आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Why There Comes Crack Between Brother And Sister Relationship

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अश्‍वत्‍थाम्याची जखम!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नुकतीच राखी पौर्णिमा झाली. दोन-तीन दिवस लहानांपासून थोरापर्यंत बातम्या आणि फोटो पाहून मन प्रसन्न होत होते. बहीण-भावाचे अतूट निर्व्याज प्रेम, त्यांचे भावविश्व, त्यांचा एकमेकांकडे असणारा ओढा. सारंच कसं आपल्या भारतीय संस्कृतीबद्दल अभिमानाने ऊर भरून यावा असं भव्य नि उदात्त! त्यातून टीव्ही चॅनेल दाखवत असलेले ‘ये राखी का रिश्ता, राखी का बंधन’ आणखीनच भर घालीत होते. अचानक मैत्रिणीचा फोन आला, ‘तुझ्याकडे येते आहे. खूप बोलायचंय.’ एकदम काय विषय असेल बरं बोलण्यासारखा तातडीचा? या विचारात असतानाच कोमजलेल्या चेह-याने ती आली.
‘का गं, कशी झाली राखी पौर्णिमा?’ मी तिला विचारले. आजपर्यंत घरच्या अतिशय खासगी गोष्टी आम्ही फारशा बोललोच नव्हतो. मैत्रिणीच्या डोळ्यात पाणी! भावाने जवळपास संबंध तोडून टाकल्याचे सांगितल्याचे ऐकून मी चाटच पडले. कारण सांगितल्यावर मन सुन्न झाले. झालं असं की, भावाला व्यवसायाला भांडवल हवे म्हणून वडिलांना मध्यस्थ घालून भावाने तिच्या नव-याकडून परत देण्याच्या बोलीवर दीड-दोन लाख रुपये घेतले. नवरा चांगला मोठ्या पोस्टवर काम करणारा, त्यानेही कोणतेही आढेवेढे न घेता पैसे दिले. या घटनेला 4-5 वर्षे होऊन गेली. दरम्यान, मैत्रिणीची मुले स्वत:च्या हुशारीवर शिकली. नोकरीला लागली; पण भाऊ पैसे द्यायचे नावच घेईना! तिने आठवण दिली ती कडक शब्दांतच! तर त्यावर, तुला काय कमी आहे? मी काय पळून जातोय, म्हणत त्याने वाटाण्याच्या अक्षता लावल्या. घरात सासू-नणंदांना हे ठाऊक; पण तिलाच अपराध्यासारखे वाटू लागले. आणि या वेळेस तर भावाने संबंध ठेवायची इच्छा नाही, असेच सांगितले. सख्खा भाऊच वैरी झाला, राखी बांधायची कशाला?
सीमाच्या बाबतीत असाच पैशामुळेच नाते दुरावल्याचा अनुभव आला. मावसबहिणीच्या नव-याकडून कुणालाही न सांगता तिच्या लहान भावाने पैसे घेतले. 1-2 महिन्यांनंतरही पैसे मिळत नाहीत, हे पाहून तिने हे सर्व सीमाच्या कानावर घातले. सीमाने ‘जावयांना फसवतोस, फोन घेत नाही’ म्हणून भावाला चांगलेच फैलावर घेतला. कारण त्याला कसलेच अपराधीपण वाटत नव्हते. झाले मात्र उलटेच! भावाने तिचा ससेमिरा नको म्हणून नाते तोडले तिच्याशी! राखी पौर्णिमेला दिवसभर सीमा अस्वस्थ होती.
नीरज लहानपणापासून गीताकडून राखी बांधून घ्यायचा. शेजारी राहणा-या गीताचे लग्न झाले आणि मानलेला भाऊ म्हणून सांगितल्यावर सासरच्या लोकांच्या कपाळावरच्या आठ्या! त्या पाहून पुढच्या वर्षीपासून राखीला तिच्याकडे जायचे नाही म्हणून उदास झाला होता नीरज! कल्पनाची राखी पौर्णिमा फार उदासवाणी गेली. मानलेल्या भावाशी त्याच्या वागण्यावरून ती त्याला नको इतके टाकून बोलली. तिला याचा विसर पडला की आजकाल सख्ख्या भावांना चुका दाखवलेल्या चालत नाहीत तर हा ‘मँुहबोला’ भाई कसा त्याहून वेगळा असेल? सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या भावाच्या बायकोला ना त्याने काही सांगितले ना बायकोने तिला फोन करून कारण विचारले. ‘आपण एवढा जीव लावला त्याचा काहीच विचार मनात शिवला नाही का याच्या? शब्द हे शस्त्र आहे हे कबूल; पण ते का वापरले गेले याचा विचार करायला हवा होता त्याने,’ असे म्हणत कल्पनाचे मन उसासत होते. आणि अचानक तिला तिच्या भावाने आणखी ‘दोन बहिणी जोडल्यात’ असे समजले अन् माहेरपासून दूर असलेल्या कल्पनाला ‘त्या’ नात्यातला फोलपणा जाणवला. राखी पौर्णिमेला सगळ्या भावांना सद्बुद्धी दे म्हणत तिने देवाला हात जोडले.
