आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • With Written Documetation There Should Be Consider Mouth Tradition

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लिखित साहित्याबरोबर मौखिक परंपरा, प्राचीन बोलींचाही विचार व्हावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

०मराठी मध्ययुगीन भाषेचा खजिनाच मुळात अभिजात दर्जाचा :
मराठी भाषेसंदर्भात विचार करताना तिच्या लिखित साहित्याबरोबर मौखिक परंपरेचाही विचार केला पाहिजे. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, भागवत, दासबोध, तुकारामांची अभंगवाणी, शहिरांची वीरश्री व शृंगारिकताही लक्षात घ्यायला हवी. संत, पंत आणि तंतच्या माध्यमातून मध्ययुगीन भाषेचा खजिना हा मुळातच अभिजात दर्जाचा आहे; परंतु त्यापूर्वी हजार वर्षे बोलीरूपाने मौखिक लोकवाङ्मय लोककथा,
गीते व जात्याच्या ओव्यांतून खळखळत आले आहे. भाषेची अभिजातता आधी बोलण्यातून व नंतर लेखनातून अशा दोन्ही पातळींवर ओळखली जाते.


०वाङ्मयाचा प्रवास काळाने मोजता येत नाही :
प्राचीन ओव्यांपासून ते आधुनिक मुक्तछंदांपर्यंत आणि लीळाचरित्रापासून ते आधुनिक नवकथेपर्यंत झालेला वाङ्मयाचा प्रवास केवळ काळाने मोजता येत नाही, तर त्याच्या अभिजात भाषेतून तो शोधावा लागतो. केवळ संस्कृती हीच अभिजात आणि तिच्या बोली या प्राकृत व अपभ्रंश भाषा आहेत, हे म्हणणे आता कालबाह्य ठरले आहे. कारण जागतिक संशोधनाने संस्कृतही बोलीभाषाच होती, असे ठरवले आहे. म्हणून लोकबोली, आदिम बोली आणि नागर बोली (भारतीय भाषा) असा भाषेच्या प्रगतीचा आलेख आहे. त्यामुळे मराठी भाषा प्राचीनतेच्या बोलीमुळे सुमारे अडीच हजार वर्षे जुनी असल्याचे जाणवते; परंतु आधुनिक काळात उच्चवर्गीय वर्चस्ववादामुळे साहित्य समीक्षा आणि भाषेच्या शिक्षणात आपण मराठी भाषेचे खूप नुकसान केले आहे. म्हणून मराठीचा अभिजात दर्जा ठरवताना पूर्वग्रहदूषित भाषेची शुद्धता, वाङ्मयातील प्रतिभेची मक्तेदारी हा उच्चवर्गीयांचा गैरसमज आधी गळून पडला पाहिजे. कारण कोणतीही भाषा मुळात अभिजातच असते. तिला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी उच्चवर्गीयांचे मापदंड लावता येत नाही, तर सामाजिक व सांस्कृतिक इतिहास, लोकपरंपरा, लोकसंस्कृती यांच्या सिंधू संस्कृतीच्या काळातील भाषिक परंपरेचा मागोवा घ्यावा लागतो. म्हणून भाषेची अभिजातता हे तिच्या केवळ लिखित वाङ्मयाने ठरवता येत नाही, तर मौखिक परंपरा व बोलीचा प्राचीन इतिहास असा मागोवा घ्यावा लागतो. तसेच लोकसाहित्याचाही आदर करावा लागतो.


शब्दांकन : सुनील बडगुजर, जळगाव