आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रुक्ष जगणे का जगावे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी जेथे जन्मले, वाढले, खेळले, बागडले तो धनगरवाडा म्हणजे मुसलमान, हिंदू, न्हावी, कोळी, तेली, तांबोळी, शेवटी भिलाटी अशा सर्व जातिधर्मांचे लोक एकत्र राहून एकमेकांच्या दु:ख-सुखात धावून येणारी वस्ती. भारतीय परंपरेचे, सर्वच धर्मांचे जातीचे सण सर्वांनीच मनापासून साजरे करावेत. दिवाळीचा फराळ मुसलमान बांधवांच्या घरी व ईदचा शिरखुर्मा, चौगे आणि डोल्याचा मलिदा, खिचडा हिंदूंच्या घरी प्रेमाने जात असे. लग्नसराईतसुद्धा संपूर्ण गल्लीला आवर्जून आमंत्रण असे व रक्ताच्या नात्यापेक्षा अधिक आपुलकीने प्रत्येक जण प्रत्येक घरी हजेरी लावे. ‘आधी त्या लग्नाघरचे पाहुणे जेवतील, गल्लीचे सगळ्यात शेवटी’ हा प्रत्येकाने समंजसपणे लावून घेतलेला नियमसुद्धा तेवढाच दूरदृष्टीचा दिसतो.


मुसलमानांच्या उरुस, ईद, रमजान अशा सणांनाही आम्ही सारे दर्ग्यावर जाऊन शिरणी वाटून, नमस्कार करीत असू. भिल लोकांचा होळीचा सण, नवरात्रीची घटस्थापना, त्यांचा देवीचा झेंडा गावभर, गल्लीभर फिरताना मिरवणुकीत लहान-मोठे सामील होत.


धनगरांचा चैत्र-माघ महिन्यातील घाटा, भगत घुमणे, डांख्या, पौर्णिमेची पावबादेवची यात्रा, कडई चढवणे आजही आठवते. कानबाईचे रोट, रात्रभर जात्यावर गाणी म्हणत रोटचे गहू दळणे, माणसांनी गाणे म्हणत घरोघर दळत मान देणे, कानबाईपुढे फुगड्या घालणे आठवले की मन फुगड्या घालायला लागते. प्रत्येक सणात प्रत्येकाने हिरीरीने भाग घेणे, श्रद्धेने पूजाअर्चा, उपवास, व्रत करणे मनाला आनंद देत असे. अक्षय्यतृतीयेची गौराई मांडणे, गौराईचे भुलाबाईचे गाणे-नाच, अक्षय्यतृतीयेला कुंभाराघरी शंकर घ्यायला जाणे, टिप-या वाजवत गाणी म्हणत येणे, झाडाला झोका बांधून आखाजीची गाणी म्हणणे, सारे सारे बालपणीचे डोळ्यापुढे उभे राहते व मनात कुठेतरी आजच्या रुक्ष जगण्याकडे पाहून खिन्न होते.
ते जगणे जगून फक्त 25-30 वर्षे झालीत. खूप शतके गेलीत असेही नाही. तो शेजार, ती गल्ली, त्यातील जिवाभावाची माणसे, शेजारधर्म, माणुसकी, आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, सहकार्य आणि एकमेकांचा वचक, धाक, नैतिक आदर, भीती, दरारा बाळगून संसार चालवणे आठवले की मन भरून येते.


माझ्या वयाच्या पंधराव्या सोळाव्या वर्षे वयापर्यंत मी अनुभवलेले पाहिलेलं हे जग. वीस, पंचवीस वर्षांत केवढा हा बदल? त्या वेळचे म्हातारे-म्हाता-या निसर्ग निसमाप्रमाणे धरणीमातेच्या कुशीत लीन झालीत. त्यांची मुले-बाळे कामानिमित्त इकडे-तिकडे निघून गेलीत. नवीन सुना नव्या गावच्या, नव्या विचारांच्या, नव्या भागातून, नवे स्वभाव, नव्या चालीरीती घेऊन आल्यात व त्यांच्यासोबत सारंच बदललं. क्वचितच काहींनी आपल्या घरचे रीतिरिवाज, आपुलकी, शेजारधर्म स्वीकारला. तर ब-याच जणींनी त्यांचे स्वत:चे नवे विचार, आचार, रीतिरिवाजांचे, ‘नवे घर’ वसवले.
त्या वेळचे त्या वस्तीतील, मातीची घरे, भिंतीला भिंती, मातीची धाबी, वरवंड्या लिंपणे, शेणाने घर सारवणे, शेणाचा सडा, सड्यावर संध्याकाळपर्यंत चिकटून बसणारी, येणा-याचे स्वागत करणारी रांगोळी, माती-दगडाचे हाताने श्रद्धेने बांधलेले वृंदावन, सदाबहरात असणारी तुळस, सांजवात आजही हृदयात तेवत आहे. रात्रीचे चूल पोतारणे, माठाजवळची रात्रभर तेवणारी पणती, चुलीभोवतीची आईने घातलेली रांगोळी...


