आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आटोक्यात ठेवावा उच्चरक्तदाब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक आरोग्य दिन म्हणून 7 एप्रिल हा दिवस जगभर साजरा करण्यात येतो. या आरोग्य दिनानिमित्त जगभर मानवजातीला भेडसावणारी आरोग्याची एखादी समस्या व प्रश्न ऐरणीवर आणण्याचे काम जागतिक आरोग्य संघटना (who) करत असते. यंदाच्या आरोग्य दिनाचा विषय आहे ‘ उच्चरक्तदाब.’ उच्चरक्तदाब असणार्‍या रुग्णाला हृदयविकाराचा झटका, मेंदूचा पक्षाघात (stroke) आणि किडनी फेल्युअर होण्याचा धोका असतो. तथापि उच्चरक्तदाब या आजारावर उपचार करता येतात आणि त्याचा प्रतिबंधही सहज करता येतो.
मुलात उच्चरक्तदाब होण्याची अनेक शक्य अशी कारणे आहेत. लहान मुलात उच्चरक्तदाब हे दुसर्‍या एखाद्या आजाराचा परिणाम असू शकतो. विशेषत: किडनीचे आजार पौगंडावस्थेतल्या मुलांना मात्र अशा दुसर्‍या आजाराशिवायही उच्चरक्तदाबाचा त्रास संभवतो. त्यालाच इसेन्शल हायपरटेन्शन असे म्हणतात. टीनएजर्सना उच्चरक्तदाब होण्यासाठी स्थूलपणा कारणीभूत ठरतो किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना जर उच्चरक्तदाबाचा त्रास असेल तर मुलांनाही रक्तदाबाचा त्रास संभवतो. उच्चरक्तदाबावर नीट उपचार करावे लागतात, त्या योग्य किडनी, हार्ट, ब्रेन यासारख्या महत्त्वाच्या अवयवाची दीर्घकालीन हानी होण्यापासून बचाव केला जाऊ शकतो.
उच्चरक्तदाब म्हणजे काय?
वैद्यकीय परिभाषेत उच्चरक्तदाबाला हायपरटेन्शन (hypertension) असे म्हटले जाते. उच्चरक्तदाबाचा त्रास शक्यतो प्रौढांना संभवतो हे तुम्हाला माहिती असेल, पण तो लहान मुलांना आणि पौगंडावस्थेतल्या मुलांतही आढळतो. केवळ एकदा रक्तदाब मोजून रक्तदाबाचे निदान करता येत नाही. याला अपवाद मोठ्या प्रमाणावर असलेला रक्तदाब किंवा तशी लक्षणे असलेले बालरुग्ण ठरतीलही, पण हायपरटेन्शनचं निदान करण्यासाठी वारंवार रक्तदाब मोजणे अगत्याचे आहे.
लहान मुलांत उच्चरक्तदाब उद्भवण्यासाठी त्याला असणारे दुसरे आजार कारणीभूत ठरतात. या आजारात किडनीचे विकार, रक्तवाहिन्यांचे आजार यांचा प्रामुख्याने समावेश असतो. अशा आजारांवर जर प्रभावी इलाज केले तर उच्चरक्तदाब आपोआप आटोक्यात येतो. पौगंडावस्थेतल्या मुलांना प्रौढांप्रमाणेच दुसरा कुठलाही आजार नसताना उच्चरक्तदाबाचा त्रास असू शकतो. यालाच इसेन्शल किंवा primary हायपरटेन्शन असे म्हणतात. स्थूलता असणार्‍या मुलांत ते मोठ्या प्रमाणावर आढळून येते. त्यासाठी उपचाराची नितांत गरज असते. बहुसंख्य टीनएजर्स मुलांत योग्य आहार नियोजन आणि नियमित व्यायाम केल्याने उच्चरक्तदाबाचा त्रास कमी केला जाऊ शकतो.
लक्षणे : सामान्यत: उच्चरक्तदाब असणार्‍या रुग्णात कुठलीच लक्षणे आढळून येत नाहीत. बहुसंख्य वेळा नित्याच्या वैद्यकीय तपासणीत मुलांचा रक्तदाब वाढल्याचे दिसून येते.
