आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकटेपण का आणि कुठवर ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपल्याकडे शहरातील सुमारे 40% ज्येष्ठ नागरिक एकटे-वृद्ध पती वा पत्नीच्याही सोबतीवाचून एकाकी असे जिणे जगत असतात. वयाच्या साठी वा सत्तरीतली मानसिक अवस्था असा एकटेपणा सहज स्वीकारू शकत नाही. मानसिकदृष्ट्या हे अवघड आहे. मुळात या वयात माणसाचं मनोबल कमी झालेलं असतं. कोणत्याही आव्हानाला तोंड देण्याची तारुण्यातली वा प्रौढावस्थेतील ताकद क्षीण होत जाणं हा निसर्गक्रम आहे. तो नाकारण्यात अर्थ नाही. या वयातही भरपूर मनोबल असणारी माणसं दिसतात, पण अपवादाने. मात्र, वृद्धावस्थेतही माणूस आपला ‘अहम्’ सोडत नाही, त्यामुळे आपले मनोबल क्षीण झाल्याचे दाखवत नाही.

जीवनाच्या या टप्प्यावर वास्तवाचा स्वीकार करण्यात संकोच कसला? तीस ते चाळीस या वयोगटातील पुरुष किंवा स्त्री-दोघंही मुक्तपणे कुठेही एकटे राहू शकतात. त्या सहजतेनं 70-80 या वयाचा माणूस राहू शकत नाही. त्याने राहूही नये. वयाची ऐंशी वा नव्वदी गाठलेले काही ज्येष्ठ नागरिक मी पाहिले आहेत, जे भल्यामोठ्या बंगल्यात नोकर-चाकरांच्या मदतीने एकटे राहतात. त्यांची तीन-चार मुलं त्याच महानगरात आपापल्या मोठमोठ्या घरात अलग अलग राहत असतात. हा स्वभावातील फरक आहे. आयुष्याच्या 40-50 वर्षांनंतर माणसाच्या स्वभावानुसार त्याचं अलग असं व्यक्तित्व बनतं.

वयाची ऐंशी गाठल्यावरही तेच कंगोरे कायम राहिले तर ते अडचणीचं होतं. मुलगे, सुना, नातवंडं सर्वांबरोबर एकत्र राहताना माणसाला आपल्या स्वभावाला मुरड घालावी लागते, काही तडजोडी मान्य कराव्या लागतात. यात कोणत्याही प्रकारची शरणागती, कमीपणा वा मानहानी मानण्याचं कारण नाही. ही तर नैसर्गिक अवस्थेशी तडजोड आहे. ती स्वीकारण्याऐवजी आव्हानाचा पवित्रा घेणं शहाणपणाचं नाही.


अशा एकटेपणाला पर्याय म्हणून आपल्या मुलांना त्यांच्या परिवारासह आपल्याच छत्राखाली राखण्याचा आग्रह धरू नये. मोठ्या मुलाचं लग्न होऊन पहिली सून घरात आल्यावर काही काळ संयुक्त कुटुंब असायला हरकत नाही. मात्र, दुस-या मुलाचं लग्न झालं की मोठ्याचा अलग संसार थाटून द्यायला हवा. दोन मुलगे आणि त्यांच्या बायका सुरुवातीला कितीही एकोप्यानं आणि सलोख्यानं राहिल्या तरी हा एकोपा आणि सलोखा इंद्रधनुष्याच्या रंगासारखे असतात. सूर्यकिरणं किंचित जरी तिरकी झाली की त्यातले रंग लगेच उडून जातात. असं होण्याआधीच हे इंद्रधनुष्य कॅमे-यात बंदिस्त करून कधीकधी त्याचे रंग न्याहाळावे हे इष्ट! नाही तर मुलासुनांनी एकत्र होऊन म्हातारा-म्हातारीला एकटं पाडण्याचे प्रसंगही घडू शकतात.


