आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगन्मान्य ‘टाळे’बंदी !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांगले, उपयुक्त, मौल्यवान असेल ते सारे जतन करायचे, हा माणसाचा स्थायीभावच. पण अनेकदा त्यातून चांगले ते सगळे आपल्याला किंवा आपल्याकडे हवे, ही वृत्तीही बळावत जाते. साहजिकच याची जाणीव झाल्यापासून म्हणजे अनादी कालापासून अशा बाबी सुरक्षित राखण्याची खटपट माणूस करत आला आहे. त्याचे फळ त्याला मिळाले ते कुलूप-किल्लीच्या रूपात! विशिष्ट पद्धतीनेच उघड-बंद करता येण्याजोग्या या साधनाच्या वापराची युक्ती कमालीची ठरली. कुलपाची उपयुक्तता कालौघात वाढत गेली अन् अगोदर केवळ अडकणीच्या स्वरूपात असलेल्या या साधनाचे अक्षरश: हजारोंत गणना व्हावी एवढे प्रकार अवतरले. तिजोरीपासून घरापर्यंत आणि बॅगांपासून वाहनांपर्यंत स्थावर असो वा जंगम, सर्व प्रकारचे साम्राज्य स्वत:मध्ये बंदिस्त करण्यात कुलूप-किल्ली आज यशस्वी ठरली आहे. कारण, घराची तटबंदी किंवा तिजोरीची रचना कितीही मजबूत केली तरी जोपर्यंत त्यावर कुलपाची योजना होत नाही, तोवर तिच्या सक्षमतेला जणू काही अर्थच उरत नाही. मात्र एकदा का त्यावर कुलूप बसले, की सारे कसे अगदी सुरक्षित वाटायला लागते. विश्वासाची किंवा निर्धास्ततेची एवढी भक्कम आणि सर्वमान्य ‘गॅरंटी’ अन्य कशामध्ये शोधूनही सापडणार नाही.
प्राथमिक अवस्थेतली आणि तरीदेखील वैशिष्ट्यपूर्ण अशी कुलपे इसवीसनाच्याही अगोदर तब्बल चार हजार वर्षांपासून वापरात असल्याचे दाखले मिळतात. हे पाहता, कुलपांना केवढा प्रदीर्घ इतिहास आहे त्याची प्रचिती सहजपणे येते. इसवीसनाच्या अगोदर चार हजार वर्षे एवढे जुने कुलूप आढळले आहे, ते इजिप्तमध्ये! विशिष्ट प्रकारच्या रचनेची अडकण तोंडावर बसवलेले हे साधन बनवण्यासाठी लाकडाचा वापर केला गेला आहे. कालांतराने मजबूत लाकडाच्या पट्ट्या, कामट्या वगैरेंच्या साहाय्याने अधिकाधिक तंत्रकुशल कुलपांचा वापर सुरू झाला. उपयुक्तता पटू लागली तशा त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा होत गेल्या आणि झडपा व्यवस्थितपणे उघड-बंद होतील अशी कुलपे अस्तित्वात आली. पण, या कुलपांना एक मर्यादा होती. प्राथमिक अवस्थेतली तांत्रिक रचना समजावून घेतली, की कुणालाही अशी कुलपे उघडणे शक्य होत असे. ही त्रुटी दूर झाली ती कुलपाला किल्लीची जोड मिळाल्यानंतर. अशा प्रकारची कुलपे प्राचीन रोममध्ये सर्वप्रथम अस्तित्वात आल्याचा दावा केला जातो. रोमचे साम्राज्य ऐन भरात असतानाच्या काळात धातूपासून बनवलेल्या कुलपांची तेथे चलती होती. गुंतागुंतीचे अनेक अटकाव (लिव्हर) असणा-या या कुलपांसाठी खास प्रकारच्या किल्ल्यांची गरज पडत असे. या किल्ल्या सदैव जवळ हव्यात आणि योग्य प्रकारे सांभाळल्याही जाव्यात म्हणून तेव्हा तेथे अंगठीमध्ये किल्ली बसवण्याची पद्धत रूढ झाली होती.
