आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जागतिक रंगभूमी दिन : आशियाई नाट्यठसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आशियाई समाज वेगवेगळ्या काळात वसाहतीकरणाच्या प्रक्रियेतून गेले. परिणामी पाश्चात्त्य रंगभूमीच्या प्रभावाखाली रंगभूमी आकार घेत गेली. मात्र, गेल्या काही वर्षांत लोकपरंपरा, पारंपरिक कला आणि आधुनिक कलारूपांच्या मदतीने जागतिक रंगभूमीवर आशियाई ठसा उमटवण्याचा जोरकस प्रयत्न होताना दिसत आहे. त्याचाच जागतिक रंगभूमी दिनानिमित्त घेतलेला हा आढावा...
याच अंकात खास दै. ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी पं. सत्यदेव दुबे, बादल सरकार, सफदर हाश्मी, गिरीश कर्नाड, हबीब तन्वीर, रतन थिय्याम, संजना कपूर आदी रंगकर्मींच्या भरीव योगदानामुळे समृद्ध होत गेलेल्या नाट्यप्रवाहांची दखलही...


आशियाई रंगभूमीला समृद्ध परंपरा लाभली आहे. भारतातला ‘तमाशा’, ‘कथकली’; चीनमधला ‘बीजिंग ऑपेरा’; जपानमधली ‘नोह’, ‘काबुकी’ परंपरा; व्हिएतनाममधली ‘हाट बोई’ आणि कठपुतळ्यांशी संबंधित कला प्रयोग जगभरातल्या प्रेक्षकांना आणि रंगकर्मींना आकर्षित करत आले आहेत. यातल्या अनेक रंगपरंपरांचे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन झाले आहे, तर काही अजूनही दुर्लक्षित आहेत. ज्या देशातले सरकार आणि समाज आपल्या कला आणि परंपरांबद्दल संवेदनशील आणि जागरूक आहेत, तिथे कलाकार आणि त्यांच्या कला चहूबाजूने विकसित होत आहेत. त्यांचे जगभर प्रयोग होत आहेत. जुन्यातून नवनवीन प्रयोग आकाराला येत आहेत.
पुदुचेरी येथील ‘आदिशक्ती’ या नाट्यसंस्थेने पाच वर्षे ‘रामायण प्रोजेक्ट’ केला. त्यामध्ये जगभरातून रामायणावर काम करणारे कलाकार, संशोधकांना आमंत्रित केले गेले. अशा काही कलाकारांपैकी जावामधील मुगियोनो कासिदो (मुगी) हे नृत्यमांडणीकार. मुगी ‘शिंताज मेमरी’ या नावाच्या सुंदर नाट्य-नृत्य प्रयोगांतून जावा- रामायणातील सीता आणि रामाची गोष्ट ते सांगतात. 2011च्या रामायण प्रोजेक्टमध्ये मला पाहायला मिळालेल्या या प्रयोगात पारंपरिक जावा नृत्यातून आपल्या कला-प्रेरणा शोधणारे मुगी, सीतेची गोष्ट तिच्याच शब्दांत सादर करताना ‘वायांग कुलीत’ हा शॅडो पपेट्री आणि ‘तेंबांग’ या जावामधील अभिजात काव्यप्रकाराचा वापर करतात. पारंपरिक शॅडो पपेट्री करणाºया कुटुंबात जन्मलेले मुगी पारंपरिक कलारूपांची नस न् नस ओळखतात.