इसेन्शल हायपरटेन्शन (essential hypertension) पौगंडावस्थापूर्व मुलात क्वचित प्रसंगी अशा प्रकारचा रक्तदाब असल्याचे आढळते. ज्यांना उच्चरक्तदाब आहे, अशी बहुसंख्य पौगंडावस्थेतील मुलं स्थूल असतात किंवा त्यांचं वजन त्याच्या वयानुसार अधिक असतं. तसेच उच्चरक्तदाब असणार्‍या टीनएजर्सच्या बर्‍याच आई-वडिलांतही उच्चरक्तदाबाची समस्या असते.
सेकंडरी हायपरटेन्शन (दुसर्‍या आजारामुळे वाढलेला रक्तदाब) : या गटात मोडणार्‍या रुग्णांनाही रक्तदाबाची अशी स्वतंत्र लक्षणे असत नाहीत. ज्या आजारामुळे त्यांचा रक्तदाब वाढला आहे, त्या आजाराची लक्षणे त्यांच्यात दिसून येतात. क्वचित प्रसंगी अभावाने, जर रक्तदाब खूपच वाढला असेल तर, मुलांत डोकेदुखी, चकरा येणे किंवा झटके (convulsion) अशी लक्षणे आढळतात. अशी लक्षणे मुलांत दिसून आली तर त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते.
रक्तदाब कशामुळे वाढतो ?
इसेन्शल हायपरटेन्शन : प्रौढांप्रमाणेच टीनएजर्समध्ये अशा प्रकारच्या उच्चरक्तदाबाचं नेमकं कारण दिसून येत नाही. यासाठी आनुवांशिकता हे एक कारण असू शकतं. उच्चरक्तदाबाचा त्रास जर आई-वडिलांना असेल तर मुलांनाही तो होण्याचा धोका अधिक असतो. आनुवंशिकतेबरोबरच वाढलेले वजन, अयोग्य आहार, ताणतणाव हे घटक रक्तदाब वाढण्यास मदत करतात.
सेकंडरी हायपरटेन्शन : उच्चरक्तदाब होण्याला अनेक आजार कारणीभूत ठरतात. त्यात
किडनीचे आजार - लहान मुलांत रक्तदाबाचा त्रास उद्भवण्याचे सर्वात जास्त आढळणारे कारण म्हणजे किडनीचे आजार. वारंवार मूत्रमार्गाचा जंतुसंसर्ग झाल्यामुळे उद्भवणारा pyelonephritis पायलोनेप्रायटिस हा आजार तसेच प्रतिक्षमतेमुळे होणार्‍या किडनीदाहामुळे उद्भवणार्‍या ग्लोमेरुलोनेफ्रायटिस(glomerulonephritis) या किडनीच्या विकारांचा समावेश आहे.

ड्रग्ज आणि औषधी : कोकेनसारख्या ड्रग्जचे सेवन किंवा गर्भधारणा रोखण्यासाठी घेण्यात येणार्‍या ओरल काँट्रासेप्टिव्ह पिल्स यांचा विपरीत परिणाम म्हणून उच्चरक्तदाब होतो.

उच्चरक्तदाबामुळे उद्भवणारी गुंतागुंत :
उच्चरक्तदाब रुग्णाला हृदयविकार, मेंदूचा पक्षाघात (लकवा), किडनी फेल्युअर अशा प्रकारची गुंतागुंत उद्भवण्यास मोठा हातभार लावतात. उच्चरक्तदाबामुळे रुग्णाच्या हृदय, मेंदू आणि किडनी यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या अवयवाची हानी होते.
पौगंडावस्थेतल्या मुलांना जर उच्चरक्तदाब झाला तर तो विकार तसाच त्याच्या प्रौढावस्थेतही राहू शकण्याचा धोका असतो. म्हणूनच प्रौढांप्रमाणेच मुलांतही हायपरटेन्शनचे योग्य उपचार आणि प्रतिबंध करणे, हे हृदयविकाराचा झटका आणि मेंदूचा स्ट्रोक टाळण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे.