आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषमनाच्या गुजगोष्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ हे नाटक मी चार वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा पाहिलं त्या वेळी मी पुण्याजवळच्या ग्रामीण भागात काम करत होतो. मला नाटक आवडले होते, ते लैंगिकतेसारखा महत्त्वाचा विषय मांडणारे होते. आपल्या कामात लैंगिकतेच्या विषयाला जोडून घ्यायचे असेल तर हे नाटक कसे उपयोगी पडेल याचाच विचार तेव्हा नाटक पाहताना मनात येत होता. नाटकाचा आशय जरी वैश्विक असला तरी मांडणीतले तपशील बरेचसे शहरी होते. तरीही युद्धात बलात्कार झालेल्या बाईचे एक स्वगत मनाला खूप भावले आणि ग्रामीणसंदर्भात चर्चेसाठी उपयोगाचे वाटले होते. त्या वेळी कार्यकर्त्यांशी जशी चर्चा झाली तसेच समीक्षासोबतही नाटकाबद्दल बोलणे झाले. हे नाटक तुला नक्की आवडेल, असे मी तिला म्हणालोही! पण त्यानंतर ती घरातल्या जबाबदार्‍यांमध्ये इतकी गुरफटली की नाटक पाहायचे तिच्याकडून राहूनच गेले.

समीक्षाला थिएटरची खूपच आवड. थिएटर हे तिचे पॅशनच आहे! पण गेल्या पाच-सात वर्षांत घरातल्या जबाबदार्‍यांमुळे तिची ही आवड तिला गुंडाळूनच ठेवावी लागली होती; पण आमचा कबीर पाच वर्षांचा झाला आणि तिला जरा मोकळीक मिळाली! आता शांतपणाने नाटकाच्या आवडीकडे वळावे, असा ती विचारच करीत होती. त्याच सुमाराला योगायोगाने वंदना खरेची ओळख झाली. समीक्षाला व्यावसायिक नाटक करण्यापेक्षा एखादे चांगले अर्थपूर्ण नाटक करायची इच्छा होती. समीक्षाला ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’मध्ये काम करायला मिळाले तर किती छान होईल, असा विचार आम्ही करत होतो आणि खरोखरच काही महिन्यांत तशी शक्यता प्रत्यक्षातच आली! विश्वास बसणार नाही इतक्या सहज सगळ्या गोष्टी घडून आल्या.

कदाचित आमच्या घरातल्या वातावरणामुळेही ते इतकं सरळ आणि सोपं झालं असेल. आमच्या घरात खूपच मोकळं वातावरण आहे. लैंगिकता हा काही आमच्याकडे निषिद्ध विषय नाही. मी आणि माझे बाबादेखील अगदी मोकळेपणाने या विषयावर गप्पा करतो. माझी आईदेखील कम्युनिस्ट पार्श्वभूमी असलेल्या घरातली आहे. ती विचारांनी अतिशय लिबरल आणि वागायला फार फ्लेक्झिबल आहे. शिवाय आमच्या घरात नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर मित्रमैत्रिणींचा सतत वावर असतो. वाद-विवाद, हसणे, दंगामस्ती, गप्पा असा सारखा गोंधळ चालू असतो. नाटकात काम करणार्‍या इतर चार जणीदेखील माझ्या आणि समीक्षाच्या मैत्रिणीच होत्या. त्यामुळे घरातच तालमी व्हायला लागल्या. मला एकदा किंचित काळजी वाटली होती की, एखादवेळेस बाबा माझ्याजवळ नाही तरी आईजवळ तरी नाटकाविरुद्ध काही बोलतील का? पण ते मात्र मजेत नाटकातले संवाद एंजॉय करायचे. आणि प्रयोग पाहायचीही त्यांना उत्सुकता लागून राहिली होती. मुख्य म्हणजे समीक्षाला तिच्या आवडीचे नाटक करायला मिळते आहे, याचाच त्यांना आनंद होता. नाटकाचा माहौल घरात तयार झाला आणि आई-बाबा आनंदाने त्यात रंगून गेले.

कबीरदेखील कुतूहलाने या तालमी पाहायला लागला आणि बघता बघता त्याला सगळ्यांचे संवाद पाठ झाले आहेत. त्याने तालीम पाहू नये, असे आम्हाला नाही वाटत! नाटकातली गाणीही तर त्याला फारच आवडतात.

आम्हाला दोघांनाही लैंगिकता हा विषय नेहमीच खूप महत्त्वाचा वाटत आलेला आहे. त्याविषयी घरात आणि घराबाहेरही मोकळेपणाने संवाद होणे अतिशय गरजेचे आहे, असं आम्ही दोघंही मानतो. स्वत:च्या वैयक्तिक आयुष्यात, प्रत्यक्ष वागण्या-बोलण्यात मला हे निषिद्ध वाटतंय, पण नाटकात मात्र चालेल असं असूच शकत नाही! ‘पर्सनल इज पॉलिटिकल’ यावर आमचा विश्वास आहे. लोकांना काय वाटतंय, यावरून आमचं वागणं ठरत नाही. लोक काय म्हणतील यापेक्षा आमचं मत आम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. आम्ही लोकांच्या मताला नीट ऐकून घेतो; पण स्वत:चं वागणं-बोलणं आम्ही स्वत:च खूप तपासून पाहत असतो! आम्ही एकमेकांचे चांगले टीकाकार आहोत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्ही एकमेकांचे छान मित्र आहोत! एकमेकांच्या स्पेसचा आम्ही आदर करतो. आमचे वैयक्तिक मित्रमैत्रिणी निरनिराळे असतात. आम्ही जे काम करतो त्यात कुठला विषय आहे, काय काम आहे त्याबद्दल एकमेकाला सगळं माहीत असलं तरी आपापले निर्णय आम्ही स्वतंत्रपणेच घेतो. आम्ही एकमेकांच्या निर्णयात कधी ढवळाढवळ करत नाही; पण आमच्यात सतत संवाद मात्र असतो. हा संवादच समाजात सध्या खूप कमी होत चाललाय, असं मला नेहमी वाटतं! त्यामुळे आपण भोवताली भिंती घालून घेतो नाही तर अनेकदा एकमेकांवर आक्रमण तरी करतो! लैंगिकतेच्या बाबतीतही असंच घडतं. मग एका बाजूला पाप, अपराधीपणा, संकोच, लाज अशा भावना आणि दुसर्‍या बाजूला नुसते कोरडे व्यवहार उरतात. त्यातला सुंदर अनुभव हरवून जातो! लैंगिकतेच्या बाबतीतल्या भिंतींमध्ये एक संवादाची खिडकी उघडण्याचं काम ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ नाटकातून होत राहतं. म्हणून मला माझ्या बायकोने या नाटकात काम करणं महत्त्वाचं वाटतं!
paresh.jm@gmail.com