आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता आपली पाळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मासिक पाळी या विषयाबाबत जनजागृती करण्यासाठी युनिसेफच्या थिएटर फॉर डेव्हलपमेंट प्रकल्पाअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात नाटक सादर करण्याची जबाबदारी माझ्यावर आली. नाटकाची संकल्पना, काम करण्यासाठी मुलींची निवड, त्यासाठी पालकांची संमती, मुलींचा सराव, त्यावर महिलांच्या प्रतिक्रिया, त्यानुसार सुधारणा असा आमचा जवळजवळ वर्षभराचा प्रवास होता. हे नाटक महिला व मुलींच्या प्रश्नांची केवळ जाणीव करून देत नाही तर ते प्रश्न सोडवण्याची नवी उमेद आणि आत्मविश्वासही देते, हे याचे वैशिष्ट्य.

या नाटकाचा मूळ उद्देश होता किशोरी व महिलांचे आरोग्य सुदृढ करणे. अशा नाटकात काम करायला मुली आणि त्यांचे आईबाप तयार होतील का ही भीती होती. त्यामुळे फक्त दोन गावांतून 13 मुली निवडल्या. तिघींचे पालक प्रशिक्षणाला पाठवायला तयार न झाल्याने दहाच मुलींना घेऊन पुढे गेलो. या मुलींसाठी पाच दिवसांचे एक शिबिर घेतले. त्यात व्यायाम, आवाज काढण्याचा सराव, शब्दांचे योग्य उच्चार, मनात कथा तयार करून त्यानुसार कृती कशी करावी, वाक्य बोलताना हालचाली कशा कराव्या याची माहिती दिली. गावात सराव करतानाही लोक मुलींना त्रास देऊ लागले. नंतर हाच अनुभव प्रयोग करताना आल्याने प्रयोग बंद करावे लागले. मात्र ज्यांनी हे नाटक पाहिले त्यांना त्याचा फायदा जाणवला. मासिक पाळीतील स्वच्छता, मुलामुलींमधील समानता, सॅनिटरी पॅडचा योग्य वापर, बालविवाह न करणे, पाळीच्या काळात मुलींना घराबाहेर न ठेवणे अशा नाटकातून मिळणार्‍या सूचना अनेकांनी प्रत्यक्षात आणल्या. तेच आमच्या नाटकाचे फलित होते.
gnvntvaidya3@gmail.com