आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्‍त्री शक्तीची कच्छी अविष्‍कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कच्छी भाटिया समाजातील स्त्रिया अतिशय कष्टाळू आणि कर्तबगार आहेत. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्त्रियांना शिक्षण घेण्यास मुभा नव्हती. अशा वेळी या समाजातील स्त्रियांनी अंगच्या मुत्सद्देगिरीने नव-याच्या पश्चात त्यांचे उद्योगधंदे सांभाळले. मुलांना यशस्वी व कर्तबगार बनवले. या सर्वाचे कारण म्हणजे जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची वृत्ती, घरातील पुरुष उद्योगाबद्दल काय बोलतात, समस्या कशा सोडवतात, याचे निरीक्षण करणे हे होय. अशा काही स्त्रियांची ओळख करून दिल्याशिवाय राहवत नाही. मोरारजी गोकुळदास यांच्या पत्नीस लहान वयात वैधव्य आले. पतीच्या लाखो रुपयांच्या मिळकतीचा भार सांभाळण्याची, मुलांना वाढवण्याची, त्यांना उद्योगधंदे सांभाळण्यास लायक करण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडली. या सर्व जबाबदा-या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या. या बाई स्वत: शिकलेल्या नव्हत्या, परंतु गुजरातीत एक म्हण आहे, ‘भणेला नई पण गणेला.’ या बाईंची घडण अशीच होती. अनुभवाचे गाठोडे त्यांच्यापाशी होते. आयुर्वेदाचे ज्ञानही त्यांना होते. मुंबईतील गिरगावात आता जेथे सिक्कानगर आहे तेथे त्यांचे ‘चायना बाग’ नावाचे मोठे घर होते. त्या सकाळी आठ वाजता घराच्या दिवाणखान्यात येत. त्यांच्या वेगवेगळ्या उद्योगसमूहातले मुनीम त्यांना त्या त्या उद्योगाविषयी, आर्थिक परिस्थितीविषयी, महानगरपालिकेच्या कामाविषयी माहिती देत. एखाद्या टीपकागदाप्रमाणे ती सर्व माहिती त्या ऐकून घेत, योग्य त्या सूचना देत. साडेनऊपर्यंत सर्व आटोपल्यावर घरकामात लक्ष घालत. दुपारी झोपत नसत.


आजूबाजूच्या बायका त्यांच्याकडे लोणची, पापड, विणकाम, भरतकाम इ. शिकण्यास येत. वयाच्या 21व्या वर्षी त्यांना वैधव्य आले होते. मोरारजी गोकुळदासांच्या पहिल्या पत्नीची तीन व त्यांची स्वत:ची चार अशा सात मुलांचे संगोपन त्यांनी केलेच; शिवाय योग्य व्यक्ती हाताशी घेऊन गिरण्यांचा सांभाळही अगदी व्यवस्थित केला. याच बाईंची नातसून सुमती मोरारजी, व्यापारी जहाज कंपन्यांच्या दुनियेतली एकटी स्त्री! 13 मार्च 1909 रोजी सुमती यांचा जन्म एका धनिक कुटुंबात झाला. कुटुंबात एकुलती एक मुलगी. त्या काळचे प्रसिद्ध उद्योगपती, अनेक घोड्यांचे मालक, घोड्यांच्या शर्यतीचे शौकीन, अगदी इंग्लंडमध्येही शर्यतीत भाग घेऊन जॅकपॉट जिंकलेले मथुरादास गोकुळदास हे त्यांचे वडील. सुमतीला इंग्रजी, गाणे शिकवायला खास शिक्षक ठेवले होते. वयाच्या तेराव्या वर्षी तिचा विवाह सुप्रसिद्ध उद्योगपती नरोत्तम मोरारजी यांचे चिरंजीव शांतीकुमार यांच्याशी झाला. कालांतराने सुमतीला सिंधिया कंपनीच्या मॅनेजिंग एजन्सीवर घेण्यात आले. त्यासाठी आवश्यक असलेले शेअर्स तिच्या नावावर केले आणि देशाच्या व्यापारी जहाज सेवेला एक उत्तम नेतृत्व मिळाले. जगातील बहुसंख्य देशांना त्यांनी भेटी दिल्या. Indian National Steamship owners Associationचे अध्यक्षपद 1956 व 1965 मध्ये त्यांनी भूषवले. त्यांच्या कंपनीत 14 दिवस बैठा संप झाला होता. कामगार संघटनेचे नेते होते मनोहर कोतवाल. संपकाळात किंवा नंतरही सुमतीबेनच्या चेह-यावर कधीही राग दिसला नाही, की कामगारांबद्दल अनुद्गार तोंडून निघाले नाहीत. दुस-या अशाच वेगळ्या क्षेत्रात पुढे आलेल्या या समाजातील स्त्री म्हणजे मणिबेन कारा. पश्चिम रेल्वे कामगारांच्या संघटनेच्या सर्वेसर्वा, तसेच महानगरपालिकेच्या कामगार संघटना, जहाजावरील कामगारांच्या संघटना, गिरणी कामगार संघटना इ.चेही त्यांनी नेतृत्व केले. 1905 मध्ये लीलाधर कारांच्या धनिक कुटुंबात मणिबेनचा जन्म झाला. सेंट कोलंबो मुलींच्या शाळेत त्यांचे शिक्षण झाले. त्या मॅट्रिक परीक्षेत नापास झाल्या, पण शाळेच्या प्राचार्य मिसेस मॅकलिन यांच्या समाजकार्याने प्रभावित होऊन बर्मिंगहॅम विद्यापीठातून त्यांनी समाजसेवेची पदविका घेतली. त्यानंतर मणिबेन यांनी भारतात येऊन भायखळ्याच्या महानगरपालिकेच्या सफाई कामगारांमध्ये शिक्षण, स्वच्छता, दारूच्या दुष्परिणामांविषयी जागृती आणण्याचे कार्य केले. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनांतूनही नेतृत्व केले. 1946 मध्ये मध्यवर्ती सभेत कामगारांचे प्रतिनिधित्व केले. International Transport Workers Federation ने त्यांना सुवर्णपदक दिले, तर भारत सरकारने 1970 मध्ये पद्मश्रीचा सन्मान दिला. 28 ऑक्टोबर 1979 रोजी मणिबेन कारा निवर्तल्या.


