आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Write Up By Guest Editor Chandatai Tiwari About Relation With Vitthala

नाते विठुरायाशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माझा जन्म तीर्थक्षेत्र पंढरपुरातलाच, १६ आॅक्टोबर १९४९ रोजीचा. घरची परिस्थिती हलाखीची. चंद्रभागेच्या वाळवंटात एका राहुटीमध्ये चहा बनवून तो किटलीतून संपूर्ण वाळवंटभर फिरून भाविकांना विकण्याचा आमच्या अाजोबांचा व्यवसाय. वाळवंटात दररोज वडिलांना डबा देण्याची जबाबदारी आईची असे. अगदी मी पोटात असतानाही घरातील सर्व कामे उरकून दुपारी एकदीडच्या सुमारास न चुकता आई ते करायची. त्यामुळे आईच्या पोटात असतानाच वाळवंटात घुमणाऱ्या टाळमृदंगाच्या गजरातून तसेच महाराज मंडळींच्या कीर्तन प्रवचनातील भजन, अभंगातून स्वरांची मला थोडीफार ओळख झालेली.

जन्मानंतर सारे बालपण अगदी विठुरायाच्या मंदिराभोवती असणाऱ्या महाद्वारातच घालवले. परिस्थिती सुधारल्याने वडिलांनी रामभरोसे नावाने मंदिराच्या महाद्वाराजवळच उपाहारगृह सुरू केले. आई, वडील, दोन भाऊ, सहा बहिणी असा मोठा परिवार. मी सर्वात मोठी. त्यामुळे इतर भावंडांचा सांभाळ करण्याची जबाबदारी माझ्यावरच. आईची घरातील कामे होईपर्यंत या सर्वांना खेळविण्यासाठी तासन््तास विठ्ठल मंदिरामध्ये मी बसलेली असे.

मंदिरातील सभामंडपात, बाजीराव पडसाळीत विविध महाराज मंडळींचे हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण सोहळे, कीर्तन, प्रवचनाचे कार्यक्रम तसेच नवरात्रोत्सवामधील विविध कार्यक्रम होत असत. तिथेदेखील हरिनामाचे स्वर कानी पडत असत. रोजच्या भेटीमुळे विठुरायाशीदेखील नाते घट्ट झालेले. लहानपणापासून मला नकला करण्याची विशेष आवड. आई पहिली श्रोती. एखाद्याची नक्कल आवडली की आई भरभरून दाद द्यायची. त्यामुळे उत्साह वाढायचा. थोरामोठ्यांची नक्कल केली तर असे करू नये म्हणून आई रागावयाचीदेखील.

नगरपालिकेच्या मुलींच्या एक नंबर शाळेत शिक्षणाचे धडे गिरविण्यास सुरुवात झाली. सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. सहावीतच सोलापुरातील एक स्थळ चालून आले. साखरपुडा पार पडला आणि सातवी झाली की विवाहदेखील झाला. आज मागे पाहताना वाटतं की, त्या वेळी आईच्या गर्भातच विठुरायाच्या कृपेने स्वरांची खऱ्या अर्थाने ओळख झाली होती. आणि त्यातूनच अभंग तसेच भारूड गायनाची गोडी निर्माण झाली.
(शब्दांकन : महेश भंडारकवठेकर)