आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आम्ही गृहपती’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवरा - बायको ही एकाच रथाची दोन चाके. यातील एक जरी निखळले तरी संसाराचा गाडा पुढे सरकत नाही. आज महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत असल्या तरी कौटुंबिक रथाचे सारथ्य पुरुषानेच करावे हा अट्टहास कायम आहे. पण संसाराच्या रथाची दोरी सहचारिणीच्या हाती देऊन ‘अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर’ असे आनंदाने म्हणत ‘आम्ही गृहपती’चे बिरूद अभिमानाने मागे लावणारे काही नवरेही आहेत.

आजारपणे लागली मागे -
मुलगा जन्मापासून असलेल्या विकारातून बाहेर आला नाही तोच त्याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. त्याच्या आईनेच त्याला किडनी दान केल्याने दोघांच्या प्रकृतीची काळजी मागे लागली. वडील वयस्कर होते. या सगळ्या कौटुंबिक चक्रव्यूहात सतीश चाफेकर यांच्या नोकरीचे चाक तुटले. ठाण्यात राहणारे चाफेकर कन्स्ट्रक्शन कंपनीत कामाला होते. 1987 मध्ये बॅँकेत असलेल्या नीलिमा यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नाचा आनंदसोहळा झाला आणि दुसर्‍याच दिवसापासून पत्नीच्या मागे सासुरवास लागला. 1989 मध्ये मुलगा झाला. जन्मापासूनच त्याला काही समस्या होत्या. अशातच आईने त्यांना वेगळे घर घेण्यासाठी सांगितले. त्याप्रमाणे डोंबिवलीत घर घेतले. मुलगा पाच दिवस आजीकडे गिरगावला आणि दोन दिवस डोंबिवलीला राहत होता. जवळपास दीड वर्ष झालेले हे मुलाचे हाल चाफेकर यांना पाहावले नाही. तू नोकरी कर, मी घर सांभाळतो असे पत्नीला सांगून 1993 मध्ये चाफेकर यांनी नोकरीला रामराम केला.

घरी बसल्या बसल्या त्यांनी ‘ढ’ मुलांसाठी शिकवण्या सुरू केल्या आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मुलाच्या संगोपनाबरोबर घरातली सगळी कामे आणि शिकवण्या सुरू होत्या. 1996 मध्ये आईचे निधन झाल्यानंतर त्यांनी वडिलांना डोंबिवलीला आणले. 2006 मध्ये मुलगा करण याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. त्याच्या आईने त्याला एक किडनी दिली. पत्नी आणि मुलगा दोघांना एक किडनी आणि वडील वयस्कर त्यामुळे घर सांभाळण्याबरोबरच मुलाच्या औषधोपचारापासून ते तपासणीसाठी रुग्णालयात जाण्याच्या फेर्‍यांची जबाबदारी वाढली. तरीही सगळी कामे ते आजही आनंदाने आणि कुरकुर न करता करत आहेत.

मुलाच्या आजारपणामुळे या दांपत्याला एकत्र कोठेही जाता येत नाही. पण त्यांची पत्नी जमेल तशी गिर्यारोहणाला जाते. ‘माझ्या नशिबात मजा नाही, पण तुझ्या आहे तर तू बिनदिक्कत जा,’ असेही ते आवर्जून सांगतात. चाफेकर म्हणतात, ‘लग्न झाले तेव्हा आणि त्यानंतर पत्नी मॅनेजर होईपर्यंत मला तिचा पगारही माहीत नव्हता. पण कधीही अहंकार आमच्या आड आला नाही. पत्नीमुळे संसाराचे एक चाक चालू राहिले असे कोणताही पुरुष अभिमानाने सांगणार नाही. कारण प्रत्येक पुरुषामध्ये अहंकार असतो, तसा तो माझ्याही अंगात आहे. पण तो कधी मी समोर येऊ देत नाही. मला पैशाची गरज लागली तर मी पत्नीकडे मागतो, पण तिच्या पैशाच्या पाकिटाला हात लावत नाही. पुढचा काळ हा अ‍ॅडजस्टमेंटचा असून पत्नीबाबत जर संशयाचे भूत नसेल तर संसार आणखी सुखाचा होतो.’ सेलिब्रिटींच्या स्वाक्षर्‍या जमवण्याचा छंद असलेल्या चाफेकरांच्या दारावर ‘माझे शब्दांचे घर’ अशी पाटी दिसते. ही पाटी त्यांच्या यशाचे रहस्य बरेच काही सांगून जाते.

संतोष काळे, मुंबई