आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गॉसिपची कार्यशाळा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


‘तीवरदा नाही का, शांताची मुलगी... तिने लव्ह मॅरेज केलं. नवरा मद्रासी आहे पण स्मार्ट आहे हं. पण त्याच्या घरच्यांना हिचा दहीभात, लोणचं आवडेल का हो?’ अलका तिच्या मैत्रिणींशी बोलत होती. सगळ्या जणी उकडीचे मोदक बनवण्याच्या कार्यशाळेला जमल्या होत्या.

‘अगं बाई, तांदळाची पिठी जरा कमीच आणली मी.’ मध्येच नंदिनीला आठवण झाली.
‘ते जाऊ दे गं, शिकण्यासाठीच तर आलोय, कुठं सगळ्यांना खाऊ घालायचेयत. मी काय म्हणते, वरदासारखीच तिची बहीणही बंडखोर आहे म्हणे. कसं ना या दोघींच्या आईला मान्य करता येतात त्यांच्या मागण्या.’ अलका नंदिनीला तोडत म्हणाली. या गप्पा सुरू होत्या तोवर कुणाच्या मनात पिठीबद्दल घालमेल तर कुणाची मोदक जमतील की नाही ही. या गप्पा मात्र या मैत्रिणींना सोडवत नव्हत्या.

कुठेही एकत्र आलं की एकत्र येण्याचं कारण काहीही असो, गप्पांचे विषय मात्र अफाट. बरे, गप्पांना वैचारिकतेचा सोस कधीच नसतो असं नाही. पण थोडं बौद्धिक घेतल्यानंतर हळूहळू एकमेकींच्या घरात यांची मनं डोकवायला लागतात. गैरहजर असलेल्या आपल्या मैत्रिणींच्या घरी काय चालूय, कुणी किती साखर महिन्याला घेतली इथपासून कुणी घराच्या इंटिरिअरवरच किती पाण्यासारखा पैसा ओतला, इतकंच काय, कुणी लिपस्टिक किती फासतं यापर्यंत चर्चा. जरा कुठे काही खुट्ट झालं की यांच्या गप्पांमध्ये या ‘खुट्ट’चं तिखटमीठ लावून रिपोर्टिंग असणारच.

पण काहीही झालं तरी हे मजेशीर गॉसिप सोडवत नाही कुणाला, अगदी पुरुषांनाही. बाकी सगळ्याच गोष्टींचे क्लासेस, कार्यशाळा घ्याव्या लागत असतील, पण गॉसिप कसे करावे ही कार्यशाळा कुणी घेतल्याचे काही ऐकिवात नाही. मग मनात आलं, आपणच अशी प्रोफेशनल कार्यशाळा घ्यायला काय हरकत आहे? परफेक्ट गॉसिप कसं करावं? कुणाला थांगपत्ता न लागू देता एखाद्याची एक्सक्लुझिव्ह बातमी कशी काढावी आणि कॉलर ताठ करत मैत्रिणींमध्ये ती च्युइंगमसारखी कशी हळूहळू चघळावी अशा अनेक गोष्टींचे ट्रेनिंग देणे आवश्यक आहे. मग झालं तर, दोनच दिवसांत फेसबुकवर पोस्ट टाकले, ‘वी आर कंडक्टिंग गॉसिप वर्कशॉप’. एक स्पेशल पेजही तयार केले. सुरुवातीला व्हर्च्युअल ट्रेनिंगवर जोर द्यायचे ठरवले. पोस्ट टाकल्या टाकल्या अनेकींच्या वेगवेगळ्या कमेंट्स. अर्थात टर्म्स अँड कंडिशन्स अ‍ॅप्लाय अशी स्वतंत्र नोटही टाकली होती. कुणाच्या खासगी आयुष्याचा बोभाटा करायचा नाही या अटीवर हे वर्कशॉप घेणार आहे असे जाहीर केले. कमेंट्स फार गमतीदार होत्या. कुणी गॉसिपचं ट्रेनिंग म्हणून आश्चर्य व्यक्त केलं होतं, तर कुणी उत्सुकता दाखवली होती. कुणी ‘चिल, सो फनी आयडिया’ म्हणून फक्त हसण्यावर थांबलं होतं. तब्बल 45 कमेंट्स बायकांच्या, एकाच दिवसात.

