आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसरा व्हॅलेंटाइन डे ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

8 मार्चच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची महती मला खूप लहानपणीच कळली होती. 8 मार्च हा माझा वाढदिवस असतो. मात्र मला आठवतं तेव्हापासून माझ्या वाढदिवसाला माझी आई कधीच घरी नसायची. ती कायम महिलांच्या मोर्चाला जायची. सुरुवातीला मला त्याचा प्रचंड राग यायचा. आई माझ्या मित्रमंडळींसाठी काहीतरी बनवून ठेवून कार्यक्रमाला जायची. त्यामुळे वय वाढत गेलं तसं मित्रांसह धुडगूस घालायला घर मोकळं मिळायला लागल्यामुळे बरंच वाटायचं.

महिला दिनाच्या कार्यक्रमांमध्ये मी अगदी लहानपणी आईबरोबर गेल्याचंही मला आठवतं. माझा वाढदिवस असल्याने चळवळीतील अनेक काक्या, मावशांनी केलेलं कौतुकही स्मरणात आहे. पुढे अशाच कार्यक्रमांमधून आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणजे काय आणि त्याचं महत्त्व काय हे समजत गेलं. 8 मार्च 1908 रोजी न्यूयॉर्कच्या रटगर्स चौकात कामगार स्त्रियांनी काढलेल्या प्रचंड मोर्चाच्या स्मरणात सुरू झालेल्या या महिला दिनाचं सत्त्वच कसं व्यवस्थेने काढून घेतलं व ज्या कारणासाठी 8 मार्च साजरा करणं सुरू झाला त्याच्या नेमक्या उलट्या कारणांसाठी हल्ली तो कसा साजरा केला जातो, हे पाहून मात्र सध्या फारच निराशाजनक वातावरण आहे, हे नमूद करावंसं वाटतं.

अमेरिका हा जगातील सर्वात आधी वेगाने कामगार चळवळ फोफावलेला देश आहे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात अमेरिकेत खूप मोठ्या प्रमाणावर कामगार संघटना तयार झाल्या होत्या. या सगळ्यांची पालक संघटना होती अमेरिकन फेडरेशन ऑफ लेबर. या संघटनेने महिलांना मात्र कामगार संघटनेत यायला बंदी केली होती. महिला कामगारांमुळे पुरुषांना नोकर्‍या मिळत नाहीत, हा पुरुषी बाणा यामागे होता. याच्या विरोधात अमेरिकेतील महिला कामगारांनी संप पुकारला. संपाच्या प्रमुख मागण्या अशा होत्या : कामाचे तास 14 वरून 10 करावेत, आठवड्याची सुटी द्यावी व कामाच्या ठिकाणी सोयी-सुविधा द्याव्यात, या मागणीबरोबरच महिलांना मतदानाची संधी द्यावी, ही राजकीय मागणीही होती. तोवर अमेरिकेत केवळ निवडक गोर्‍या पुरुषांनाच मतदानाचा हक्क होता. याच्या विरोधात अमेरिकेतील अभिजन महिलाही लढत होत्या. मात्र या अभिजन महिलांची मागणी केवळ अभिजन महिलांना मतदानाचा अधिकार असावा अशी होती.

कामगार महिलांनी मात्र लिंग, वर्ग, रंगभेद न करता मतदानाच्या संधीची मागणी केली होती. 8 मार्च 1908 रोजी रटगर्स चौकात या मागण्या घेऊन निघालेल्या अमेरिकी कामगार महिलांनी जगभरातील महिलांचे मनोधैर्य उंचावले. 1910 मध्ये कोपनहेगनमध्ये सोशलिस्ट विमेन्स काँग्रेसमध्ये अलेक्झांडर कोलनताई यांनी न्यूयॉर्कच्या कामगार महिलांच्या लढ्याच्या स्मरणार्थ हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार महिला दिन म्हणून पाळण्याचे आवाहन केले. कोलनताई लेनिनच्या अत्यंत जवळच्या सहकारी होत्या. क्रांतीनंतर त्या सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या पहिल्या महिला सदस्य झाल्या. रशियाच्या क्रांतीत तर 8 मार्चने मोठे वादळ आणले. रशियन वर्षगणना दोन प्रकारे केली जाते. ज्याला आपण फेब्रुवारी क्रांती म्हणून ओळखतो तेव्हा खरे तर मार्च सुरू होता. 8 मार्चला झारच्या राजवाड्यावर हजारो महिलांनी मोर्चा काढला. झारच्या सैनिकांनी त्यांच्यावर बंदुका रोखल्या. या महिलांनी बंदुकांच्या संगिनी हाताने पकडून सैनिकांना प्रश्न केला, तुम्ही तुमच्या आया-बहिणींवर गोळ्या चालवणार की अत्याचारी झारवर? महिलांच्या या धैर्याचा परिणाम झारच्या सैन्यावर झाला व सैन्यात बंड झाले आणि झारची सत्ता उलथून पडली.

