आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहुणे संपादक : आपल्या शहरावरचं प्रेम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमचंही तुमच्या शहरावर, गावावर प्रेम असेलच. पण ते तुम्ही दाखवता का? कसं?कशाबद्दल लिहू, कोणाबद्दल लिहू? नाटक, सिनेमा, सिरियल्समधल्या गमती-जमती, माझा एकूण प्रवास, यापैकी कशावर लिहू? असा लेख गमतीशीर होईल हे निश्चित. पण मला त्यात काही विलक्षण, जगावेगळं वाटत नाही. बाय चॉइस मी या क्षेत्रात आलो, त्यामुळे नटाचं आयुष्य किती खडतर असतं, नट होतं किती कठीण असतं हे सांगण्यात मला रस नाही. पण एक नागरिक म्हणून मला तुमच्याशी नक्कीच काही शेअर करावंसं वाटतं. मला मुंबईबद्दल लिहावंसं वाटतं. मुंबईतला माणूस फार दिवस इतरत्र नाही राहू शकत, त्याला मुंबईची आठवण येते. तसंच आहे माझंसुद्धा. माझं मुंबईवर प्रेम आहे, प्रेम असलं तरी सिद्ध करायची गरज नसते. बारीकसारीक कृतीतून दिसतच असतं. तसंच तुमचंही तुमच्या शहरावर, गावावर प्रेम असेलच. पण ते तुम्ही दाखवता का? कसं?
मुंबईचे जुने फोटो पाहिले की, वाटतं क्या बात है. समुद्र, डोंगर, शहराच्या मधोमध असलेलं जंगल. पण आज? आज तसं नाही जाणवत. आर्थिक राजधानी म्हणतो आपण, पण किती बकाल. किती घाण. भारतातल्या अनेक गावांची, शहरांची हीच रडकथा दिसते. दोष नागरिकांचाच जास्त आहे असं वाटतं.

परदेशातल्या प्रत्येक गोष्टीचं आपण कौतुक करतो. अहाहा! काय स्वच्छता, काय नियम. इकडे मात्र आपण या सगळ्या गोष्टींना धाब्यावर बसवतो. कसं आहे ना, बाहेरून आपल्या गावात आलेल्या लोकांबद्दल आपल्याला तक्रार असते, पण जे आतले आहेत, ते तरी काय मोठं करतायत. आपल्याकडे कुवत नाही का नियम पाळायची, स्वच्छतेची? तर आहे. आपल्याकडे ती मानसिकताच नाहीये. आपण सर्रास सिग्नल धाब्यावर बसवून गाडी चालवतो, कचरा फेकतो, थुंकतो. हॉर्न तर असा वाजवतो की जणू चालकांना वाटत असावं की, त्यांची गाडी हॉर्नवर चालतेय. हॉर्न नाही वाजवला तर गाडी पुढे सरकणार नाही. कायद्यानं पावलं उचलावीत हे खरं; पण नागरिक म्हणून काही जबाबदारी आहे की नाही? आपलं घर स्वच्छ ठेवतो, मग आपलं शहर का स्वच्छ ठेवू शकत नाही?
sumrag@gmail.com
बातम्या आणखी आहेत...