आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरुषार्थ : अर्थ अन् अनर्थ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्त्री आणि पुरुष म्हणजे खरे तर एकाच नाण्याच्या दोन बाजू. त्यामुळे कुणी कमी-जास्त किंवा एखादीच बाजू वरचढ वगैरे असण्याचा प्रश्नच मुळात उपस्थित व्हायला नको. पण वर्षानुवर्षे तसे घडते आहे खरे. महान वगैरे असलेल्या आपल्या परंपरांनी स्त्रियांना निरनिराळ्या जोखडांमध्ये जखडून ठेवताना पुरुषांना मात्र अधिकाधिक मोकाट सोडले. या प्रक्रियेला पुरुषार्थाचे लेबल चिकटवले गेले अन् नंतर ते घट्ट होत गेले. पण प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये पुरुषार्थाचा जो अर्थ अनुस्यूत आहे, तो मात्र निश्चितच व्यापक आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही चार मूल्ये म्हणजे पुरुषार्थ असे भारतीय संस्कृती मानते. पुरुष संज्ञेचा मूळ अर्थ ‘आत्मा’ असा होतो. वास्तवात पुरुषार्थात स्त्री-पुरुष अशा दोहोंचाही अंतर्भाव अपेक्षित आहे. पण असे असताना सोयीच्या आणि चुकीच्या समजांवर सारे बेतले गेल्यामुळे अर्थाचा अनर्थ झाला. पुरुषार्थातील चारही संकल्पना व सद्य:स्थितीवर नजर टाकल्यास ते सहजपणे स्पष्ट होईल.

धर्म : पुरुषार्थाचा पहिला स्तंभ. शुद्ध, सत्य व नैतिक वर्तन दैनंदिन जीवनात ठेवणे म्हणजे धर्मपालन असे त्याचे सार आहे. मात्र अशा वर्तनाऐवजी कर्मकांड आणि प्रथा-परंपरांनाच अवास्तव महत्त्व प्राप्त झाले. त्यातील बहुतांश बाबी स्त्रियांवर सरळसरळ अन्याय करणार्‍या आहेत. बहुतांश व्रतवैकल्ये बायकांनी पुरुषांसाठी करायची असा या परंपरांतून आलेला दंडक पुरुषी वर्चस्वाला खतपाणी घालणारा ठरत आला अन् स्त्री उपभोग्य वस्तू बनत गेली. त्याचा प्रभाव एवढा आहे की वटसावित्रीच्या पूजेसारखी एखादी प्रथा पुरुषांच्या बाबतीत का नाही, याचा विचार ‘मॉडर्न’ काळातसुद्धा कुणाच्या मनाला शिवत नाही. या मानसिकतेतूनच मग पुरुष या संज्ञेतला ‘आत्मा’ हरवत जातो आणि पुरुषी अहंपणाची मनावरील पकड घट्ट बनते. माझी बायको सत्यवानाच्या सावित्रीपेक्षा सावित्रीबाई फुलेंची ‘फॉलोअर’ असावी, असे म्हणणारे पुरुष आजही अभावानेच दिसतात, हे वास्तव नाकारून कसे चालेल? याबाबतीत पुरुष जेवढे ‘प्रॅक्टिकल’ होतील तेवढे ते पुरुषार्थातील धर्माच्या जवळ जातील. पण ‘प्रॅक्टिकल’ होण्यापेक्षा ‘टिपिकल’ होणे कधीही सोपे आणि सोयीचे असते. त्यामुळे सोयीचा तेवढाच धर्म पाळण्याचा ‘पुरुषार्थ’ आपल्याकडे आजही सर्वत्र दिसून येत असेल तर त्यात नवल ते काय?