भारतात पहिल्यांदा मुंबईमध्ये फ्रेंड्स ऑफ सोव्हिएत युनियन या संघटनेने 1943 मध्ये 8 मार्च साजरा केला. मात्र 1950 पासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या महिला शाखेने तो दरवर्षी साजरा करण्याची प्रथा सुरू केली. 1971 मध्ये 8 मार्चच्या निमित्ताने पुण्यातील महापालिका कामगार स्त्रियांनी पहिला महिला कामगारांचा मोर्चा काढून आंतरराष्ट्रीय महिला कामगारांबरोबर आपला भ्रातृभाव दाखवून दिला.

8 मार्चच्या निमित्ताने जगभरातील महिला कामगारांमध्ये जागृती येत होती. या निमित्ताने महिला कामगार मार्क्स-लेनिनच्या विचारधारेकडे वळत होत्या. हे लक्षात आल्यावर अमेरिकी वर्चस्व असलेल्या संयुक्त राष्ट्र संघाने 1975 मध्ये 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला. मात्र, यातून कामगार शब्द वगळण्यात आला. तेव्हापासून जगभरात अनेक ठिकाणी कंपन्यांमधील मोठ्या पदांवरील स्त्रियांपासून मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान स्त्रियांपर्यंत मिळून सार्‍या जणी एकत्र येऊ व गप्पागोष्टी करू इतकेच या दिवसाचे महत्त्व राहिले. हल्ली 8 मार्चच्या निमित्ताने इंद्रा नूयींपासून सोनिया गांधी-सुषमा स्वराज यांच्यापर्यंत अनेक उच्चभ्रू स्त्रियांविषयी वा त्यांनी सांगितलेल्या विचारांचे रकानेच्या रकाने छापून येतात किंवा तत्सम कार्यक्रम वाहिन्यांवर दाखवले जातात. खरे तर आजही शेतांमध्ये, वाड्यावस्त्यांवर, कारखान्यांत, कार्यालयांमध्ये राबणार्‍या स्त्रियांच्या प्रश्नांना या निमित्ताने अनेक ठिकाणी वाचा फोडली जाते, त्यावर गंभीर चर्चा होते. त्याला मात्र प्रसिद्धिमाध्यमे फारशी गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे 8 मार्च हा व्हॅलेंटाइन डेप्रमाणेच साजरा करण्याचा एक दिवस असल्याचे नव्या पिढीच्या मानसिकतेत भिनण्याची शक्यता आहे. 8 मार्च हा जगभरातील दबलेल्या, शोषित घटकांनी स्वत:च्या ताकदीवर स्वत:चे अवकाश निर्माण केल्याचा इतिहास सांगणारा दिवस आहे. त्यापासून जगभरातील शोषित, पीडित जनतेने स्फूर्ती घ्यावी, हाच 1910 मध्ये कोलनताई व क्लारा झेटकिन या दोन क्रांतिकारी स्त्रियांचा विचार होता. त्यावर कॉर्पोरेट स्टाइलने रंगरंगोटी करून 8 मार्च साजरा करण्यामागील मूळ विचार दाबण्याचा प्रयत्न केला तर कधीतरी दबलेल्या वाफेप्रमाणे अधिक शक्तीनिशी तो बाहेर पडून क्रांतिकारी बदल घडवणार हे लक्षात घ्यावे लागेल.
samar.khadas@dainikbhaskargroup.com