आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा अट्टास कशासाठी?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सासूबाई - रूपा, पुढचा महिना श्रावण महिना आहे, तेव्हा तू सोमवारचे उपवास सुरू कर. आपल्या घराण्याची परंपरा आहे, सुनेने सासरी आल्यावर पहिले व्रत सोमवारचे सुरू करावे.
रूपा - पण आई, माझी पित्तप्रकृती असल्यामुळे मला उपवास सहन होत नाही. मी माहेरी असतानाही कधीच उपवास केले नाहीत.
सासूबाई - असे कसे चालेल? सासुरवाशिणीने सोमवारचे व्रत केलेच पाहिजे.
अनेक घरांतून घडणारा हा संवाद. उपवासाचा हा अट्टहास कशासाठी? ज्या वयात ‘उपवासाचा’ खराखुरा अर्थही कळत नाही त्या वयात कशासाठी ही बळजबरी? परमेश्वराच्या जास्तीत जास्त जवळ राहणे म्हणजे उपवास. नवी नवरी परमेश्वराच्या जास्त जवळ राहील की नव-याच्या? शिवाय उपवास फक्त सुनेनेच का करावे? मुलाने का नको? दोघे जण फिरायला गेले. त्याने काहीतरी चटपटीत खाण्याचा आग्रह केला. तिचा उपवास आहे, खाता येणार नाही म्हटल्यावर तो भडकला. अशा वेळी त्याची समजूत घालायला काय सासूबाई येणार का? त्या दिवशी भगर खाऊ नये, असे कोणत्या ग्रंथात लिहून ठेवले आहे, अद्याप मला तरी कळलेले नाही. पण ते पूर्वापारपासून मनावर इतके बिंबवले गेले आहे की, कोणी न सांगताही सासुरवाशिणीला ते माहीत असलेच पाहिजे असे गृहीत धरले जाते.
40-50 वर्षांपूर्वीचा काळ असा होता की, सासुरवाशिणीला घरातून बाहेर पडता यायचे नाही. सोमवारचे व्रत आहे, म्हणून त्या निमित्ताने संध्याकाळी देवळात जाण्याची मुभा मिळायची. याशिवाय धान्यात कस होता, हायब्रीड प्रकार अस्तित्वात नव्हता. त्यामुळे वारंवार भूक लागायची नाही. शिवाय आजच्यासारखा मानसिक ताण मोठ्या प्रमाणावर नव्हता.
आज हे चित्र पूर्णत: बदलले आहे. आजची स्त्री फक्त संसार करत नाही, तर करिअरसुद्धा करते. या दोन्हींचा मेळ साधताना तिची शारीरिक व मानसिक शक्ती पणाला लागते. अशा वेळी तिच्यावर उपवासाचे ओझे का लादावे? तिला दिवस जातात, तेव्हा तिच्यावर गर्भातील बाळाच्या पोषणाचीही जबाबदारी पडते. अशा वेळी तर तिला जास्तीत जास्त पौष्टिक अन् 4/4 तासांनी खाण्याची गरज असते. मग सासवांनी कशासाठी तिच्यावर सोमवार, एकादशी, पौर्णिमा किंवा अजून काही पारंपरिक व्रताची बळजबरी करावी? त्यापेक्षा मुलं मोठी झाल्यानंतर तिची स्वत:ची इच्छा असेल, तिची शरीरप्रकृती साथ देत असेल, तर तिने जरूर उपवास धरावे.
उपवास म्हणजे परमेश्वराच्या जास्तीत जास्त सहवासात राहणे, हा एवढा व्यापक अर्थ छोट्या वयात कधीच पेलता येत नाही. त्यापेक्षा आठवड्यातून एक दिवस पोटाला विश्रांती द्यावी, खाण्यावर बंधन यावे या दृष्टिकोनाला प्राधान्य देऊन जमत असेल तर जरूर उपवास करावा. एकादशी-दुप्पट खाशी असे होऊ देऊ नये. मुळात साबुदाणा, शेंगदाणा हे पचायला जड असलेले पदार्थच त्या दिवशी खाल्ले जातात. साबुदाणा लवकर पचत नाही. त्या मानाने भगर लवकर पचते. हा शास्त्रीय दृष्टिकोन सर्वांनीच लक्षात ठेवावा.
साधारणत: तिशीच्या आसपास मुलं थोडी मोठी होतात. थोडीशी स्थिरता आलेली असते. उपवास करण्याइतपत मन परिपक्व असते. अशा वेळी उपवास करायला हरकत नाही. वयाच्या चाळिशीपर्यंत साधारणत: उपवास करावे. चाळिशीनंतर शरीर थोडेथोडे कुरकुर करायला लागते. मेनोपॉजचा पीरियड जवळ येऊ लागतो. नकळत त्याचा कामावर परिणाम होतो. पूर्वीइतका कामाचा उरक राहिलेला नसतो. त्यामुळे चिडचीड होऊ लागते. म्हणून चाळिशीनंतर शरीर साथ देत असेल तरच उपवास करावे.
काही स्त्रिया वजन कमी करावे म्हणून उपवास धरतात अन् मग जेवताना समोरची म्हणते, ‘अगं तुला उपवास आहे, नीट जेव.’ मग रात्री जेवायचे नाही म्हणून सकाळीच जास्त जेवण घेतले जाते. त्याचा परिणाम सुस्ती येते अन् वामकुक्षीऐवजी छान 2/3 तास झोप काढली जाते. याचा परिणाम वजन कमी तर होतच नाही, वाढते मात्र निश्चित. काही स्त्रिया म्हणतात, आम्ही रात्रीच उपवास सोडतो, नाहीतर आम्हाला झोप येत नाही. दिवसभर काहीच न खाल्ल्यामुळे रात्री खूप भूक लागते. मग जेवल्यानंतर शतपावलीही घालण्याचे त्राण उरत नाही. लगेच झोप येऊ लागते. एकंदरीत हाही प्रकार धोकादायकच ठरतो.
आरोग्याच्या दृष्टिकोनातून उपवास करायचा असेल तर जरूर करावा. उत्तम आरोग्यासाठी मिश्र आहाराप्रमाणेच मधूनमधून लंघन करणे किंवा फलाहार घेणे फारच उपयुक्त असते. आपल्या पचनसंस्थेचे कार्य असे खाल्लेले अन्न पचन करणे, शोषण करणे आहे तसेच मलनिस्सारण किंवा उत्सर्जन करणे हेही आहे. जेव्हा लंघन केले जाते तेव्हा आतडीला उत्सर्जन क्रिया करण्यास अधिक वेळ मिळतो. योगशास्त्रात तसेच आयुर्वेदात ‘नाडी शुद्धीला’ फार महत्त्व आहे. उत्कृष्ट मलविसर्जन हे नाडीशुद्धीसाठी आवश्यक आहे. मधूनमधून एक वेळ जेवणे, लंघन किंवा फक्त फलाहार घेणे हे आरोग्याच्या दृष्टीने फारच चांगले आहे. परंतु हे सर्व करताना आपले वय व शरीरप्रकृती या सर्वांचा विचार करायलाच हवा. कोणताही अट्टहास नसावा.