आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सैन्यदलातील संधीचे आकाश व्यापून टाका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - एएफएमसीच्या अधिष्ठातापदी नेमणूक झाल्याबद्दल माधुरी मॅमचे अभिनंदन केल्यावर त्या पटकन म्हणाल्या, “ज्या संस्थेत तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण केले आहे, त्याच संस्थेच्या महत्त्वाच्या पदावर काम करण्याची संधी मिळणे, हा दुर्मीळ योग असतो. तो मी अनुभवते आहे. मला खूप आनंद आणि समाधान देणारी ही नेमणूक आहे. अगदी माझ्या मेजर जनरल या रँकपेक्षाही मला ही नेमणूक आनंददायी वाटते.”
 
“मॅम, आज तुमच्याकडे महिला सक्षमीकरणाचा आदर्श म्हणून पाहिले जात आहे. या नव्या नेमणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील महिलांसाठी तुम्ही रोल मॉडेल ठरला आहात, याविषयी काय सांगाल?” या प्रश्नावर माधुरी मॅम म्हणाल्या, “महिला मुळातच मल्टिटास्किंगमध्ये वाकबगार असतात.
 
 एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या उत्तम पद्धतीने हाताळण्याचे कौशल्य स्त्रियांमध्ये निसर्गत:च असते. गरज असते, ती हे कौशल्य वेळीच ओळखून त्याचा वापर करण्याची. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया ज्या पद्धतीने वाटचाल करत आहेत, ते पाहता भावी काळ फार सकारात्मक आणि संधी देणारा आहे, असे मला वाटते. 
 
अर्थात स्त्रियांवर निसर्गाने इतरही काही जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत, याचे भान ठेवत वेळेचे नियोजन, कामांचे व्यवस्थापन केले तर प्रत्येक स्त्री स्वभावत: रोल मॉडेल असतेच, असेही सांगावेसे वाटते. कुटुंबीयांचा पाठिंबा ही फार मोलाची गोष्ट असते. मी त्या बाबतीत सुदैवी आहे. एएफएमसीचे हे पद मिळणे, ही खूप सकारात्मक बाब आहे.
 
 आपण अनेक बाबतीत महिलांचे नेतृत्व स्वीकारण्यास तयार असल्याचे संकेत त्यातून मिळतात. मुळात ही संस्था स्त्री-पुरुष असा भेद करत नाही. शिवाय उच्च पद भूषवणारी मी काही पहिली महिला नाही. यापूर्वीही अनेक महिलांनी विविध क्षेत्रांत सर्वोच्च पदे भूषवली आहेतच. मात्र लष्करी दलांत स्त्रियांनी अधिकाधिक संख्येने पुढे यावे, हेही मी सुचवेन.”

लहान मुलांच्या मूत्रपिंड विकाराच्या तज्ज्ञ म्हणून काम करताना देशातले चित्र काय आहे आणि या क्षेत्रातील संशोधनाविषयी काय सांगाल, या प्रश्नावर माधुरी मॅम म्हणाल्या, “आपल्याकडे पेडिऑट्रिक नेफ्रॉलॉजिस्ट अत्यल्प आहेत. आजही आपल्या देशातील काही राज्यांत लहान मुलांचा एकही मूत्रपिंडविकारतज्ज्ञ नाही. लष्करी दलांमध्ये मात्र असे तज्ज्ञ आहेत. त्यामुळे इथे काम करण्याचे समाधान अधिक आहे. 
 
लहान वयातील हे विकार वेळीच ओळखून उपचार झाल्यास वाढत्या वयात मूत्रपिंडाचे विकार रोखण्यास साह्य मिळते. मी पुण्याला रुजू होण्याआधीपासूनच दिल्लीतील ‘आर्मी हॉस्पिटल अँड रेफरल’मधील सहकाऱ्यांसोबत प्रकल्पासाठी संशोधन करत आहे. इथे अधिष्ठाता म्हणून हे संशोधन तरुणाईची मदत घेऊन पुढे नेण्याचा माझा प्रयत्न राहील. वैद्यकीय क्षेत्राला पूरक ठरणाऱ्या अभ्यासक्रमांची सुरुवात करण्याचाही विचार आहे.” 
 
तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी ‘मधुरिमा’च्या वाचकांना उत्सुकता आहे. माझे वडील रेल्वेत डॉक्टर होते. माझे आजोळचे लोकही वैद्यकीय पेशाचे होते. मी मूळची पुण्याचीच. आमचे आडनाव खोत. आम्ही तीन बहिणी. मी सर्वांत मोठी. माझे यजमान लेफ्टनंट जनरल राजीव कानिटकरही सैन्यदलात अधिकारपदावर कार्यरत आहेत.
 
 आम्ही दोघे कदाचित महाराष्ट्रातील पहिले जोडपे असू, जे एकत्रितपणे ‘जनरल’ पदावर सैन्यदलात कार्यरत आहोत. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी(एनडीए)मधून कानिटकरांनी त्यांचे प्रशिक्षण राष्ट्रपती सुवर्णपदकाच्या सन्मानासह प्राप्त केले आहे. मी एफएमएमसीमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. माझ्या सासरची मंडळीही उच्चविद्याविभूषित परंपरेतील आहेत.
 
सैन्यदलात स्त्रियांनी अधिक संख्येने यावे. 
जगात काहीही अशक्य नाही. स्त्रिया कामाचे क्षेत्र आणि कुटुंब यांची सांगड अधिक समंजसपणे घालू शकतात. नवनव्या जबाबदाऱ्या, आव्हाने खांद्यावर पेलण्यातही एक वेगळा आनंद असतो. त्याचा सकारात्मक विचार करा. बदल्या अपरिहार्य आहेत, त्यांचा स्वीकार आनंदाने करा आणि स्वत:मधील सर्वोत्कृष्ट ते संस्थेला, देशाला देण्याचा प्रयत्न करा.
 
 देशात अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पुण्यातील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाच्या (एएफएमसी) अधिष्ठाता आणि उपप्रमुखपदी मेजर जनरल (डॉ.) माधुरी कानिटकर यांची नुकतीच नियुक्ती झाली. या पदावर नियुक्ती झालेल्या त्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. लहान मुलांमधील मूत्रपिंड विकारांच्या त्या आघाडीच्या तज्ज्ञ आहेतच; पण देशातील लष्करी वैद्यकीय क्षेत्रातील पहिले ‘पेडिअॅट्रिक नेफ्रॉलॉजी युनिट’ उभारण्याचा मानही त्यांच्याकडे जातो. 
 
पुढील स्लाईडवर क्लीक करून  सविस्तर माहिती वाचा... 
 (mangesh.phalle@dbcorp.in
 jayashree.bokil@dbcorp.in)
बातम्या आणखी आहेत...