आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूताचे लिखाण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज तुम्ही वैज्ञानिक किंवा म्हणाल तर जादूचा प्रयोग करणार आहात. तुम्हाला वाटणारी जादू एखाद्या वैज्ञानिक प्रयोगाचा भाग आहे. मात्र, ती जादू वाटू शकते. अदृश्य शाईची कल्पना कशी काय वाटते? यासाठी लागणारे साहित्य अगदी साधे आहे. अर्धा लिंबू, पाणी, एक चमचा, भांडे, कापसाचा बोळा, पांढरा कागद आणि पेटलेला बल्ब. आता प्रयोग- भांड्यामध्ये लिंबू पिळा. जेवढा लिंबाचा रस तेवढेच त्यात पाणी घाला. चमच्याने पाणी व लिंबू रसाचे मिश्रण ढवळा. कान साफ करण्याची कापूस गुंडाळलेली काडी मिळाली तर उत्तमच. नाहीतर खराट्याच्या काडीच्या टोकाला कापूस गुंडाळा. कापूस शोधण्यासाठी फार लांब जायला नको. आईला सांगा निरांजनासाठीच्या वातीचा कापूस बहुतेक घरामध्ये असतोच. कापूस लावलेली काडी लिंबाच्या रसात बुडवून कागदावर काहीही लिहा. अगदी तुमच्या मित्राचे भविष्य लिहिले तर नंतर ते वाचताना मजा येईल.


कागद कोरडा होऊ द्या. आता कोरड्या कागदावर काहीही दिसत नाही, याची खात्री करून घ्या. हा झाला भुताचा संदेश. स्वच्छ कागदावरील संदेश प्रकट झाला तरच मजा येणार आहे. हा कागद पेटलेल्या बल्बच्या जवळ धरा. कागद तापला पाहिजे. जसा जसा कागद तापेल तशी तुम्ही लिहिलेली अक्षरे कागदावर उमटतील. यामागील विज्ञान सहज समजण्यासारखे आहे. लिंबूरस हे कार्बनी संयुग आहे. लिंबूरस आणि पाणी मिश्रण पुरेसे विरल केल्याने ते कोरड्या कागदावर दिसत नाही. फक्त संयुगाचे कण तापवल्यानंतर कागदावर उमटतात. ही भुताची शाई करण्यासाठी फक्त लिंबूच वापरायला हवा असे नाही. कांद्याचा रस, दूध, संत्र्याचा रस, पातळ मध यांची शाई वापरून पहा. ती कागदावर दिसायला किती वेळ लागतो आणि त्याचा रंग कसा दिसतो याची निरीक्षणे करा. न तापवलेला कागद शाळेतील अल्ट्राव्हायोलेट (अतिनील किरण बल्ब) दिव्याखाली पाहिल्यास तो वाचता येतो. अल्ट्राव्हायोलेट दिव्याकडे पाहताना चष्मा वापरा. उघड्या डोळ्यांनी अल्ट्राव्हायोलेट दिव्याकडे पाहणे धोक्याचे असते. शाळेतील विज्ञान जत्रेमध्ये आलेल्या पाहुण्यांना त्यांचे भविष्य दिव्याखाली कागद तापवून दाखवण्याने तुम्ही सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकाल.