आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला क्रांतीच्या पाऊलखुणा दिसताहेत: सत्यजित भटकळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रश्न : 11 मे रोजी ‘सत्यमेव जयते’ या ‘रिअ‍ॅलिटी शो’ला एक वर्ष पूर्ण झाले. या कार्यक्रमातून मांडलेले विषय हे अत्यंत ज्वलंत, संवेदनशील, सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारे होते. हे सर्व दाखवताना तुमच्यासमोर विशिष्ट प्रेक्षक होता का?
उत्तर : ‘सत्यमेव जयते’ कार्यक्रमाची रूपरेषा ठरल्यानंतर तसेच आमिरशी चर्चा केल्यानंतर आम्ही स्त्री भ्रूणहत्या, सार्वजनिक आरोग्य सेवा आणि पॉवर ऑफ वन या विषयांवर संशोधन करून चार डॉक्युमेंटरी तयार केल्या. त्या वेळी आमच्या लक्षात आले की, हे जीवन आपल्याला काहीतरी सांगू पाहतेय. सर्वसामान्य माणसाला आपल्याला काहीतरी सांगायचे आहे. परंतु आमच्यापुढे असा कोणताही विशिष्ट प्रेक्षक नव्हता. आमच्यासमोर श्रीमंत वर्ग होता, मध्यमवर्ग होता, शेतकरीवर्ग, कामगारवर्ग होता, डॉक्टर होते. आम्हाला कोणत्याही वर्गाला टार्गेट करायचे नव्हते. उलट आमचा कार्यक्रम सर्वांनीच पाहावा, यासाठी आम्ही अतोनात धडपडत होतो. तुम्ही वकील आहात, कॉम्रेड आहात. गेली दोन वर्षे देशात भ्रष्टाचारावरून रण माजलेले होते. भ्रष्टाचाराविरोधात झालेल्या आंदोलनांच्या निमित्ताने आपल्या संसदीय लोकशाहीला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला, याबाबत तुमचे स्वत:चे राजकीय मत काय आहे?
मी वकील होतो, कॉम्रेड होतो. ‘सत्यमेव जयते’च्या निमित्ताने आम्ही जाणीवपूर्वक चळवळ जन्मास घातली नाही; पण ही चळवळ मात्र होऊ शकते, असे मला वाटते. ‘सत्यमेव जयते’च्या निमित्ताने आम्ही फक्त संवादकाची भूमिका स्वीकारली, ती मर्यादित स्वरूपाची अशी आहे. मला वाटते, आपल्या समाजाला आत्मचिंतनाची गरज आहे. घडणार्‍या प्रत्येक वाईट गोष्टीसाठी सरकार जबाबदार आहे, हे मला पटत नाही. या देशातल्या प्रत्येक समस्येला मी जबाबदार आहे, या देशात भ्रष्टाचार असेल तर त्याला मीही जबाबदार आहे, असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. आपल्याला ‘सेल्फ करेक्शन’ची गरज आहे. आपण बदललो तर आपल्याला सत्ता बदलण्याची, मॅनिफिस्टो बदलण्याची, राजकीय पक्ष बदलण्याची गरज काय? मुळात आपण आपले जीवन बदलले पाहिजे. एका अर्थाने त्या बदलास प्रेरित करणारा ‘सत्यमेव जयते’ हा आपल्या समाजापुढचा आरसा होता.

तुम्ही या मालिकेच्या निमित्ताने भारतभर फिरला. समाजातील स्पंदने जाणून घेतली. उदारीकरणाची प्रक्रिया, सोशल मीडिया, मोबाइल फोनच्या वेगवान प्रसारामुळे हा देश आमूलाग्र बदलत आहे. या बदलत्या भारताबद्दल तुम्ही काय सांगाल?
या प्रश्नाचे उत्तर अवघड आहे. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ जोन रॉबिन्सन यांनी भारताबद्दल म्हटले आहे की, एनिथिंग इज से अबाउट इंडिया इज ट्रू, इज एक्झॅक्टली अपोझिट इज अल्सो अ ट्रू. आपला देश एकाच वेळी अनेक शतकात जगत असतो. पण मला असे वाटते की भारतात मंथनाची प्रक्रिया सुरू आहे. या मंथनातून अमृत निघेल की विष, हे सांगणे कठीण आहे. या मंथनात एक लक्षवेधी प्रक्रिया सुरू आहे, ती महिला सबलीकरणाची. विशेषत: तरुण मुली या पितृसत्ताक व्यवस्थेला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहेत. बलात्कारासारख्या नैराश्य पसरवणार्‍या घटना घडत असल्या तरीही महिला हिमतीने पुढे येत आहेत, आपल्या हक्कासाठी आवाज उठवत आहेत. मला वाटते, या देशातल्या महिला खर्‍या अर्थाने सबल झाल्या तर साक्षरता आणि सुरक्षा याचे संदर्भच बदलून जातील. प्रत्येक क्षेत्रात एक नवी चेतना निर्माण होईल. त्याची सुरुवात मला स्पष्ट दिसतेय. दुसरे चित्र मला दिसतेय की, आपला समाज संघटित होण्याऐवजी स्वकेंद्रित होतोय. महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाचा सामना आपण संघटित होऊन का करत नाही, हा मला या क्षणी पडलेला प्रश्न आहे. अर्थात, स्वकेंद्रितता सोडून आपला समाज एकत्र आला तर अनेक मोठे, गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्याची क्षमता त्यातून आकारास येईल, यावर माझा ठाम विश्वास आहे.

‘सत्यमेव जयते’च्या दुसर्‍या पर्वाबाबत प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे. दुसर्‍या पर्वाची नेमकी रूपरेखा कशी असणार आहे?
यातील एकाही प्रश्नाचे सविस्तर उत्तर मी या क्षणी देणार नाही. एवढेच सांगेन की आम्ही नव्या जोमाने काम करतोय आणि आमचा नवा कार्यक्रम पहिल्याइतकाच स्ट्रायकिंग असेल. अर्थातच यात दिसणारा आमिरही खूप वेगळा असेल.