आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वव्यापी योगदान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांधकामात प्रावीण्य मिळवलेले तेलुगु व्यावसायिक, ज्यांची नोंद प्रथम होते ते म्हणजे उकाजी लिंगू अलकोडे (1862). त्यांच्यानंतर रावसाहेब नागू सयाजी यांची आद्य तेलुगु व्यावसायिक म्हणून नोंद होते. उकाजी लिंगू अलकोडे या तेलुगु बांधकाम व्यावसायिकाने मुंबईतील सेक्रेटरिएट बिल्डिंग, राजाबाई टॉवर, मुंबई हायकोर्ट आदी विख्यात इमारती अवघ्या दहा वर्षांत बांधल्या. रावबहादूर यल्लप्पा बाळाराम (1850) व्यंकू बाळू कालेवार (1820) यांनी आपल्या सहका-याच्या मदतीने बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांची सुप्रसिद्ध इमारत ‘लक्ष्मीनिवास’ बांधली. यांनीच मुंबई बोरीबंदर स्टेशनसमोरील मुंबई महापालिकेची मुख्य इमारत बांधली. रामय्या नरसय्या अय्यावारू (1826) यांनी अनेक कापड गिरण्यांचे बांधकाम केले. सोलापूरची जुनी मिल यांनीच बांधली. जाया काराडी लिंगू (1835) यांनी मुंबईतील डेव्हिड ससून बिल्डिंग, रॉयल बॉम्बे यॉट क्लब, टाटा मॅन्शन, हॉटेल वॉटसन अनेक्स अशा अनेक इमारती बांधल्या. नरसिंग सायबू वडनात (1847), याचप्रमाणे राजू बाबाजी लामगे, विठ्ठल सायणा, दिवाणबहादर नारायण सायणा, रावसाहेब मानाजी राजूजी कालेवार, शेट गंगाराम सायबू पुली, नरसूयल्लप्पा गुंटुक, सयाजी नागूजी, नाना राजू बाबाजी, नारायण राजण्णा पेंटा यांनी वरळी येथील सुप्रसिद्ध बी.डी.डी. चाळींचे बांधकाम केले.

लिंगया सायण्णा जाया यांनी मुंबईतील प्रसिद्ध माधवाश्रम ही इमारत बांधली. एवढेच नव्हे, कुर्ला येथील पहाडावर क्षयरोग्यांसाठी स्वतंत्र असे रुग्णालय बांधले. राजण्णा लक्ष्मण जिलकर, शंकर राजण्णा जिलकर, शंकर संभाजी गांगल अशा अनेक बिल्डिंग कंत्राटदारांनी मुंबईतल्या इमारती, दवाखाने, रस्ते, पूल बांधून आपल्या कष्टाने आणि कौशल्याने मुंबईचा सारा चेहरामोहरा बदलून टाकला.


मुंबईच्या कापड गिरण्यांच्या पाठोपाठ तेलुगु मंडळींनी आणखी एक मोठा पराक्रम सोलापूर मुक्कामी केला. सोलापूर येथील तेलुगु मंडळींनी प्रत्येक घराघरात हातमाग किंवा यंत्रमाग व्यवसाय रुजवून टाकला. जगप्रसिद्ध जेकॉर्ड चादरी या सोलापूरच्या तेलुगु मंडळींचीच निर्मिती. यापोटी भारत सरकारला अमाप परकीय चलन मिळाले. सोलापूर हे महाराष्ट्राचे मँचेस्टर झाले, महाराष्ट्रातील चौथे औद्योगिक शहर ठरले!


एकदा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नामदार यशवंतराव चव्हाण हे सोलापूरला आले होते. त्यांचे एक व्याख्यान पार्क मैदानावर झाले होते. त्या भाषणात ते म्हणाले, ‘मुंबईचे कोळी, सोलापूरचे साळी आणि बारामतीचे माळी, या लोकांनी आपल्या महाराष्ट्राचे नाव सा-या जगभर नेले आहे. मासेमारीच्या निमित्ताने मुंबईचे कोळी, जगप्रसिद्ध चादरींच्या निर्मितीने सोलापूरचे साळी आणि गुलाब फुलवून आखाती देशापर्यंत पोहोचवणारे बारामतीचे माळी हे सारे महाराष्ट्राचे नाव बुलंद करणारे शिल्पकार आहेत. यामुळे महाराष्ट्र कधीही या तीन कष्टकरी समाजाला विसरणार नाही.’ संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आंध्रच्या निर्मितीनंतर, विशेषत: 1955च्या अखेरीपासून झंझावाती वेगाने फोफावत गेली आणि 1960मध्ये विजयी झाली. शंकरराव पुप्पाला या तेलुगु नगरसेवकाने ही खिंड लढवली. 10 डिसेंबर 1955 रोजी मुंबई महापालिकेने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव पास केल्याने सर्वत्र उत्साहाचे वारे संचारले. मुंबई काँग्रेसचा धिक्कार करणारा ठराव पुणे महापालिकेने केला. 27 डिसेंबर 1955 रोजी या चळवळीला समर्थन देण्यासाठी त्या वेळचे दारूबंदी खात्याचे उपमंत्री डॉ. टी. आर. नरवणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

स्वत: मुंबईचे महापौर नरसिंगराव पुप्पाला यांनीदेखील संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी राजीनामा दिला. या तेलुगु महापौराच्या राजीनाम्याने मुख्यमंत्री मोरारजी देसार्इंसह पंडित नेहरूही गडबडले. संयुक्त महाराष्ट्रासाठी परशुराम पुप्पाला यांनी सात महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगली. तुरुंगातच त्यांना अल्सरचा विकार जडला. त्यांना वयाच्या 48व्या वर्षी दिनांक 4 जून 1969रोजी मृत्यू आला. त्यांनी मृत्यूपूर्वी 1 मे 1960 रोजी ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र’ निर्माण होताना पाहिले. या संदर्भात, त्या वेळचे मंत्री नामदार डॉ. टी. आर. नरवणे यांनी 4 जून 1969रोजी लिहिलेले एक पत्र तेलुगु लोकांच्या महाराष्ट्र निर्मितीतले योगदान कळण्यासाठी पुरेसे आहे. या पत्रात नरवणे यांनी म्हटले होते, ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये महापालिकेत मंजूर झालेला ठराव मूलगामी महत्त्वाचा मानला तर इतरांविषयी आदर बाळगूनही मी असे म्हणेन की, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे सारे श्रेय परशुराम पुप्पालांचे होते आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेनेच नव्हे, तर महाराष्ट्र शासनानेही या तेलुगु नेत्याला कधी विसरता कामा नये.’ तेलुगु लोकांनी महाराष्ट्रामध्ये दिलेल्या योगदानाचे समर्पक वर्णन या पत्रातून पुरेसे अधोरेखित होते.