एवढेच नव्हे, तर वाळवणीच्या दिवसात अंगणात मोठमोठ्या दगडांची चूल, त्यावर मोठे पितळी पातेले, त्यात आधण ठेवून दादरचे पापड, बाजरीचे तिखड बिबाडे, नागली-चिकणीचे पापड, गव्हाच्या वड्या, बाजरीच्या वड्या, गव्हाच्या चिकाच्या हिरव्या-पिवळ्या नारिंगी रंगांच्या कुरडया, पापड तळणासाठी हमखास होत असत. उडदाचे पीठ दगडावर कांडून कांडून केलेले पापड तोंडात टाकल्याबरोबर पाणी होत असे. सणासुदीचे पुरणपोळी, म्हशीच्या दुधाची खीर, पाटा-वरवंट्यावर वाटलेल्या मसाल्याची रश्शी-रस्सा, खापरावरची बारीक-पातळ पुरणपोळी (ते गुळाचे पुरण) व ताट सजवायला रंगीत कुरडया पापड अन् गरमगरम भजीची चव आताही रवरवते.


मराठा डाळीच्या रात्रभर जागून, डाळ घासून घासून रात्रीच्या तिस-या प्रहरी जात्यावर दळून तयार केलेल्या वड्या, ते पीठ, त्यांचे वडे, गावरान लसूण, मिरची, कोथिंबिरीची चव आजही तोंडाला भळभळा पाणी आणते.


श्राद्धपक्ष आला की, पितरांचं स्मरण होई. आठवणीने त्यांच्या आवडी-निवडी ध्यानी घेऊन पित्तर बसवत. त्यास त्या वस्तू आई देत असे. त्याबरोबर जिभेवरची चवीची आठवण मनी दाटते. श्रद्धेने, मनापासून, जीव ओतून केलेला पितरांसाठीचा प्रत्येक पदार्थ, कढी, राळ्याचा भात, राळा मिळवण्यासाठी तिचे आदल्या दिवशीचे धावपळ करणे, बेसनपिठाच्या पातोंड्या-पाटवड्या, ती चविष्ट खीर, उडदाच्या डाळीचे वडे, सर्व भाज्या एकत्र करून आलपालची भाजी, अहाहा...!
उन्हाळ्यात भाजी मिळाली नाही की, आईने करून दिलेला बोकडकाला. बाजरीची गरमगरम भाकरी, त्याचा काला मोडून त्यात कांदा बारीक कापून, लाल मिरची हाताने ताटात चुरायची, त्यात लसणाच्या पाकळ्याही चुरायच्या. त्यात मीठ, थोडे पाणी, शेंगदाण्याचे तेल घालून तो झुणका काल्यात मिसळायचा अन् मिटक्या मारीत खायचे, नक्कीच तृप्तीची ढेकर येणार.
भाजी नसल्यास आईला सुचलेला दुसरा पर्याय जिभेची चव पालटणारा, पुन:पुन्हा हवाहवासा वाटणारा पदार्थ म्हणजे ‘खूडमिरचीचे पाणी’ त्याला आपण झुणका म्हणतो. लाल गावरान मिरची खुडायची, गावरान लसणाच्या पाकळ्या, तेलात फोडणी घालून त्यात जिरे, मीठ टाकून पाणी उकळायचे, दुस-या बाजूला तव्यावर थोडे बेसनपीठ व बाजरीचे पीठ तेल घालून खरपूस भाजून त्या पाण्यात घट्टपणा येण्यासाठी टाकून, कढईच्या कडांना कड चिकटेपर्यंत उकळून बाजरीच्या भाकरीबरोबर तो रस्सा नाकातोंडात पाणी आणत भूकतृप्ती करीत असे.


संक्रांतीचे दाळ्या, शेंगादाणे, मुरमुरे, तिळीचे लाडू आणि दुस-या करीच्या दिवशी मठाच्या डाळीच्या पिठाचे गरम गरम धिरडे, गोड गुलगुले आणि गव्हाच्या पिठाचे गूळ घालून धिरडे त्या त्या सणाचे महत्त्व ऋतुमानानुसार शरीराला आवश्यक असा आहार प्रत्येक सणाला न चुकता खायला मिळत असे.
ती गल्ली, मातीच्या घरात कच्च्या भिंतीच्या आडोशाला राहणारी प्रत्येक कुटुंब पक्कं करण्याचा प्रयत्न करणारी, छोट्या घरात आयुष्य काढणारी मोठ्या हृदयाची माणसे हरवलीत कुठे? शेजा-याचे सुखदु:ख आपले मानून गरजेच्या वेळी धावपळ करणारी मानलेली नाती असूनही रक्ताच्या नात्यांपेक्षा जिवाभावाने वागणारी नाती, माणुसकी त्याच्यासोबतच धरणीमातेच्या कुशीत गाडली गेलीत का? बिघडलेल्याला दोन गोष्टी सांगून त्याला सुधारणे, संसाराला लावणे, उघड्याला झाकणे हे तत्त्व अंगीकारून दारिद्र्यातही माणुसकीची, शेजारधर्माची श्रीमंती जोपासत ‘जगा व जगू द्या’ शिकवणारी माणसे गेलीत कुठे?


आनुवंशिकतेने सारे काही पुढच्या पिढीत येते म्हणतात. मग शून्यातून विश्व निर्माण करणा-या, काडी-काडी जमवून संसार उभा करणा-या, माणुसकी हाच धर्म पाळणा-या मायबापाची आजची लेकरे फक्त ‘मी अन् माझे’ एवढेच का जाणतात? कुठे-काय उणं पडलंय? की स्वकेंद्री वृत्तीची पट्टी बांधून घेतलीय - डोळे मिटून दूध पिणा-या मांजरीसारखी?