का करतो आम्ही / का करतो आम्ही हळदी-कुंकू ?

संध्या पाटील

संध्या पाटील

Mar 01,2013 02:00:00 AM IST

आजच्या आधुनिक यंत्रयुगात संस्कृती, धर्म, रूढी, परंपरा कालबाह्य गोष्टी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. आज आपण जे सण साजरे करतो ते हौस म्हणून करतो की त्यामागील धार्मिक हेतू जाणून करतो याचा विचार करण्याची वेळ आली आहे. म्हणून माझ्या घरी दरवर्षीप्रमाणे संक्रांतीच्या हळदी-कुंकवाला मैत्रिणींना बोलावलं आणि त्यांचा यामागचा काय हेतू किंवा उद्देश जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकीला एक कागद देऊन त्यावर त्यांचा हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाबद्दलचा विचार, हेतू, काय हे लिहायला लावलं.

मानसी याडकीकरला असं वाटतं की केवळ धार्मिक रूढी जपायची म्हणून हे हळदी-कुंकू नाही तर त्या निमित्ताने आपल्यातील व्यवस्थापनकौशल्य, कलाकुसर दिसते. तसेच वैचारिक /बौद्धिक देवाणघेवाण होते म्हणून ती हा सण साजरा करते. तर अमिता मोदीला वाटतं की, या निमित्ताने महिला एकमेकींना भेटतात. उखाण्यातून स्त्रियांची कल्पकता, कविवृत्ती जागृत होते व हा आनंद एकमेकींबरोबर वाटला जातो. म्हणून तिला हळदी-कुंकू आवडते. स्वाती देवळाणकर म्हणते, हलवा बनवताना जसे तीळ आणि गूळ एकत्र होऊन जातात तसेच दोन स्त्रियांनी एकरूप होऊन नेहमी राहावे, हा संदेश या निमित्ताने दिला जातो. म्हणून ती हळदी-कुंकू करते. कल्पना जोशी खिस्तेला वाटतंय की, एका पिढीकडून दुस-या पिढीकडे संस्कृतीचा वारसा देण्यासाठी हळदी-कुंकू करावे. सुशीला लंके यांना मात्र आपल्या सौभाग्याचा मान म्हणून हा सण करावासा वाटतो. त्या म्हणतात, हा सौभाग्याचा सण, ज्या नव-याच्या कुंकवाच्या भरवशावर आपण मिरवतो त्याची जाणीव ठेवून त्या हा संस्कृतीचा ठेवा जपून हळदी-कुंकू करतात.
वनिता पत्की म्हणते, हा हळदी-कुंकवाचा वारसा आपण पुढे नेला नाही, तर कोण नेणार? समाजाचं आपण देणं लागतो. मग त्यातील संस्कृतीही आपण जपायलाच हवी आणि हळदी-कुंकू हे त्याचेच निमित्त आहे.

पूजा मुधलवाडकरला जुन्या-नव्या भेटीमुळे विचारांना उजाळा मिळतो म्हणून हळदी-कुंकू हवे वाटते. तर संगीता देवळाणकर यांना असे वाटते की ‘चूल आणि मूल’ यातून स्त्रियांनी बाजूला होऊन एकत्र यावे. आपल्या मनातील विचार मांडून प्रत्येक पाऊल प्रगतीचं कसं ठरतंय याचा विचार एकत्र आल्यामुळे होऊ शकतो.
अ‍ॅड. सेनानी यांनी एक नवा विचार या हळदी-कुंकवानिमित्ताने समोर ठेवला. त्यांचे म्हणणे असे की हा सवाष्णींचा सण असल्यामुळे विधवा वा सौभाग्यवती यात भेद होतो. तेव्हा अशा कार्यक्रमाला हळदी-कुंकू हे नाव न ठेवता ‘तिळगुळाचा कार्यक्रम’ असे ठेवावे म्हणजे स्त्रियांमधील भेदही कमी होतील.

मीनाक्षी निंभोरकर म्हणतात, या एकत्र येण्याने काही काळ तरी महिला रोजचा ताणतणाव विसरून उत्साहात बाहेर पडतात. पूनम आणि शीतल बेदमुथा या मारवाडी मैत्रिणींना मात्र या निमित्ताने वर्षभर गोड संबंध टिकवून ठेवण्यासाठी हे हळदी-कुंकू निमित्त योग्य वाटते. डॉ. शिल्पा निकम यांना हा सण आवडतो, कारण बायका वर्षातून एकदा तरी बाहेर मुक्तपणे आनंदाने एकमेकींकडे जातात. नव्या ओळखी होतात. मात्र हळदी-कुंकू हा कार्यक्रम अनेकजणी हौस म्हणून साजरा करतात. स्वाती लंके म्हणते, मी तर फक्त हौस म्हणून या हळदी-कुंकवाकडे बघते. या निमित्ताने सर्वांना घरी बोलावून मनसोक्त गप्पा करता येतात. मोबाइलच्या जगात प्रत्यक्ष भेटीचा आनंद म्हणून हिला हे हळदी-कुंकू आवडते. तर रागिणी पाडळकर यांना एकमेकींच्या सुखदु:खाची देवाणघेवाण करण्याची व एकत्र येण्याची संधी म्हणून हा कार्यक्रम हवासा वाटतो. प्रज्ञा याडकीकरला तर हा विचार कागदावर लिहिण्याची कल्पनाच इतकी अभिनव वाटली की, ती म्हणाली, बघा या हळदी-कुंकवामुळे कुठलीही गोष्ट फक्त रूढी म्हणून न करता त्याचा काहीतरी उद्देश हा असावाच, हे तिला या निमित्ताने कळले.

स्मिता पाडळकरला या निमित्ताने एकमेकींकडे जाणे होते हेच महत्त्वाचे वाटते. स्वागताच्या अनेक पद्धती इतरांकडे गेल्यामुळे कळतात, असे तिचे म्हणणे, तर संपदा लंके यांना वाटते, आपल्या संस्कृतीने देण्याचे सांगितले आहे. पण ते आपण विसरतो. या निमित्ताने वाणाच्या रूपात थोडी तरी संस्कृतीची जपणूक झाल्याचा आनंद त्यांना मिळतो. म्हणून त्या हळदी-कुंकू करतात. तर भारती चौबे म्हणाल्या, पूर्वजांनी प्रत्येक सणामागे काहीतरी उद्देश ठेवला. यातून भेटीगाठी होतात, प्रेमाची व विचारांची देवाणघेवाण, चालीरीतींना उजाळा मिळतो. इतरांच्या पाहून चार गोष्टी शिकायला मिळतात. म्हणून त्यांना हा हळदी-कुंकू कार्यक्रम आवडतो. जुने विचार जपण्यासाठी ‘करून टाकण्या’च्या शॉर्टकटला या मैत्रिणींजवळ थारा नाही, हेच यातून दिसून आले.

X
COMMENT