कलामाध्यमांचे पुरेपूर आकलन करून घेत अंत:प्रेरणांची हाक ऐकत परंपरेतील कला-प्रकारांना ते नवी रूपे देतात. सीतेच्या मनातला खोलवरचा संघर्ष वेगवेगळ्या काळातल्या कलाकाराला भावला आहे, तसा मुगींनासुद्धा भावला. तो त्यांनी शरीराच्या आणि संगीताच्या भाषेतून समर्थपणे मांडला. जावांमधले मुगियानो कासिदो असोत वा भारतातील चंद्रलेखा आणि आस्ताद देबूंसारखे काही कलाकार किंवा सुझुकी आणि ओटा ओशोगोसारखे जपानमधले रंगभूमीवरले नाटककार आणि दिग्दर्शक परंपरांकडे आकर्षित होताना दिसतात. परंतु, ते परंपरांचे गौरवीकरण करून थांबत नाहीत, तर परंपरांना वेळोवेळी प्रश्न विचारतात आणि आव्हानही देतात. नव्या आशियाई रंगभूमीचे हे ठळक वैशिष्ट्य मानले गेले आहे. आशियाई पारंपरिक कलांचा आजच्या काळातल्या सादरीकरण-कलांमध्ये योगदानाचा मुद्दा नेहमीच उपस्थित होतो. लोकपरंपरा वा पारंपरिक कला आणि ‘आधुनिक’ कलारूपे वेगळी, अशी दोन तुकड्यांमधली मांडणी आशियाई नाट्यपरंपरांबद्दल करता येणार नाही. इथले समुदाय जेवढे गुंतागुंतीचे आहेत, तेवढेच नाट्यकलाकार, त्यांच्या कला आणि त्यांचे संदर्भही गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे, पाश्चात्त्य समीक्षा पद्धतीच्या आधारे इथल्या आधुनिकीकरणातील गुंत्यांचे गोळीबंद आकलन मांडता येत नाही. आशियाई प्रयोग रूपांचे आकलन मांडताना, परंपरा म्हणजे काय?, परंपरांचा शोध घेतो म्हणजे कलाकार काय करतो? या प्रश्नांना भिडावे लागते. आशियात गेल्या काही वर्षांत जागतिक राजकारण, समाजकारण आणि अर्थकारण प्रचंड वेगाने बदलले. अर्थात, आशियातला प्रत्येक देश बदलाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर उभा आहे. प्रत्येक देश मग तो इंडोनेशिया असो; चीन वा पाकिस्तान, त्यांची-त्यांची सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख असली तरी सगळे देश विकसित होत आहेत. ‘ओळख’ नावाचे एका टप्प्यावर हवेहवेसे वाटणारे सामान नंतर कसे सांभाळू, असे वाटून जड होऊ लागले आहे. मग नाना तºहेच्या ओळखी आशियाई समाजावर स्वार होऊ लागल्या आहेत. ओळखीच्या राजकारणात पडताना आपलीच ओळख खरी, हे सिद्ध करण्यासाठी समुदायांमध्ये अहमहमिका आहे. एका बाजूला राष्ट्रवादाची तीव्रता वाढते आहे, तर दुसºया बाजूस त्याला आव्हानसुद्धा दिले जात आहे. प्रगतीचा दिंडोरा पिटत असताना शोषित आणि शोषक यांच्यातील दरी वाढतीच आहे. शोषणाची नवी नवी रूपे आकाराला येत आहेत. सत्ताधिकारी आणि समाज यांच्यातले संबंध तीव्रपणे समोर येत आहेत. या पार्श्वभूमीवर आशियाई रंगभूमीची चिकित्सा करणे क्रमप्राप्त बनले आहे.

प्रयोग-कलाकार, समाज आणि राज्यसंस्था यांच्यामधल्या गुंतागुंतीचा काळ आज आशियाई प्रयोग कलाकार अनुभवत आहेत. एका बाजूला, कलाकाराच्या स्वायत्ततेला सतत आव्हान दिले जात आहे, तर स्वातंत्र्याच्या संकोचाला प्रतिक्रिया देत कलाकार स्वत:च्या समाजाबरोबर असलेल्या आपल्या नात्याची पुनर्मांडणी करताना दिसत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणून आई वेईवेई या दृश्यमाध्यम आणि प्रयोग कलांमध्ये काम करणाºया चिनी कलाकाराकडे पाहावे लागेल. चिनी सरकारच्या हुकूमशाहीविरुद्ध वेईवेई आपल्या प्रयोगातून तरुणांच्या, कामगारांच्या अधिकारांसाठी आवाज उठवत आहेत.

