‘दिवाळी अंक’ हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक संचित. नव्या तांत्रिक-यांत्रिकतेचा कल्पक वापर करत दिवाळी अंकही आपले रुपडे पालटत आहेत. संपादक स्त्रियाही पुढे येत आहेत. नवे विषय, वेगळा आशय, निराळी मांडणी करून स्त्रिया यात आपला ठसा उमटवत आहेत. शतकभराहूनही मोठी परंपरा असणाऱ्या अंकांचे संपादकपद भूषवणाऱ्या कर्तबगार स्त्रियांची ही प्रातिनिधिक मनोगते.
सृजनसेतू
- डॉ. वंदना बोकील–कुलकर्णी
गेली अनेक वर्षं वाचक म्हणून, मग दहा-बारा वर्षं लेखक-अभ्यासक म्हणून, आणि नंतर अधूनमधून संपादकीय मदत, एखाद्या विभागाची जबाबदारी असा दिवाळी अंकाशी आत्मीय संबंध येतच होता. गेली दोन- तीन वर्षं मात्र स्वतंत्र दिवाळी अंक निर्मितीचं स्वप्न खुणावत होतं. समविचारी मैत्रिणींबरोबर ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता दिसताच मनानं उचल घेतली आणि ‘सृजनसेतू’ हा पहिला दिवाळी अंक आकाराला आला.
दिवाळीची चाहूलही नसताना आम्ही सृजनसेतूची आखणी सुरू केली. मनात हे पक्कं होतं की, दिवाळी अंकाच्या १०६ वर्षांच्या सुदीर्घ परंपरेचा पाईक होण्याची ही संधी आहे. तेव्हा भिन्न अभिरुचीच्या वाचकांना काही वाचनीय मिळायला हवं, अंकाला दृश्यमूल्यही हवं, कला, पर्यावरण, समाजस्पंदनं यांना जोडणारा ‘अक्षरपूल’ अंकातून साकारावा, या आकांक्षेनं सृजनसेतूची मांडणी केली.
एस. एल. भैरप्पा, रेहमान राही आणि प्रतिभा राय या ज्ञानपीठप्राप्त अन्य भाषक प्रतिभावंतांशी संवाद हा आमचा खास विभाग त्या त्या दिग्गज मंडळींच्या विचारप्रवृत्त करणाऱ्या चिंतनाने भारदस्त बनला आहे. ज्येष्ठ कोंकणी लेखक महाबळेश्वर सैल, सानिया, संतोष शिंत्रे, योगिनी वेंगुर्लेकर यांनी सरस कथा देऊन कथाविभाग सजवला. तर सुबोध जावडेकर, मधुकर धर्मापुरीकर, डॉ. प्रमोद पाटील, मिलिंद चंपानेरकर, दीपा देशमुख या रसज्ञ अभ्यासकांनी विविध लेख वेळेत देऊन आमचा उत्साह वाढवला. आसावरी काकडे यांनी ‘चित्रकविता’ हा अभिनव प्रयोग विश्वासाने सृजनसेतूवर सोपवला. २५ वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेला भालचंद्र नेमाडे यांच्या वेगळ्याच पैलूवर प्रकाश टाकणारा चंद्रकांत पाटील यांचा लेख मुद्दाम पुनर्मुद्रित केला आहे. प्रशांत दळवी व चंद्रकांत कुलकर्णी यांच्या संस्मरणांनी आणि उषा मंगेशकर, दीपा श्रीराम, दीप्ती नवल आणि नंदू माधव यांच्या मनोगतांनी अंकात वैविध्य आले आहे. प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचे मुखपृष्ठ, चंद्रशेखर बेगमपुरे यांची चित्रे व अक्षरसुलेखन आणि प्रदीप खेतमर यांची मांडणी यामुळे मनाजोगता अंक तयार करता आला, याचं समाधान आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा.. इतर दिवाळी अंक व संपादकांविषयी..