आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘अच्छे दिन’ची प्रतीक्षा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्वच असंघटित स्त्री-पुरुष कामगारांना अनियमित वेतन, अनियमित तास, कामाचे अनिश्चित स्वरूप, नियमांचा अभाव, सामाजिक असुरक्षितता या सर्वाला सामोरे जावे लागते. पण तरीही त्यांतील स्त्रियांचे जीवन अधिकच निकृष्ट असते. कारण या सर्वांबरोबरच आरोग्याचे प्रश्न आणि हिंसाचार यामुळे स्त्रिया पिचून गेलेल्या दिसतात. भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार हा स्त्रियांच्या विकासाचा पाया आहे.

पण आपल्या समाजातील पितृप्रधान समाजरचनेचा प्रभाव शासकीय संस्थांवरही असल्याने महिलांवर जात, धर्म, वर्ग आणि लिंगभाव अशा सर्व बाजूंनी अन्याय होत असतो. स्त्रियांना प्रत्यक्षात सन्मानाने जगता यावे यासाठी विशेष कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी राज्य शासनाबरोबर केंद्र शासनाचीही आहे. उत्पादन, विनिमय, रोजगार याबरोबर शिक्षण, आरोग्य, पाणी, अन्न अधिकार, जमीन आदी जगण्याच्या साधनावरील मालकीत महिलांना समान वाटा मिळणे आवश्यक आहे. तो मिळण्यासाठी महिलांचे शिक्षण, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आणि त्यांचे उत्पन्नाचे स्रोत तसेच श्रम बाजारात (संघटित आणि असंघटित क्षेत्रातील) स्त्रियांचा प्रत्यक्ष सहभाग याची पाहणी करून स्त्रीविषयक असमानता निर्देशांक तयार करण्याचीही आवश्यकता आहे. जेंडर बजेट ही संकल्पना शासनाने स्वीकारली असली तरी अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब दिसत नाही. सरकारी योजना प्रत्यक्षात लाभार्थींपर्यंत पोहोचतच नाहीत. कारण त्यात स्त्रियांच्या परिस्थितीचा साकल्याने विचार केलेला नसतो.

योजनांसाठी पुरेसा निधी ठेवलेला नसतो किंवा तो ऐनवेळी दुसरीकडे वळविला जातो. या सर्वामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी गेल्या वर्षी सर्वपक्षीय महिला, तज्ज्ञ मंडळी आणि स्वयंसेवी संघटनांचे कार्यकर्ते यांच्या सहभागातून नवे महिला धोरण तयार केले गेले. असंघटित कामगार स्त्रिया तसेच समाजातील इतर अनेक वंचित घटकांचे प्रश्न विचारात घेऊन त्यावर काही ठोस उपाय त्या धोरणात सुचविण्यात आले होते. पण सरकार बदलल्यावर गेले वर्षभर हे धोरण वेबसाइटवर लटकत पडले आहे. महिलांच्या प्रश्नाकडे असे दुर्लक्ष केल्यावर समाजातील निम्म्या लोकसंख्येला ‘अच्छे दिन’ अनुभवता येणार कसे?
(ज्योति म्हापसेकर या स्त्री मुक्ती संघटनेच्या संस्थापक सदस्य आहेत.)
smsmum@gmail.com
बातम्या आणखी आहेत...