जगभरातल्या अन्य प्राचीन संस्कृतींमध्येसुद्धा कुलपांना वा त्याच्या वापराला महत्त्वाचे स्थान होते. भारत आणि चीनमध्ये जुन्या काळात काही ठिकाणी कुलपांची खास योजना केली जात असे. पण, त्यांचा भर किल्ल्यांपेक्षाा वैविध्यपूर्ण पेच वा गुपित शब्द, संख्या यावर असायचा. किल्लीशिवाय उघडणारी अशी संयोगी कुलपे चीनमध्ये विशेष लोकप्रिय होती. कुलपाच्या पृष्ठभागावरील विशिष्ट चिन्हे, आकडे अथवा संख्या जवळ आणताच ही कुलपे उघडली जात असत. युरोपमध्येसुद्धा कालांतराने अशा कुलपांची चलती होती. विशेषत: बँका अथवा खजिन्याच्या ठिकाणी या प्रकारची कुलपे वापरली जात. सुरक्षिततेच्या दृष्टीने ती खूपच उपयुक्त ठरत. मात्र या कुलपांचे गुपितांक जाणून घेण्यासाठी संबंधित अधिका-यांच्या अपहरणांपासून छळ वा हत्येसारख्या घटना वारंवार घडू लागल्याने अखेर हा ट्रेंड मागे पडला. मध्ययुगीन काळात धातूची कुलपे बनवण्याच्या पद्धतीला जगन्मान्यता मिळाली. त्यामध्ये विशेषत: जर्मन मंडळी आघाडीवर होती. या कुलपांचा अंगचा भाग मजबूत वा टिकाऊ असेल आणि त्याच वेळी त्याचे बाह्य स्वरूप आकर्षक, सौंदर्यपूर्ण असेल, यावर तत्कालीन कारागिरांचा कटाक्ष असायचा. त्यामुळेच ही कुलपे जणू एखाद्या अलंकारासारखी भासत. नंतरच्या काळात मात्र मजबुतीच्या निकषांवर कुलपांचा दर्जा ठरू लागला. त्यातून कुलपे बनवताना त्याच्या तांत्रिकतेवर जास्त मेहनत घेतली जाऊ लागली. निरनिराळ्या रचनेचे व गुंतागुंतीचे स्थिर अटकाव आणि त्याच्याशी निगडित असलेले, पण सरकते अटकाव अशी रचना रुळत गेली. या अटकावांचा बाज लक्षात घेऊन त्यानुसार विशिष्ट खाचा पाडून त्याची किल्ली बनवणे शक्य झाले, ज्या योगे कुलपाचा आकडा सहजपणे उघडणे अथवा बंद करणे सुलभ व्हावे. अठराव्या शतकात इंग्लंडस्थित रॉबर्ट बॅरन यांनी उचलले जाणारे अटकाव (घोडे) वापरून कुलूप बनवण्याचे तंत्र विकसित केले. त्यानंतर कुलपांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होऊ लागले. परिणामी, कुलपांचा प्रचार-प्रसारही जोरदार झाला. आपल्याकडे पोस्ट खात्याने 1850मध्ये उत्तरेतील अलीगढ येथे कुलपे बनवण्याचा कारखाना सुरू केला. तेव्हापासून अलीगढ हे कुलूप निर्मितीचे देशातील प्रमुख केंद्र राहिले आहे. आज अनेक मोठमोठे उद्योग समूह या क्षेत्रात उतरले असले तरी अलीगढचे नाव अद्यापही कायम आहे. अर्थात, मार्केट अथवा वैविध्यपूर्ण कुलपांच्या खपाचा विचार करता आज मुंबईसारख्या महानगरांमध्ये हा व्यवसाय केंद्रित झाला आहे. कारण काळ बदलला तशी कुलपांची उपयुक्ततादेखील वाढत गेली. केवळ तिजोरीपुरताच त्याचा वापर मर्यादित राहिला नाही. दरवाजांची कुलपे, टेबलाच्या खणांची कुलपे, सायकलींची कुलपे, वाहनांची कुलपे; एवढेच कशाला, बॅगांची कुलपे, शटरची कुलपे.. असे हर प्रकारचे टाळे आज आपल्या जीवनशैलीशी एवढे निगडित झाले आहे, की कितीही टाळायचे म्हटले तरी आपण ही ‘टाळे’बंदी टाळू शकत नाही...
( संदर्भ : * Britanica encyclopedia * मराठी विश्वकोश )