दिवस पहिला, व्हर्च्युअल वर्कशॉपचा. ग्रुप चॅटिंग अर्थात. हाय-हॅलो करीत सगळ्या जणींचा परिचय करून घेतला. परिचय कसला, प्रत्येक जण आपल्या आतापर्यंतच्या आयुष्याचा जमाखर्चच मांडत होती. सुरुवातीला नीट ऐकून घेतलं म्हणजे त्यांचं चॅटिंगमधलं इंट्रो वाचून घेतलं. अर्थात माझ्या एका पोस्टचं यश होतं की मला 45 जणींची पहिली बॅच मिळाली.
कुठलाच विषय सुरुवातीला ठोस असा दिला नाही या सगळ्या जणींना बोलायला. एकीला म्हटलं, तू नुसतं कशावरही बोलायला सुरुवात कर, आपण बघूया पुढे काय होतं ते. ती सुरू झाली. लग्नं कसं झालं इथून तिने बोलायला सुरुवात केली तोच एकीने मधेच तिला तोडत तिच्यासारखाच एक किस्सा मावशीच्या मुलीच्या बाबतीत घडला होता, असे सांगत किस्साच सांगायला सुरुवात केली. त्या किश्श्यामध्ये साडीचा विषय निघाला आणि तिसरीने तिला तोडत आपल्या भाचीने फक्त संक्रांतीसाठी कशी नेटची फॅशनेबल काळी साडी घेतली, तिची कशी तितकीच फॅशनेबल किंमत होती हे सांगायला सुरुवात केली. पटकन वर्ड फाइलमध्ये शॉपिंग हा एक मुद्दा नोंदवला. हळूहळू 45 जणींनी एकामागून एक काही ना काही सांगून घेतले. त्यांना जाणीव करून दिली की तुम्ही सगळ्या जणी तब्बल पाऊण तास नव्हे जास्तच, शॉपिंगवरून एकमेकींशी बोललात. बरे नुसते स्वत:चे शॉपिंग नाही तर इथे अनुपस्थित असलेल्या एखादीचे शॉपिंगही तुम्ही किमतीसकट सांगून टाकलेत, प्राइस टॅग न पाहता. सगळ्या जणी हसायला लागल्या. विषय सुरू झाला होता लग्नावरून, संपला मात्र शॉपिंगवर.

अशा गॉसिपला दिशा कशी द्यायची यावर काम करूया असे चॅटबॉक्समध्ये एंटर केले आणि अर्ध्याहून अधिक जणींचे प्रश्नार्थक उद्गार उमटले. हे काम फार अवघडेय बाई म्हणत अनेकींनी कोड्यात पडल्यागत अवस्था दर्शवली. थोडा वेळ घेतला विचार करायला. खरंच गॉसिपला दिशा देणं अवघडेय. पण बघूया तर खरी प्रयत्न करून. मग एक विषय ठरवला, ‘भाजी घ्यायला जाते तेव्हा’. अटी सांगितल्या, सगळ्या जणींनी फक्त भाजीशीच संबंधित गॉसिप करायचं. सुरुवात, मध्य आणि शेवट भाजीवरच करायचा म्हटलं तर तुम्हाला कठीण वाटेल. पण मग ट्रायल बेसिसवर मध्यापर्यंत तरी भाजीचाच विषय असू द्या. वेळ एक तास, मध्य अर्ध्या तासाला पकडायचा.

झाले, संवाद नव्हे गॉसिप सुरू. कुणी मुलांना फक्त भेंडीच आवडते म्हणायला लागली, तर कुणी त्या नवीन लग्न झालेल्या स्मिताची सासू तिला सतत भाजीचा भाव करता येत नाही म्हणून कशी टोकत असते यावर बोलायला लागल्या. पण कसचं काय, माझा हा ट्रायल फुकट गेला. पंधरा मिनिटांत गॉसिपची गाडी रुळावरून घसरली. पुन्हा दुसरा विषय दिला, तेच नियम, तीच वेळ, विषय फक्त वेगळा.

पण काही जमेना. साधारणपणे तीन ते चार तास या वर्कशॉपमध्ये गेले असतील, पण पहिला दिवस जवळपास फेल गेला. 45 जणींची बॅच मिळाली इतकंच काय ते यश. दुस-या दिवशीदेखील गॉसिपला दिशा काही केल्या मिळेना. मग सरळ दिशा देण्याचा उपक्रमच बाद करून टाकला. नवीन काहीतरी करूयात म्हणून मी एंटर केले. पण बायकांच्या गप्पा अशा काही रंगल्या होत्या की वर्कशॉप लीडर मी आहे याचाच त्यांना विसर पडायला लागला. अखेर मी वॉलवर पोस्ट टाकले, ‘ नो नीड टू ट्रेन विमेन इन गॉसिप, इट्स ह्यूमन नेचर.’

काही वेळाने एक कमेंट आली या पोस्टवर. मी दुर्लक्षच करणार होते पण नाव पाहून चमकले. माझा जुना चाळिशीतला मित्र होता, कमेंट करणारा, ‘अरेरे मी जॉइन करू का विचारणार होतो, सीरियसली,’ मला आता मात्र प्रश्न पडला, पुरुषांसाठी वेगळी कार्यशाळा घ्यायला काय हरकत आहे!

तोवर त्या 45 जणींमधल्या एकीने आणखी एक कमेंट टाकली, ‘दोन दिवस कसं रिलॅक्स वाटलं, इतक्या गप्पा मारून अन् किस्से सांगून. मनातली सगळी मळमळ बाहेर पडली.’ सो, इट वॉज अ सक्सेस...

priyanka.dahale@dainikbhaskargroup.com