आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मीच का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गौरीने काल रात्री आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिच्या नव-याने म्हणजेच श्रीधरने मला फोनवर ही बातमी दिली. घरात वेळी-अवेळी होत असलेल्या कटकटींमुळे गौरी सतत दुर्मुखलेली असायची. पण ती एकदम असा टोकाचा निर्णय घेईल असं वाटलं नव्हतं. वाईटात चांगलं बघायची सवय झाल्यामुळे ती जिवंत आहे हे कळल्यानंतर मला बरं वाटलं. तिचा नवरा एका लहानशा खेड्यातला व शंभर टक्के शेतकरी कुटुंबात जन्मलेला. त्याची आई म्हणजेच गौरीची सासू पूर्णपणे अशिक्षित होती. सुशिक्षित माणसांशी कसं वागायचं हे तिच्या गावीही नव्हतं आणि नव-याच्या हेकट स्वभावामुळे वैवाहिक जीवनात सतत असंतुष्ट राहिल्यामुळे तिचा स्वभाव चिडचिडा झाला होता. गौरीने श्रीधरवरून जीव ओवाळून टाकल्यामुळे लग्नानंतर तिचा प्रियकराच्या खेडवळ व अशिक्षित आईवडिलांशीही संबंध येणार आहे हे ती विसरूनच गेली होती. तिने पत्नी या नात्याने त्याच्या घरात पाऊल टाकताच तिच्या सासूच्या कपाळावर आठ्यांची भर पडली. ‘ही बया आता माझ्या श्रीधरचा ताबा घेणार’ अशी खूणगाठ तिने मनाशी बांधल्यामुळे सासू-सुनेमध्ये पहिल्या दिवसापासूनच ठिणग्या पडण्यास सुरुवात झाली.
सासूबाई श्रीधरला स्वत:ची इस्टेट समजत होत्या, तर गौरीसाठी तो तिचा केवळ प्रियकरच नव्हे तर नवराही होता. श्रीधर हा माणूस नक्की कुणाच्या मालकीचा यावरून घरात प्रचंड गोंधळ सुरू झाला. सासू-सुनेच्या भांडणात त्याने तटस्थ राष्टÑाची भूमिका वठवल्यामुळे त्याच्या बायकोच्या जिवाचा आत्यंतिक संताप झाला. घराबाहेर पडून वेगळा संसार थाटावा यासाठी तिने श्रीधरच्या मागे लकडा लावला आणि तो दाद देत नाही हे बघून तिने अखेर आयुष्य संपविण्याचा अतिरेकी निर्णय घेतला. असे आम्ही कसे? आत्महत्या करण्याने समस्यांचं निराकरण होत असतं की त्याने इतरांच्या समस्या वाढत असतात? जुन्या जमान्यातील आपल्या अल्पशिक्षित सासवांनी उच्चशिक्षित असल्यासारखं वागलंच पाहिजे असा आग्रह घराघरातील सुना का धरतात? माझ्या मनासारखं सासूने वागलंच पाहिजे असं जर सुनेला वाटत असेल तर तेच सासूच्याही बाबतीत का मान्य होऊ नये? आपला मुलगा मोठा झाला आहे आणि त्याच्या पत्नीच्या सोबतीने त्याला एक वेगळं विश्व निर्माण करायचं आहे हे जसं प्रत्येक सासूला कळायला पाहिजे, तसंच साध्या वातावरणात वाढलेल्या आपल्या सासूकडून एका रात्रीत पंचतारांकित वर्तनाची अपेक्षा करणे योग्य नव्हे हे सुनेलाही कळणे आवश्यक आहे. समजूतदारपणाचा चष्मा लावून जर आपण जगलो तर आयुष्य खूप गुंतागुंतीचं नसतं. पण ‘मीच का माघार घ्यावी?’ या अट्टहासातून निर्माण झालेली वृत्ती मात्र घरातील वातावरण नासवून टाकते. अनेक घरांना घरघर लावणा-या या वृत्तीला आम्ही केव्हा निरोप देणार?