शिक्षण क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी बजावणा-या प्रेमलीला ठाकरसीही याच कच्छी भाटिया समाजातल्या. सरोजिनी नायडू, हंसा मेहता, अ‍ॅनी बेझंट, दुर्गाबाई देशमुख व नेहरू घराण्यातील स्त्रियांच्या समकालीन. उद्योगपती सर विठ्ठलदास ठाकरसी यांच्या पत्नी. 8 जानेवारी 1894 रोजी राजकोट येथे यांचा जन्म झाला. गुजराती चौथीपर्र्यंतचे शिक्षण गावी झाले. वयाच्या 20 व्या वर्षी सर विठ्ठलदास यांच्याशी विवाह होऊन त्या मुंबईस आल्या. सर विठ्ठलदासांनी घरी शिक्षिका नेमून इंग्रजी भाषा, सामान्यज्ञान, गाणे, घोडेस्वारी इ. गोष्टी शिकवल्या. सामाजिक नेतृत्व करण्याविषयी त्यांना सांगितले व विठ्ठलदासांच्या पश्चात प्रेमलीला यांनी नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाची धुरा कुलगुरू म्हणून सांभाळली. गोकीबेन चत्रभुज श्रॉफ या एक्सेल उद्योगसमूहाच्या श्रॉफ घराण्यातील वरिष्ठ व्यक्ती होत्या. सर्व कामगार त्यांना ‘माँ’ म्हणत. सुरुवातीच्या काळात कामगारांना सकस अन्न मिळावे म्हणून गोकीबेन स्वत: जेवणातले पदार्थ ठरवत, स्वयंपाक करण्यास मदत करत. प्रत्येक कामगाराचे जेवण व्यवस्थित झाले की नाही, हे जातीने पाहत. फावल्या वेळात कामगारांचे फाटलेले कपडे शिवून ठेव, तुटलेली बटणे लावून ठेव अशी कामे त्या करत. हे करताना त्या कामगारांची जात, धर्म, भाषा याचा विचार त्यांनी कधीही केला नाही. गोकीबेन यांच्यासारख्याच दुस-या अगदी साध्या पण खंबीर स्त्री म्हणजे बाई कबुबाई मरीवाला. पॅराशूट, स्वीकार इ. कंपनी, मारिको कंपनीच्या कुटुंबातील प्रमुख स्त्री. गांधीवादी असलेल्या कबुबाई स्वत: सूत कातून खादी बनवत व त्याचीच साडी नेसत. त्यांच्या सास-यांना स्त्रियांनी बाहेर गेलेले आवडत नसे. परंतु गांधीजींच्या विचारांचा कबुबाईंवर इतका प्रभाव होता की दुपारी घरातून गुपचूप बाहेर पडून कुठे पत्रके वाट, कुठे जखमींना मलमपट्टी कर, अशी कामे त्या करत. एखादी स्त्री शिक्षणात जरी पुढे नसली तरी तिच्या अंगच्या गुणाने ती काय काय करू शकते, याची ही उत्तम उदाहरणेच नव्हेत का?

mbpurandare@gmail.com