आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहृदयी कुटुंबाची तरल कहाणी (ग्रंथ पश्चिमा)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्याला सगळ्यांनाच दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावायला आवडते. बहुतेक वेळा हे डोकावणे प्रसिद्ध माणसांच्या बाबतीत असते. कारण प्रसिद्ध माणसांना माणूस म्हणून जाणून घेण्याची इच्छा असते, तर कधी कधी तारे-तारकांच्या भानगडी जाणून घेण्याचा आंबटशौकही असू शकतो. काही पुस्तकांविषयी जी प्रकाशनपूर्व मािहती प्रसिद्ध होते, ती वाचून कुतूहल निर्माण होऊन आपण ती पुस्तके वाचायचे ठरवतो. प्रस्तुत पुस्तक असेच वाचायचे ठरवल्यापैकी एक...

आपल्याला सगळ्यांनाच दुसऱ्याच्या आयुष्यात डोकावायला आवडते. बहुतेक वेळा हे डोकावणे प्रसिद्ध माणसांच्या बाबतीत असते. कारण प्रसिद्ध माणसांना माणूस म्हणून जाणून घेण्याची इच्छा असते, तर कधी कधी तारे-तारकांच्या भानगडी जाणून घेण्याचा आंबटशौकही असू शकतो. काही पुस्तकांविषयी जी प्रकाशनपूर्व मािहती प्रसिद्ध होते, ती वाचून कुतूहल निर्माण होऊन आपण ती पुस्तके वाचायचे ठरवतो. प्रस्तुत पुस्तक असेच वाचायचे ठरवल्यापैकी एक...

ही एक आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. या लेखकाची आई मानसिक रुग्ण होती, एवढे कळले होते. साधारणपणे अशा परिस्थितीत माणसं सत्य न बोलता ते टाळायचा प्रयत्न करतात किंवा त्याचा जाताजाता सहज उल्लेख करतात. परंतु पूर्ण कहाणीच त्यावर बेतणे, ती रहस्यमय नसणे याविषयी कुतूहल वाटले. शीर्षकात लिहिल्याप्रमाणे पुस्तक वाचून खाली ठेवल्यावर मनात भावना उरते ती म्हणजे, एका सद्वर्तनी कुटुंबाने आपल्या घरातील मानसिक रुग्णाला दिलेल्या सन्मानाचे व प्रेमाचे कौतुक! आपल्या घरावर जर अशी वेळ आली तर आपण कसे वागले पािहजे, हे शिकण्याचीही.

‘मी’च्या पलीकडे जाऊन प्रेम करायला शिकवणारे वडीलच या कादंबरीचे नायक आहेत. ‘एम’ हे संबोधन लेखकाने आईला व ‘बिग हं... म’ हे वडलांना दिलेले आहे. आईचे नाव इमेल्डा म्हणून ‘एम’ व वडलांना काही सांगितले की ते म्हणायचे, ‘हं... म’; म्हणून ठेवलेली ही नावे. कुटुंब गोव्यात मूळ असणारे रोमन कॅथलिक. आईचे वडील बर्मात व्यवसाय करणारे, पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सर्वस्व गमावून आई व मुलगी बोटीवरून जेमतेम कलकत्त्याला परततात. वडील चालत कित्येक महिन्यांनंतर कलकत्त्याला पोहोचतात. इमेल्डा लहानाची मोठी होते मुंबईत. वडील ‘हं... म’, गोव्यातील सामान्य शेतकरी कुटुंबातील. पुण्याला मॅट्रिकची परीक्षा देण्यासाठी जातात व कुणाच्या तरी सांगण्यावरून मुंबईला येतात. गोव्याला जाण्यासाठी जवळ पैसे नसल्याने तिथेच छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत राहतात. एका दयाळू गोवेकरी डॉक्टरमुळे इंजिनिअर होतात. नोकरीला लागतात. तिथे इमेल्डा भेटून त्यांची दोस्ती होते. ही दोस्ती अकरा-बारा वर्षे चालते, कारण घरात एकटीच कमावती असल्याने तिचे लग्न शेवटी तिच्या मावशीच्या पुढाकाराने होते. लग्न झाल्यावर दुसऱ्या मुलाच्या वेळी पहिल्यांदा इमेल्डाचा नर्व्हस ब्रेकडाऊन होतो. ती मध्येच बरी असते, कधी थोडीशी औदासिन्यात असते, तर कधी तिला इस्पितळात भरती करण्याची वेळ येते. घरी असते तेव्हा मुलांशी काहीबाही बोलते, त्यातून तिच्या आयुष्याची कहाणी आपल्याला उलगडत जाते.

