आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणामुळे शरपंजरी ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरेंद्र मोदी यांची निवडणूक समितीचे अध्यक्ष म्हणून भाजपच्या राष्‍ट्रीय कार्यकारिणीने निवड करताच अडवाणी यांना शरपंजरी पडलेल्या भीष्माचार्यांची आठवण झाली. पण त्यांची जर ती अवस्था झाली असेल तर ती कोणामुळे?
कौरव व पांडव यांना युद्धकलेचे शिक्षण देणा-या भीष्माचार्यांनी अखेरीस कौरवांचा पक्ष घेतला. तेव्हा ते शरपंजरी पडले, त्याची जबाबदारी त्यांच्यावरच होती. अडवाणींना ‘ना इकडे ना तिकडे’ अशी अवस्था होऊन शरपंजरी पडल्यासारखे वाटत असेल, तर तेच त्यास जबाबदार आहेत. भाजपला अतिरेकी हिंदुत्ववादाच्या वळणावर नेऊन वाजपेयींना नामोहरम करण्याचे राजकारण अडवाणी यांनी खेळले. राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीचे संयुक्त मंत्रिमंडळ होण्याची संधी आली तेव्हा वाजपेयींची निवड झाली. पण पक्ष जहाल धोरण स्वीकारील म्हणून अडवाणी प्रयत्नशील राहिले. तसे पाहिले तर राममंदिराच्या उभारणीचा कार्यक्रम भाजपचा होता, तरी वाजपेयी त्यासाठी रथयात्रेत सामील झाले नाहीत आणि इतर कोणताही अतिरेकी मार्ग त्यांना मानवणारा नव्हता. तथापि अडवाणींनी पर्यायी नेतृत्व उभे करण्याचा घाट घातला आणि पक्षाची यंत्रणा स्वत:च्या नियंत्रणाखाली ठेवली.

वाजपेयी यांनी तसे काही केले नाही आणि त्यांच्या स्वभावास ते जुळणारे नव्हते. अडवाणी यांनी पक्ष स्वत:च्या नियंत्रणाखाली आणल्यावर जे वीर हाताशी धरले, त्यात मोदी हे एक होते. मोदी यांनी गुजरातमधील पक्ष शाखेत एकेकाला दूर करण्याचे धोरण अवलंबिले असताना, त्यांना पाठिंबा दिला तो अडवाणींनी. यामुळे पक्षात विविध मतांच्या लोकांना सामावून घेण्याच्या धोरणास सुरुंग लागला. यातून निदान गुजरातमध्ये तरी मोदी हेच एकमेव नेते होऊन बसले. मग मोदी म्हणतील ते गुजरात करील, अशी हवा निर्माण झाली. आता ‘जे गुजरात आज करील ते भारत उद्या करील,’ अशी वेडगळ समजूत भाजपमध्ये पसरत चालली असून त्याचे विद्यमान अध्यक्ष तसेच जेटली इत्यादींसारखे याच समजुतीने धुंद झाले आहेत. यामुळे मोदी म्हणजे हुकमी पत्ता असे जेटली यांनी म्हटले आहे. जेटली यांच्यासारख्या पोशाखी पुढा-यास स्वत:चा हमखास मतदारसंघ नसल्यामुळे ते गुजरातमधून राज्यसभेवर गेले आहेत. सध्याची मुदत संपली की पुन्हा राज्यसभा हवी, तर मोदींचाच भगवा अंगरखा धरायला हवा.


मोदी यांना हुकमी पत्ता म्हणून जेटली यांनी संबोधिले असले तरी कर्नाटकात विधानसभेच्या ताज्या निवडणूक प्रचारात मोदी यांनी भाग घेऊनही भाजपचा सणसणीत पराभव झाला, याकडे कानाडोळा करून चालणार नाही. भाजप हा पूर्वीप्रमाणे ध्येयवादी पक्ष राहिलेला नसल्याची खंत अडवाणी यांनी व्यक्त केली आहे. तीही दांभिकपणाची आहे. कारण त्या पक्षाचा जो काही ध्येयवाद होता तो संपला म्हणून तर केवळ गुजरातमध्येच नव्हे तर मुंबई-महाराष्‍ट्रात जे जुने व अनुभवी कार्यकर्ते होते व निवडणूकही लढवत होते, ते मागे पडले. राज्यसभेत तर काही धनाढ्यांची वर्णी लागली आणि हा नवा बाज आणणा-या प्रमोद महाजन यांची सद्दी सुरू झाली.


महाजन आणि जेटली यांच्यासारख्यांनी पंचतारांकित संस्कृती पक्षात आणली, अशी तक्रार पक्षाचे कार्यकर्ते करत असलेले मी ऐकले होते. या संस्कृतीत राष्‍ट्रीय कार्यकारिणीच्या बैठका आलिशान हॉटेलात होऊ लागल्या आणि पत्रकारांच्या ऐशआरामाची खास व्यवस्था होऊ लागली. ध्येयवादी पक्षाचे हे नवे रूप अडवाणींना खटकले नाही. उलट हा पालट घडवून आणणारे निदान प्रादेशिक पातळीवर सूत्रे हाती ठेवून होते. हे अडवाणी यांना समजले नसेल तर ते स्वत:च्या उद्देशपूर्तीच्या खटाटोपात गुंतले असावेत. संसदेत विरोधी पक्षाचा नेता कसा नसावा, याचा आदर्श गेल्या दहा वर्षांत अडवाणी यांनी उभा केला. अनुभवी व वृद्ध म्हणून त्यांनी स्वपक्षाच्या उतावळ्या तरुण खासदारांना न आवरता त्यांच्यातच सामील होऊन सभागृहाचे कामकाज केव्हाही व कोणत्याही कारणास्तव बंद पाडणे, हाच एकमेव कार्यक्रम आखला होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षालाही आपले क्रांतिकार्य तेवढेच आहे, असे वाटत असल्यामुळे त्याचे साहाय्य मिळाले. या दोन पक्षांतल्या अलिखित करारामुळे संसदेचा पुरता बोजवारा उडाला.


