आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रश्‍नांच्या गर्तेत स्त्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काहीही झाले तरी स्त्रीला रोजच्या व्यावहारिक अगर घराबाहेरच्या जीवनात अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. जे प्रश्न तिला तिच्या अधिकारात सोडवता येतात ते ती अनेकदा यशस्वीपणे सोडवते किंवा कधीतरी घरातल्या जिव्हाळ्याच्या माणसांच्या आपुलकीच्या मदतीने तिला मार्गदर्शन मिळते आणि प्रश्न सुटल्याचे तिला समाधान मिळते. हीच स्त्री जेव्हा घराबाहेरच्या जगात मोठ्या कौशल्याने किंवा उत्साहाने वावरत असते तेव्हा काही प्रश्नांच्या गर्तेत तिला स्वत:लाच उत्तर माहीत असले तरी ते उत्तर देणे तिला प्रशस्त वाटत नाही. त्याच वेळी तिच्यावर दडपण येते की, आपण निरुत्तर राहिलो तर आपल्याबद्दल गैरसमज होतील. कारण असे प्रश्न विचारणा-यांचा तिच्या आसपास नेहमीच वावर असतो.


आता नलिनीचंच उदाहरण घ्या. चांगली पोस्ट ग्रॅज्युएट झालेली, पुढे काही अकाउंटन्सीच्या परीक्षा देऊन झाल्यावर नोकरी मनाजोगती मिळेपर्यंत ती सत्तावीस-अठ्ठावीस वर्षांची झाली. सुदैवाने तिला बँकेत नोकरी मिळाली. नलिनी आपल्या नोकरीच्या ठिकाणी बँकेत मोठ्या आनंदाने हजर झाली. तिच्या शेजारी बसलेल्या दोघीतिघींनी तिचं अभिनंदन केलं, तिला मधल्या सुट्टीत आपल्याबरोबर डबा खाण्यास बोलावलं. दोन-तीन दिवस झाल्यावर तिच्या शेजारची बाई म्हणाली, ‘शिक्षण करता करता तुमचं वय वाढलं, मग आता लग्न कधी करणार?’ नलिनी मनातून फार नाराज झाली. आपल्या घरच्या असहायतेचा ती कुठे पाढा वाचत बसणार? नलिनी गप्प झाली.
सुरेखा संध्याकाळी भाजी आणायला गेली की रोज तिला दोन घरं पुढे राहणारी सविता भेटायची. सविता एक छोटीशी नोकरी करत होती. बोलता बोलता ती सुरेखाला म्हणाली, ‘मग दिवसभर काय करता तुम्ही?’ ‘तसं घरकाम पुरतंच नं हो!’ ‘म्हणजे या हल्लीच्या काळातही तुम्ही फक्त घरच सांभाळता?’ घरात सुरेखाच्या रूपाचं कौतुक होतं, घर नेटकं ठेवायचं कौतुक होतं, सासरची माणसंही जिव्हाळ्याची वाटत होती तरीही आपण केवळ घरच सांभाळणा-या आहोत ही बोचरी जाणीव तिला आता कुरतडू लागली.


सगळ्यात कठीण प्रश्न आमच्या निर्मलाला विचारला गेला. तिच्याकडे तिच्या मावससासूबाई राहायला आल्या. निर्मलाच्या सासूबाई पूर्वीच वारल्या होत्या. त्यामुळे आपली जबाबदारीची नोकरी संभाळून तिने त्यांची छान सोय ठेवली. एक दिवस सिनेमा, एक दिवस जवळच्या ठिकाणी फिरायला जाणं, तर कधी मॉलला भेट, असा पाहुणचार चालला होता. आनंदाने चार दिवस झाल्यावर त्या म्हणाल्या, ‘अगं, या मोठ्या नोकरीत तुला चांगला पगार असेल नं? किती मिळतो तुला पगार?’ निर्मलाला सासूबार्इंचा प्रश्न रुचला नाही.


लग्न होऊन वर्ष होत नाही तोच शीलाला तिच्या मैत्रिणी म्हणाल्या, ‘अगं, काही आगामी आकर्षण? काही ‘गुड न्यूज’ आहे का?’ नोकरी आणि रजा याचा हिशोब डोक्यात घेता, शीलाला तीन वर्षं तरी बाळाचा विचार करता येणारच नव्हता. शीला नुसती हसली.


‘हल्ली तू सारखी विचारात हरवलेली वाटतेस. ऑफ पीरियडलाही गप्पच! नव-याशी पटत नाही का?’ रेखा काही बोलली नाही. खरं तर तिचा नवरा सतत फिरतीवर असायचा. पटण्या न पटण्याचा प्रश्नच कुठे आहे. जरा शांत राहून घरचा काही प्रॉब्लेम सोडवू म्हटलं तर एवढ्याशा गोष्टीवरून नव-याशी पटत नाही का? एवढा मोठा पल्ला विचारणा-याने गाठायचा का? काहीच उत्तर देऊ नये झालं. तिने पुस्तकं उचलली आणि ती शांतपणे वर्गावर गेली.
कितीतरी अनुत्तरित किंवा उत्तरं देऊ नयेत असे प्रश्न स्त्रीभोवती भिरभिरत असतात. परीक्षा जवळ आली म्हणून सरलाने डबा लावला. तेव्हा तिची मैत्रीण म्हणाली, ‘अगं लग्न झालंय नं तुझं? तरी स्वैपाक येत नाही तुला?’
‘साड्या, मुलांचे कपडे नवराच आणतो, मग तुझ्या साड्यांच्या पसंतीचं काय?’ ‘तुझी आजेसासू, तुला दोन जावा असून तुझ्याजवळच का राहते?’ असे आगलावे प्रश्न विचारण्यात काहींना गंमत वाटत असावी. किंवा आपल्या घरात उणीव असल्यावर दुस-याच्या घरात उणेदुणे असावे असं वाटणं हे एक विचित्र मानसशास्त्र आहे. अशा विरोधी विचारांवर संयम ठेवायला हवा. काही प्रश्नांची उत्तरे फाडकन द्यावीत असे वाटणा-या स्त्रिया थोड्या आहेत. पण ज्यांना परिपक्व विचारांची झेप घेता येत नाही त्यांचे काय?


प्रश्न विचारणा-या स्त्रियांचा काहीही संबंध नसेल तर किंवा थोडीशीच ओळख असेल त्यांना स्पष्ट उत्तर द्यावे अगर उत्तर देता येत नसेल तर मौनाचा सभ्य मार्ग धरावा. म्हणजे आपली अभिरुची उच्च स्थानी आहे हे त्यांना कळते.
प्रश्न विचारले जाणारच, आपणही ते विचारत असतो, त्याला योग्य वेळ पाहून उत्तर द्यावे, स्वत:च्या भावनांचा गोंधळ होऊ देऊ नये.