अर्थ : सर्वात उपयुक्ततावादी असा हा पुरुषार्थ असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. किंबहुना कुटुंबातली, परिवारातली, राज्यकारभारातली आर्थिक सत्ता हाती असल्यामुळेच वर्षानुवर्षे पुरुष स्त्रीच्या तुलनेत सशक्त होत गेला. पैसाअडका, धनदौलत वगैरे कमवणे ही त्याची मक्तेदारी झाली अन् स्त्रीला मात्र सारे काही गमवण्याचीच सवय झाली. आता नव्या जमान्यातदेखील स्थिती फार काही बदलल्याचे दिसत नाही. उलट कमवून गमवण्याचा एक नवाच खेळ सुरू झाला. शहरी मध्यमवर्गीय महिला आज नोकरी वा काही ना काही करून घराला हातभार लावण्याचा कसोशीने प्रयत्न करत असल्याचे दिसते. पण त्यातील किती महिलांना आपण मिळवलेल्या पैशांचा विनियोग स्वत:च्या मनाप्रमाणे करता येतो? बहुतेक स्त्रियांना महिन्याचा पगार वा त्यातील एक मोठा हिस्सा नवरा किंवा घरातील कर्त्या पुरुषाकडे गुमान सोपवावा लागतो. शिवाय नोकरी किंवा व्यवसाय सांभाळतानाही घरातल्या इतर जबाबदार्‍यांतून (खरे तर कामे) त्यांना कोणताही ‘रिलीफ’ मिळत नाही. सकाळी बायकोची झाडलोट, स्वयंपाक अशी आवराआवर सुरू असताना नवर्‍यांची सकाळ समोर पेपर धरून चहाचे घुटके घेण्यात जाते. तसेच दोघेही नोकरीवरून पुढे-मागे घरी आले तरी पुन्हा बायकोनेच चहा द्यावा, अशी आपली रीत आहे. किंबहुना, त्यामध्येच खरा पुरुषार्थ असल्याचा (गैर) समज आहे आणि आजही तो अधिकाधिक दृढ होत आहे, हे नाकारण्यात काय अर्थ?

काम : इंद्रियांद्वारे घेतला गेलेला सुखोपभोग (स्त्री-पुरुष दोघांनीही) म्हणजे काम अशी या पुरुषार्थाची ढोबळमानाने मांडणी करता येईल. अन्न, पाणी ज्याप्रमाणे शरीराला गरजेचे आहे त्याप्रमाणेच विशिष्ट वयात स्त्री-पुरुषांना कामपूर्तीची गरज असते. अन्यथा व्यक्ती विकृतीकडे झुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामतृप्तीअभावी व्यक्ती दु:खी, निराश होते, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. पण कामाकडे स्वच्छ आणि नितळपणे पाहण्याऐवजी त्या माध्यमातून स्त्रियांचे शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण हाच खरा ‘पुरुषार्थ’ या दृष्टिकोनातून पाहिले जाते. प्राचीन काळी आपल्याकडे त्याबाबत खुलेपणा होता. मात्र दरम्यानच्या काळात मानसिकता बंदिस्त स्वरूपाची बनून गेली. आधुनिक तंत्रज्ञान व अन्य माध्यमातून ‘सेक्स’चे जे काही ओंगळवाणे प्रदर्शन सुरू असते त्यामुळे कामाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी विकृतीकडे झुकत आहे. लैंगिक छळ, बलात्काराच्या घटनांचे वाढते प्रमाण हा त्याचाच परिपाक. स्त्रीपेक्षा आपण सरस असल्याचे दाखवण्याची वृत्तीच त्याद्वारे दिसून येते. त्यामध्ये दोष पुरुषार्थाचा नव्हे तर चुकीचा अर्थ काढणार्‍या पुरुषी मानसिकतेचा आहे हे नक्की.

मोक्ष : जीवनाच्या अंतिम सत्याचा साक्षात्कार, संसारचक्रातून सुटका म्हणजे मोक्ष अशी ही संकल्पना आहे. त्याचा अर्थ खरे समाधान, आनंद, असीम आनंद प्राप्त करणे. म्हणजे त्यामध्ये स्त्री-पुरुष अशा दोघांचाही अंतर्भाव असणे उघड आहे. परंतु समाधान वा आनंद सर्वसमावेशक करण्याऐवजी एकाला पीडा म्हणजे दुसर्‍याला आनंद अशी धारणा बनत गेली. त्यामध्ये सर्वसाधारणपणे भरडल्या जातात त्या स्त्रियाच. अशा पद्धतीने एकाचा आनंद हिरावून दुसर्‍याला मोक्षप्राप्ती कशी होणार, याचा विचार केला तरच या पुरुषार्थाप्रत पोहोचता येऊ शकेल.

थोडक्यात, या चारही पुरुषार्थांच्या माध्यमातून एक समृद्ध संस्कृती निर्माण व्हावी, समताधिष्ठित आणि संयमित समाजव्यवस्था अस्तित्वात यावी हा त्यामागचा मूळ उद्देश आहे. पण पुरुषार्थाचा खरा अर्थ लक्षात घेण्याऐवजी त्याला पुरुषांच्या अहंकाराचा बाज चढला अन् अनर्थ झाला. किमान आता ही स्थिती बदलायला हवी अन् प्रत्येकाने त्याची सुरुवात स्वत:च्या घरापासून करायला हवी. त्यासाठी महिला दिनासारखा चांगला ‘मुहूर्त’ शोधूनही सापडणार नाही.
abhijit.k@dainikbhaskargroup.com