भाजपच्या हाती सत्ता आली तेव्हा अडवाणी व जसवंतसिंग यांनी पंडित नेहरूंची नावनिशाणी न ठेवण्याचा खटाटोप केला. नंतर जसवंतसिंग यांनी गुंतागुंतीची भाषा वापरलेले व कंटाळवाणे पुस्तक लिहिले व फाळणीला जिना नव्हे तर महात्मा गांधी जबाबदार असल्याचा निर्वाळा दिला. अडवाणी यांना जिना यांच्या धर्मातीततेचा साक्षात्कार झाला. यामागे जिनांच्या मूल्यमापनापेक्षा महात्माजींचे अवमूल्यन हा खरा हेतू होता. पण संघचालकांनी अडवाणींच्या नावावर फुली मारली. आता नरेंद्र मोदींच्या हाती पक्षाची सूत्रे दिल्यामुळे सत्ता हस्तगत होईल, अशी खात्री पक्षनेत्यांना वाटते ती बरोबर की अनाठायी, याबद्दल आजच निर्णय देणे योग्य नाही.


आजचे राजकीय चित्र काय आहे? कर्नाटक नुकतेच भाजपच्या हातातून गेले. तिथेही येदियुुरप्पा यांना वाचवण्याचे प्रयत्न अडवाणी करत होते. कर्नाटक गेल्यामुळे दक्षिणेच्या चारपैकी एकही राज्य त्या पक्षाच्या हाती नाही. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत मोदी यांच्या पक्षाला दुस-या क्रमांकाचीही जागा मिळाली नाही. झारखंडही हाती नाही. ओरिसात पटनाईक यांनी केव्हाच भाजपबरोबर काडीमोड घेतला. हरियाणा, हिमाचल प्रदेशही दूर. आग्नेयेकडील राज्यांत स्थान नाही.


उत्तर प्रदेश व बिहार या दोन राज्यांत बहुमत मिळाल्यास लोकसभेत बरीच मोठी संख्या होते. पण भाजपला तशी मिळणार नाही. आघाडीचे राज्य आणायचे म्हणून अनेक पक्षांशी हातमिळवणी करायची तर ममता बॅनर्जी, पटनाईक व जयललिता संघराज्यात्मक राजकारणाच्या गोष्टी करत आहेत, हे लक्षात घ्यावे लागेल.
या राजकारणास केंद्रसत्ता प्रबळ नको असते. जयललिता यांनी म्हणूनच तामिळनाडूच्या एकोणचाळीस व पुडुचेरीची एक यांपैकी एकही जागा दुस-या पक्षाला न देण्याचा पण केला आहे. लोकसभेत संख्याबळ अधिक तर सौदेबाजी करण्यास वावही अधिक, हा हिशेब आहे. भाजपने पंजाबमध्ये अकालींशी जमवून घेतले आहे, तसे तो जयललितांशी वा इतर काही राज्यातल्या पक्षांशी हातमिळवणी करीलही. पण आजकाल या प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांचे राजकारण वेगळ्या वळणाचे होत आहे. नितीशकुमार बिहारला खास दर्जा हवा, अशी मागणी करत आहेत. ममता बॅनर्जी एकंदरच संघराज्यात्मक घटना हवी, या दृष्टीने हालचाली करतात. जयललिता यांना प्रत्येक राज्याला त्याच्या नैसर्गिक साधनसामग्रीवर अधिकार हवा आहे. इतके करून मध्यवर्ती सरकारने मदतीचा हात पुढे करायचाच आहे. प्रत्येक राज्याने याप्रमाणे आपापल्या साधनसामग्रीचा विनियोग आपल्या हितासाठी करावा असे ठरले, तर केंद्राकडे स्वत:च्याच खर्चासाठी काय राहणार?


हे मागतात त्याप्रमाणे बदल करायचे तर राज्यघटना बदलावी लागेल. काँग्रेसने यात कधीही सहभागी होता कामा नये आणि या पक्षांशी स्पर्धा करून देशव्यापी राजकारणाचा मार्ग सोडू नये. यामुळे येत्या निवडणुकीत पराजय पत्करावा लागेल, पण तो परवडला. नाही तरी यापूर्वी केंद्रातील सत्ता गमावण्याचा अनुभव काँग्रेसने यापूर्वी घेतलाच आहे. त्यामुळे केंद्रात सत्ता मिळवण्यासाठी मोदी व त्यांचा पक्ष यांना प्रादेशिक पक्षांशी तडजोडी करायच्या असतील त्या त्यांना खुशाल करू देणे हे अंतिमत: काँग्रेसच्या हिताचे ठरेल. या तडजोडींनंतर मोदी सत्ताधारी झाले तरी बहादूरशहासारखी त्यांची गत होईल आणि त्यांच्याबरोबर संघनेत्यांचेही हात पोळतील.


gtalwalkar@hotmail.com