोण जाणे, असे बरे-वाईट विचार थांबवता येत नव्हते. कोजागिरीने दार उघडले. शांताने सर्वात प्रथम तिला जवळ घेतले. कोजागिरी तिला बिलगलीच. हळूहळू रडत, हमसत सर्व काही शांताला कळत गेले.


‘मी नेहमीप्रमाणे बसस्टॉपवरून परत येत होते. माझ्या मैत्रिणी दुस-या बिल्डिंगकडे वळल्या. आपल्या फाटकातून हळूहळू मी जिन्यात आले. माझ्या आजूबाजूला कोणी होते हे मला कळले नाही. मी एक जिना चढून दुस-या जिन्याच्या काही पाय-या चढले तर मागून कोणी तरी मला म्हणाले, तुझ्या स्कर्टला कसला डाग पडला आहे बघ. तो माणूस कोण होता हे मला आठवत नाही. मी मागे वळले, तर त्या माणसाने मला पकडले,’ कोजागिरीला पुढे सांगता येईना. थोड्या वेळाने ती म्हणाली, ‘तो मला घट्ट धरत होता. मी जोरात ओरडले. एक लाथ मारली त्याच्या छातीत. तर तो दोन-तीन पाय-या मागे पडला. मी पुन्हा आरडाओरडा केला. मग मात्र पळून गेला. मी एवढी घाबरले होते की त्याचा पाठलाग न करता मी पळत घराचे दार उघडून ते लावून घेत धाडदिशी पलंगावर पडले. मग तुला फोन केला.’


‘आई, कोण असेल तो माणूस? मला पुसटसा त्याचा चेहरा आठवतोय.’ शांता कोजागिरीचा चेहरा पुसत होती. ‘तो मला का पकडत होता. मला पळवून नेणार होता का?’ कोजागिरीच्या तर्कांना शेवट नव्हता. ‘थोडा वेळ तू शांत राहा. तुझी काही चूक नाही. तोच माणूस वाईट होता. तू खूप शूरपणे त्याला लाथ मारलीस. बाबा घरी आला की आपण तिघे मिळून काय करायचे ते ठरवू. तोपर्यंत मी ऑफिसला फोन करून टाकते आणि आपण दोघी तुझे आवडते काला-खट्टा सरबत पिऊया. एखादी छानशी गोष्ट वाचू.’ शांताने कोजागिरीला तोंड धुवायला सांगितले. कोजागिरीचा मूड चांगला होणे फार महत्त्वाचे होते.
संध्याकाळी बाबा आल्यावर जवळच्या पोलिस स्टेशनमधे रीतसर तक्रार दिली. कोजागिरीच्या शाळेतून परत येण्याच्या वेळा सांगितल्या. शेजा-यांना या गोष्टीची कल्पना दिली आणि शाळेतून परत येण्याच्या वेळेला थोडेसे सजग राहायला सांगितले. कोजागिरीलाही जिना चढताना मागे कोणी नाही ना यावर लक्ष ठेवायला सांगितले. कोजागिरीला बाबा सांगत होता, ‘घाबरायचे नाही. चोर-चोर म्हणून आरडाओरडा करायचा म्हणजे सर्वांचे लक्ष जाते. घाबरलीस तर तोंडातून आवाजही फुटणार नाही. तू धीटपणे लाथ मारलीस, हे ग्रेटच. वर येऊन जर तू चोर चोर असा आरडाओरडा केलास तर कदाचित् इतरांनी त्या माणसाला पकडले असते. काही बिघडत नाही. आता तू जराशी जास्तच धीट झाली आहेस... हो की नाही?’ बाबा कोजागिरीचे धैर्य वाढवत होता.


पोलिस स्टेशनमधे त्याच्या बरोबर कोजागिरी गेली होती. तिथेही व्यवस्थित बोलली होती.
काही दिवसांनी कोजागिरीने शांताला विचारले होते, ‘आई, तो माणूस मला का त्रास देत होता? त्याला आपण कोणती शिक्षा द्यायला पाहिजे म्हणजे तो असा दुष्टपणा करणार नाही? सांग नं.’ कोजागिरीच्या मोठ्यामोठ्या डोळ्यांतील आव्हान शांताला पेलता आले नाही.