राजनच्या बहिणीने वयाची साठी ओलांडलेली! ती थोडीशी आधुनिक विचारांची! आता इतके वय झाल्यावर ‘राखी’ बांधण्याच्या जुन्या परंपरा संपवून देणे-घेणे पण थांबवायला हवे म्हणून तिने राजनला यापुढे मी राखी बांधणार नाही तुला, म्हणून सांगितले. आजच्या काळात तो विचार बरोबरही असेल; पण राजन मात्र दुखावला जातोय. नाही बांधली राखी तर प्रेम थोडेच कमी होणार आहे, असे म्हणून तो बहिणीची बाजू घेतो; पण मनातून मात्र हळवा होतोय.
सुप्रियाला तर राखी पौर्णिमेला माहेरी इच्छा असूनही जाता येत नाही. कारण तिच्या बहिणीच्या यजमानांनी तिच्याशी धरलेला अबोला आणि राग! बहिणींचे नाते जणू संपुष्टातच आलेले! मग त्याच गावात असलेल्या भावाकडे ती पण येणार आणि आपणही जाणार! नकोच त्या कटू वादविवादाचे चक्र म्हणून सुप्रिया आई-वडील नसलेल्या त्या माहेरी जायला टाळते. दोघी बहिणींमधील गैरसमज, दुरावा भाऊ आणि वहिनी का काढत नाही, या विचाराने ती सततच अस्वस्थ होते.
मकरंदला बहिणीने आई-वडिलांच्या पश्चात इस्टेटीतील काहीच दिले नाही म्हणून राखी बांधणे बंद केले. इस्टेट म्हणजे फक्त तीन खोल्यांचा फ्लॅट, पण त्यावरही बहिणीच्या आशा लागलेल्या! स्वत: सधन असूनही! मायाच्या बाबतीत तर अगदी वेगळीच त-हा! दोन भावांच्या पाठची बहीण ती. आई-वडिलांनी लाडात वाढवली. घरची परिस्थिती अगदी जेमतेम आणि मायाचे लग्नही सामान्य घरात झालेले! पण मायाचे यजमान तीक्ष्ण बुद्धीचे! कर्तृत्वावर खुश होऊन लक्ष्मी पाणी भरू लागली. दोन्ही भावजयांना तिची श्रीमंती रुबाब वाटू लागला अन् एक दिवस कारण नसताना संबंध तोडले ते कायमचेच! तिच्या मुलांच्या लग्नात गावमामा पाठीमागे उभा राहिला.
अनघा चांगली प्रथितयश डॉक्टर! लहानपणापासून बुद्धिमान! वडिलांचा सर्वात जास्त तिच्यावर हुशार म्हणून जीव! द्वेषाची विषवेल तेव्हाच तिच्या भावाच्या मनात रुजली अन् मोठेपणी वृक्षात रूपांतर झाले. तुझ्यामुळे आमच्या शिक्षणाकडे बाबांनी दुर्लक्ष केले. तुझ्यामुळेच आम्ही शिकलो नाही, तुझ्यामुळे न्यूनगंड निर्माण झाला म्हणून तुझ्याशी नातेच नको म्हणून भावाने संबंध तोडले.
सारे पाहून मन उदास झाले. राखीच्या ठसठसणा-या अशा आठवणी किती तरी रूपांनी डोळ्यांसमोर येत आहेत. मनात प्रश्न येतो की कुठे गेले ते जिवापाड प्रेम करणारे बालपण? कुठे गेले ते चिमणीच्या दातांनी एकमेकांना वाटून देत खाणे? कुठे गेले ते बहिणींचे विश्वासाचे नाते? कोठून आला हा अहंकार? कोठून आला हा पैशाने नात्यातला पीळ? कोठून आला हा बहीण-भावांच्या नात्यात फोलपणा?
कोणालाच उकल होत नाही. राखी पौर्णिमा झाली की दिवाळीतली भाऊबीज येते नि पुन्हा एकदा जखम भळभळ वाहू लागते. काही दिवसांनी त्यावर खपली धरते अन् पुन्हा एकदा राखी पौर्णिमा! अश्वत्थाम्याच्या जखमेसारखी ही जखमदेखील भळभळ वाहतच राहते अखंडपणे!