वेईवेर्इंसारख्या आशियाई कलाकारांच्या कामातून एक मुद्दा स्पष्ट होतोय की, आजचा नाटक लिहिणारा, प्रयोग बसवणारा दिग्दर्शक यांच्यातच नाट्य फिरत नाही. वेगवेगळे विषय हाताळण्याबरोबर ते विषय विविध शैलीत आणि नाना तºहेने मांडले जात आहेत. भारतातल्या पूर्वोत्तर भागातल्या मणिपूरसारख्या राज्यांमधल्या वर्षानुवर्षे चालणाºया राज्यव्यवस्था आणि समाज यांच्यातल्या संघर्षांवर मार्मिक भाष्य करताना कन्हायलालसारखा दिग्दर्शक प्रेक्षक म्हणून आपल्याला जागे करतो. त्यावेळेस, आपण एक कला-प्रकार बघायला येणारे प्रेक्षक म्हणून नाही तर एक जबाबदार माणूस म्हणून तिथल्या स्थितीकडे संवेदनशीलतेने पाहण्याचे, तटस्थपणे पाहण्याचे भान देतो.

एकूणच, आशियाई देशांमधील कलाकारात आज देवाणघेवाण वाढली आहे. युरोप वा अमेरिकेकडे पाहण्याऐवजी आशियाई देशांतर्गत कलाकारांत आदान-प्रदान करत एकमेकाला प्रोत्साहन देण्याकडे कल वाढला आहे.‘स्टडी ऑफ द स्टेटस ऑफ डिस्पॅच अ‍ॅण्ड रिसेप्शन इन इंटरनॅशनल कल्चरल एक्स्चेंज’ने 1990 ते 2000 या दशकात आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाणीचे कार्यक्रम झाले, त्यांचे सर्वेक्षण केले. त्यामध्ये सिद्ध झाले आहे, की 2000मध्ये 181 कार्यक्रमांमध्ये जगभरातल्या कलाकारांनी जपानला भेट दिली आणि 131 कार्यक्रमांमध्ये जपानी संस्था आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झाल्या. त्या दशकामध्ये ही वाढ जवळजवळ 249 टक्के होती. गेल्या दशकामध्ये, आशियाई राज्यसंस्थांनी सांस्कृतिक कार्यक्रमात पैसा ओतला, तसाच अनुदान देणाºया खाजगी संस्थांची आर्थिक मदतही या काळात वाढत गेली. कॉर्पोरेट कंपन्यांचा पैसा आर्थिक उदारीकरणाच्या काळात वाढत गेला. त्याच वेळेस, वाढलेल्या पैशाचा प्रयोग कला समृद्धीसाठी किती उपयोग झाला, गरजू कलाकारांपर्यंत किती पैसा पोहोचला, कलाविषयक संस्थांचे झालेले ‘एनजीओ’करण झाले याविषयीचे गंभीर मुद्देही याच काळात उभे राहिले आहेत. अशा वेळी सांस्कृतिक आणि कलात्म संकोचाकडे आशियाई कलाकाराने डोळसपणे पाहायला हवे. परंपरांचे भान, कलाकाराचे आत्मिक बल, आधुनिकीकरणाचा रेटा आणि बरोबरीने पर्यायी आधुनिक रूपे उभी करण्याची इच्छा यामध्ये आशियाई नाट्य-नृत्य परंपरा तावून सुलाखून निघणे आवश्यक आहे. शोषित राज्यव्यवस्थेविरुद्ध फेसबुकसारख्या माध्यमातून आवाज उठवणाºया कलाकाराने कलात्म व्यवहाराकडे चिकित्सक नजरेने पाहणे गरजेचे आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आशियाई कलाकाराचा स्वत:चा आतला आवाज त्याला स्वत:ला ऐकू यावा आणि मग तो इतरांना ऐकू जावा, यासाठी तो स्वत: जागरूक असणे गरजेचे आहे.