आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपला रोजचा साधारण दिवस मनात आठवून पाहा. सकाळी घरातून बाहेर पडून कामासाठी बस, ट्रेन, रिक्षा घेत किंवा आपली गाडी चालवत ऑफिसमध्ये पोहोचायचे. ट्रेन लेट असते, हव्या त्या नंबरची बस मिळत नाही, अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या ऑफिसमध्ये पोचायला ट्रॅफिकमुळे दीड तास लागतो, रस्त्यावर चालताना कुठलीतरी गाडी अंगावर चिखल उडवून जाते, प्लॅटफॉर्मवर कोणीतरी माणूस ऑलमोस्ट तुमच्या अंगावर पानाची पिंक टाकतो, टॅक्सीवाले दाद देत नाहीत, ऑफिसमध्ये मनाविरुद्ध घडणा-या गोष्टींना, नावडीच्या माणसांना तोंड द्यायला लागतं.


एकदा स्वत:चे निरीक्षण करा. सरळ एक छोटी डायरी घेऊन आपण आज दिवसभर किती आणि कोणत्या शिव्या दिल्या याची नोंद करा. रात्री घरी येऊन जेवण झाल्यावर शांतपणे बसलात आणि ती डायरी उघडलीत, तर शिव्यांची संख्या बघून ‘इथे कोण सुसंस्कृत?’ म्हटल्यावर ‘हात वर करावा का’ अशी शंका येईल.


बाईने शिव्या देणे शोभत नाही या लिखित/अलिखित दंडकामुळे त्या तुलनेत कमी देतात शिव्या किंवा असं म्हणूया की उद्धार वा अपमान करायच्या स्त्रियांच्या पद्धती वेगळ्या असतील. भें***, मा***, चु****, भ*** या राष्‍ट्रीय शिव्या आहेत असं म्हणायला हरकत नाही आणि बाकी विविधतेत एकता हे तत्त्व आपण कितीही मनापासून पाळत असलो, तरी या चारपाच कॉमन शिव्या आपल्या देशातल्या कुठल्याही प्रांतात मुक्तपणे वापरल्या जाताना दिसतात. अर्थात प्रादेशिक फ्लेव्हर्स असतात ते वेगळेच! का देत असू आपण शिव्या यावर विचार बहुतेक वेळा होत नाही. एका कुठल्या तरी लेखात व लघुकथेत एक खूप इंटरेस्टिंग आणि गमतीशीर विचार मांडलेला वाचल्याचे आठवतेय. शिव्यांच्या प्रांतात सगळीच पुरुषांची मक्तेदारी आहे. कारण बहुतेक सगळ्याच शिव्या ज्याला दिल्या जाणार आहेत त्याच्या आई, बहीण, बायको म्हणजे बायकांवरून असतात. म्हणजे पुरुषांचा अपमान केव्हा होतो तर त्याच्या आयुष्यातल्या बाईचा लैंगिक अर्थाने किंवा चारित्र्याचा उद्धार केला की! आता अर्थात शिव्या देताना एवढा विचार थोडीच करतो कोणी! मसल मेमरीसारखे असते की ते. तसे म्हणायचेही नसते, पण आता दातओठ चावून, सगळा राग काढायची ही एकच पद्धत ठाऊक आहे की आम्हाला! फक्त पुरुषांना उद्देशून तयार केलेल्या शिव्याच नाहीयेत, शोधायला हव्यात, असा एक उपहासात्मक विचार करायला लावणारा मुद्दा होता त्या लेखात. राग यायचे प्रमाणच वाढलेय, कदाचित अगतिकता वाढली आहे, हातात नसलेल्या गोष्टींची संख्या वाढलीय, असंतोष वाढलाय, म्हणून असेल हे.


ट्रेनमधून कोणीतरी कोणाला तरी फेकून दिल्याच्या घटना आपण वाचतो. मी तर अनेकदा ट्रेनमधल्या महिलांच्या डब्यात झिंज्या उपटून, एकमेकांचे वजन, चक्की का आटा, आईवडील, संस्कार या सगळ्यांचा उद्धार होत प्रचंड हिंस्र भांडणे होताना पहिलीत. एकदा खूप शेवटच्या क्षणी पुण्याहून मुंबईला ट्रेनने जाताना टीसीला भेटून दंड भरून एक सीट घेतल्यावर पासधारक महिलांनी त्याच्यावर आणि माझ्यावर प्रचंड हल्लाबोल केला होता.


एकदा मी ज्या टॅक्सीत बसले होते, त्या चालकाला मागच्या टॅक्सीच्या चालकाने खाडकन एक मुस्कटात दिली होती. ज्याने मार खाल्ला त्याची चूक इतकीच की तो दुर्बळ होता, त्याला अरे ला कारे करता येणार नव्हतं. मी बोलायचा प्रयत्न केलाही. सिग्नल पडला म्हणून मग मागचा चालक आणखी चार शिव्या देत गेला निघून. मारणं हे आपली ताकद आपल्यापेक्षा दुबळ्या माणसांवर अजमावण्याच्या मानसिकतेचा भाग आहे. जिथे ते करता येणार नसतं तिथे शिव्या!
गांधीजी या देशात जन्माला आले होते याची शंका वाटेल असे वागतो आपण. गांधींच्या तत्त्वांबद्दल आणि बाकी अनेक गोष्टींबद्दल मते वेगवेगळी असू शकतीलही. पण जगभरातल्या अनेक विचारवंतांवर आणि तत्त्ववेत्त्यांवर ज्या माणसाच्या विचारप्रणालीचा प्रभाव आहे, बुद्ध ज्या ठिकाणी जन्मला त्या मातीचा, विचारांचा वारसा पुढे न्यायला आपण लायक आणि समर्थ नाही आहोत.


अविचारी राग येतो त्याचे मूळ कारण कायम ‘मला हवे तसे झाले नाही वा माझा कोणीतरी अपमान केला’ हेच असते. गांधीजींचेच एक वाक्य आहे ‘माझ्या परवानगीशिवाय कोणीही माझा अपमान करू शकत नाही वा मला दुखवू शकत नाही.’ ही सोपी गोष्ट विसरतो आहोत आपण?


राग आल्यावर 1 ते 10 अंक मोजल्यानंतरची आणि त्याआधीची आपली प्रतिक्रिया वेगळी असणार असते हे पुराव्याने सिद्ध झालेले आहेच. अन्याय, अत्याचार, असमानता याचा राग यायला हवा तो योग्य प्रकारे व्यक्त करायचेही मार्ग आहेत. पण मोबाइल सापडत नाहीये म्हणून च्या... म्हणणारी आमची तरुण पिढी, आयाबहिणींचा उद्धार करत किंवा त्या शिव्या ऐकून त्यावर आणखी दोन देणारे लोक मिळून समंजस समाज कधीच निर्माण करू शकत नाहीत. बाकी जगाने शिव्या देणे चुकीचे आहेच, ते कदाचित मी सुधारू शकणार नाहीये. पण माझ्या तोंडून राग अशा पद्धतीने व्यक्त होणार नाही याची काळजी जरी मी, तू, तिने, त्याने घेतली तरी खूप आहे. कारण बदल असेच सुरू होतात ‘स्वत:पासून’.