मुलांना परदेशी पाठवण्याचा मोह हेही आजच्या काळात वृद्धाच्या एकटेपणाचं एक कारण असल्याचं दिसतं. परदेशात शिक्षण घेतल्यानेच प्रगती होते आणि पुढे तिकडेच नोकरीधंदा करण्याने आयुष्यात पुढे जाता येते या प्रकारच्या न्यूनगंडाचं हे फलित आहे. परदेशात उच्च शिक्षण आणि व्यवसायाच्या संधी जरूर मिळत असतील, पण आपल्याकडे अशा संधी मिळत नाहीत, असं मानणं बरोबर नाही. पालकांमधील इंग्रजी माध्यमाच्या मोहासारखाच हा आणखी एक मोह आहे. इंग्रजी माध्यमातून शिकल्यानेच मुले हुशार होतात हा गैरसमज आहे. त्याचप्रमाणे परदेशातील विद्याभ्यास आणि व्यवसायातूनच सुखप्राप्ती होते या विचारसरणीत काहीतरी गफलत आहे. शिक्षणासाठी आपल्या मुलांना परदेशात पाठवणारे बहुतांशी पालक आपली मुले गमावून बसले आहेत. कदाचित समृद्ध झाले असतील-पैशाने!


काही वर्षांपूर्वी आमच्या शेजारी एक ज्येष्ठ नागरिक जोडपं राहात होतं. मला स्वत:ला ज्येष्ठ नागरिक बवण्यासाठी अजून बराच मार्ग आक्रमायचा होता. नवरा-बायको दोघंही इतरांशी मिळून-मिसळून वागणारे आणि बोलक्या स्वभावाचे वाटायचे, मात्र घरात दोघंच असताना तिथे मौनाचंच साम्राज्य असायचं. याचं कारण तेव्हा नीटसं समजलं नव्हतं. आता लक्षात येतंय. वयाची पन्नास वर्षे जे निखळ सांसारिक आयुष्य जगले त्यांनी उतारवयात एकमेकांशी बोलायचं ठरवलं तरी किती अणि काय बोलणार? त्यांच्या घरात नव्यानंच अवतरलेला टीव्ही सतत चालू असायचा. नवरा बाहेर गेलेला असला आणि बायकोचं स्वयंपाकघरात काही तरी चाललेलं असलं तरी बैठकीतला टीव्ही चालूच. आज त्याचं कारण लक्षात येतंय. टीव्हीवरचा कार्यक्रम त्यांच्या दृष्टीनं एकटेपणाचा नागपाशासारखा विळखा सैलावण्यासाठी आणि एक प्रकारचा मानसिक आधार म्हणून उपयुक्त ठरत असावा. जीवनाच्या उत्तरावस्थेतच नव्हे, पूर्वावस्थेतसुद्धा काही वेळा माणसाला एकांत आवडतो, पण एकटेपणा आवडत नाही. उत्तरावस्थेत तर एकटेपणा कंटाळवाणाच नव्हे तर भयप्रद वाटण्याचीही शक्यता असते. पण जीवनाची प्रत्येक अवस्था आपल्या मनाजोगती नसते. त्यामुळे अशी अवस्था कमीत कमी कष्टप्रद आणि सुसह्य कशी करता येईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे. स्वास्थ्य उत्तम असेल तर सामाजिक, आध्यात्मिक किंवा अशाच एखाद्या कामासाठी मोबदल्याच्या अपेक्षेवाचून वेळ द्यायचं ठरवलं तर हा एकटेपणा काहीसा कमी होईल. समवयस्क मित्र किंवा एखाद्या गटाबरोबर रोज ठरावीक काळ घालवणं हेही करता येईल. मोठ्या शहरातून येण्याजाण्याचे अंतर आणि ट्रॅफिक या गोष्टी तापदायक ठरू शकतात. पण लहान ठिकाणी किंवा उपनगरांतून हे सोपं असतं. अशा भेटीत निरर्थक गप्पांमध्ये वेळ घालवता येईल, पण त्यातून मानसिक वार्धक्य वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी अशा भेटीत ज्येष्ठ नागरिकांचा बौद्धिक स्तरावर काही वादसंवाद घडायला हवा.
(क्रमश:)
अनुवाद - डॉ. प्रतिभा काटीकर, सोलापूर