आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथन एका संघर्षाचं : विंग्ज ऑफ फायर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे माजी राष्ट्रपती आणि प्रसिद्ध वैज्ञानिक, भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान लाभलेले डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं ‘विंग्ज ऑफ फायर’ हे आत्मचरित्र म्हणजे त्यांचे व्यक्तिगत जीवन, त्यातले संघर्ष आणि व्यावसायिक जीवनातले संघर्ष यांचे कथन आहे.
तामिळनाडूमधील रामेश्वरम या छोट्या धर्मक्षेत्री एका अशिक्षित नावाड्याच्या पोटी 1931मध्ये जन्मलेला हा मुलगा प्रसिद्ध शास्त्रज्ञ, राष्ट्रपती होईल आणि देशातील ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवेल असं कधी वाटलंही नव्हतं. पण ध्यास, शोधकवृत्ती यांच्या बळावर त्यांनी यश संपादन केलं. त्यांची ही कहाणी मोठी प्रेरणादायी आहे. सहज-सोप्या व ओघवत्या शैलीत लिहिल्यामुळे हे पुस्तक हातातून खाली ठेवावंसं वाटतं नाही. हे आत्मचरित्र स्वत: कलाम यांनी लिहिलं असून त्यांना अरुण तिवारी यांनी साहाय्य केलं आहे.
या आत्मचरित्रात त्यांनी एका बाजूने आपल्या आयुष्यातील व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्ष चितारले आहेत, तर दुसºया बाजूला अग्नी, आकाश, पृथ्वी, त्रिशूल, नाग या घरोघरी पोहोचलेल्या नावांच्या क्षेपणास्त्रांची जडणघडण कशी झाली हे रोचकपणे सांगितले आहे. त्यामुळे हे पुस्तक कलाम यांचे आत्मचरित्र आहेच, शिवाय यात भारताच्या तंत्रज्ञानविषयक प्रगतीचा आढावाही आहे. जागतिक शस्त्रस्पर्धेच्या राजकारणाची आणि विज्ञानाची ती कहाणी आहे; तसेच स्वयंपूर्ण होण्यासाठी आपल्या देशाने केलेल्या संघर्षाचे ते मनोहारी खंडकाव्यही आहे.
कलामांच्या लहानपणापासून सुरुवात होऊन हे पुस्तक आठ विभागांमध्ये विभागण्यात आलं आहे. त्यातला पहिल्या भागाची सुरुवातच अथर्ववेदामधल्या एका श्लोकाचा अर्थ सांगून होते. ‘पृथ्वी त्याची आहे आणि अमर्यादित आकाशही त्याचे आहे. सगळे महासागर त्याचेच असले तरी तो साध्या तळ्यामध्येदेखील निवास करतो.’
या पहिल्या भागात त्यांचे लहानपण ते वयाच्या 32 वर्षांपर्यंतचे अनुभव कथन केले आहेत. त्यांच्या आजूबाजूला असलेल्या हिंदू संस्कृतीचा, साधूंचा त्यांच्या बालमनावर प्रभाव पडल्याचं ते सांगतात. त्यांचा जन्म टिपिकल मध्यमवर्गीय तामिळ घरात झाला. त्यानंतर त्यांचे शिक्षण, कॉलेजचे शिक्षण असा प्रवास यात घडतो. त्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूटमधून एरोनॉटिक्समधून डिग्री घेतली आणि नंतर ते अमेरिकेत ‘नासा’ या अग्रगण्य संस्थेकडे काम करण्यासाठी गेले.
क्रिएशन या प्रकरणामध्ये त्यांनी केलेल्या कामांचा आणि संशोधनांचा आढावा घेण्यात आला आहे. यातला एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. ‘नासा’मध्ये काम करताना तिथे एका लढाईचे पेंटिंग लावलेले होते. ते जेव्हा कलाम यांनी जवळून पाहिले तेव्हा त्यांना कळले की ते टिपू सुलतान आणि ब्रिटिश यांच्या लढाईचे चित्र आहे. हे पाहून कलाम यांना फार आनंद झाला. याच काळात कलाम यांना त्यांच्या कामाबद्दल प्रसिद्धी मिळाली आणि त्यांची दखलही घेतली गेली. त्यानंतरच्या प्रकरणामध्ये त्यांचा ‘मिसाइल मॅन’ होण्याकडे झालेला प्रवास सांगितला आहे. त्यात त्यांचे नेतृत्वगुण, हुशारी दिसते. गाइडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्रामला आकार देण्यासाठी त्यांनी केलेले अथक परिश्रम यामध्ये दिसून येतात.
आजवर या पुस्तकाचे मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ, तेलुगू, मल्याळम अशा तेरा भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. याशिवाय चायनीज आणि फ्रेंच भाषेमध्येही भाषांतरे झाली आहेत. मराठीत माधुरी शानभाग यांनी त्याचा अनुवाद केला असून राजहंस प्रकाशनाने तो प्रकाशित केला आहे.
प्रकाशन- युनिव्हर्सिटी प्रेस