पुस्तक आपण वाचत जातो, कारण या सर्व वस्तुत: अवघड वाटणाऱ्या गोष्टी अत्यंत नर्मविनोदी पद्धतीने जेरीने सांगितल्या आहेत. जिथे त्यांना घाबरायला होते, त्याचे वर्णन, वडलांना काही झाले तर आपले काय होईल याची धास्ती, वडलांचे आईबद्दल असणारे प्रेम व जे आहे ते तसेच स्वीकारण्याची वृत्ती हे निखळपणे आले आहे. आज आपण मानसिक रोगाविषयी जाणतो, परंतु ५०-६०च्या काळात हे सर्व ऑगस्टिनने ण् स्वीकारणे व मुलांपर्यंत हा समजूतदारपणा, हे प्रेम पोहोचवणे, खरेच कौतुकास्पद आहे. त्या काळचा समाज, त्यांचे सांस्कृतिक विश्व याचे चित्रण पुस्तकात आले आहेच; पण रोमन कॅथलिक समाज, त्यांची राहणी, भाषा, त्यांच्या धार्मिक समजुती व संस्कार, त्यामुळे घडलेले हास्यस्फोटक प्रसंग याचे वर्णन, मानसिक आजारामुळे बिनधास्त बनलेल्या आईच्या तोंडून येते, तेव्हा सगळ्यातली विसंगती लक्षात येऊन हसू आल्याशिवाय राहात नाही. उदा. प्रसूतिगृहात वेदनेने सर्व बायका ओरडत असतात. आई सांगत असते, ‘त्या इव्हने सफरचंद खाल्ले ना! तेव्हा गॉडने शाप दिला! म्हणून सर्व बायकांनी प्रायश्चित्त म्हणून वेदना सहन केल्या पाहिजेत.’ किंवा ती ऑगस्टिनबरोबर फिरत असताना, ब्रह्मचारी फादरकडे कन्फेशनला जाते, त्यालाच मी सेक्स करू का? असे विचारते. मुलांना ही घटना सांगताना स्वत:च स्वत:वर हसते व म्हणते की, ‘मी पण मूर्खच! त्या ब्रह्मचाऱ्याला बिचाऱ्याला यातले काय कळणार? देवाने मनाई केलेले फळ इव्हने खाल्ले आणि आदम आणि इव्हला सेक्सचे सुख गवसले, हे ते मूळ पाप. म्हणून प्रसूतीच्या कळा तिने सहन केल्या पाहिजेत.’

या अशा समजुतींचा पगडा लहानपणापासून ख्रिश्चन मनांवर इतका पक्का असतो की, त्यामुळे अशा गमती होतात. या बाबतीत सर्व धर्म सारखेच आहेत व प्रत्येक धर्म हा विसंगतींनी इतका भरलेला असतो की, त्यावर मनापासून विश्वास ठेवणाऱ्याची जगात वावरताना कशी गोची होते, ते आपल्याला हसवत हसवत सांगितले आहे. आईचे प्रेमही मुलांवर तेवढेच आहे. सुसानचा जन्म झाला, तेव्हा तिला पाहून दाटून आलेल्या भावनांचं वर्णन अतिशय उत्कट आहे. पण ‘तुझा जन्म झाला व माझ्या डोक्यात कुठले नळ सुटले काय जाणो!’ हेही ती म्हणते. तिच्या वेडातही तिचे मुलांवरचे प्रेम तेवढ्याच प्रभावीपणे आपल्याला जाणवते.

पुस्तकाची भाषा सुलभ व प्रभावी आहेच; पण वेळप्रसंगी ती बदलणारीही आहे. म्हणजे, दोन मुंबईकर, रोमन कॅथलिक, अल्पशिक्षित बायका जशी इंग्रजी बोलतात, तशी भाषा त्यांचे संभाषण लिहिताना होते. त्यातील वर्णनेही या वर्गाच्या संस्कृतीचे चित्रण करणारी आहेत. गोवन ख्रिश्चन संस्कृतीचे व एका सुसंस्कृत घराचे तटस्थपणे व परखडपणे केलेले चित्रण, तरीही धर्म व जमात ओलांडून मानवी भावना कशा स्पर्श करू शकतात, याचे उदाहरण हे पुस्तक आहे.
पुस्तकाचे नाव : एम अँड द बिग ह...म
लेखक : जेरी िपंटो
प्रकाशक : ALEPH book company
पृष्ठे : २३५
किंमत : ~ २९५/-

vasantidamle@hotmail.com